
नाशिक ,दि. २९ मे २०२३ – शब्दमल्हार प्रकाशित आणि वसंत नारायण देशपांडे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्रकाव्य ‘रणघंटा’ चे प्रकाशन चारुदत्त आफळे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा ही किती श्रीमंत आहे याची तीव्र जाणीव कवी वसंत नारायण देशपांडे यांचे ‘रणघंटा’हे चरित्र काव्य वाचल्यावर होते.ती भाषेची श्रीमंती नव्या पिढीत पोहोचली पाहिजे,भाषेतल्या बारकाव्यांना समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन ख्यातनाम कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
‘शब्दमल्हार’प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या वसंत नारायण देशपांडे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावरकर साहित्याचे अभ्यासक स्वानंद बेदरकर, चित्रकार आनंद ढाकीफळे,अच्युत देशपांडे सुनील देशपांडे उपस्थित होते.
आर्या, दिंडी, साकी, फटका हे मराठी कवितेतील वेगवेगळे प्रकार अत्यंत ताकदीने वापरून देशपांडे यांनी सावरकरांचे चरित्र गायन केले आहे. मुळातच सावरकरांची भाषा श्रीमंत आणि त्याचे गुणवर्णन करणारे वसंत नारायण देशपांडे यांच्यासारखे कवी हा एक सुयोग्य असा योगायोग जुळून आला आहे, असे सांगत चारुदत्त आफळे यांनी त्यातील काही कवितांचे, आर्यांचे गायनही करून दाखवले.
सावरकरांच्या आयुष्यातील नुसत्या घटनाक्रमाला कवितेत बद्ध न करता त्या घटनेचा, प्रसंगाचा तत्कालीन भारतावर आणि नंतरही नेमका काय परिणाम झाला किंवा होणार आहे यातील बारकावे आपल्या काव्य लेखनात प्रतिबिंबित करण्याचे काम कवीने ‘रणघंटा’ या चरित्र काव्यात केले असल्याचे संपादक स्वानंद बेदरकर यांनी सांगितले.
प्रारंभी सागर कुलकर्णी यांनी सावरकरांच्या ‘शतजन्म शोधताना…’या नाट्यपदाचे गायन केले.सुनील देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.अच्युत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.पियू आरोळे यांनी सूत्रसंचालन केले.या पुस्तकाचे मुखपृष्ठ आनंद ढाकीफळे यांनी केले असून कार्यक्रमाची सांगता लेखकाचे पणतू रुचिर पिंप्रिकर याच्या बासरीवरील जयोस्तुते या गाण्याने व त्या नंतरच्या सागर कुलकर्णी यांनी गायलेल्या सन्यस्त खड्ग नाटकातील ‘सुकतातची जगी या’या नाट्य पदाने झाला.प्रकाशन सोहळ्यास नाशिकमधील सावरकर प्रेमाने उपस्थिती नोंदवली.



