जीवन शिक्षणासाठी सचिन जोशी यांची पुस्तके दिशादर्शक ठरतील-शिक्षण आयुक्त सूरज मांढरे  

शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

0

नाशिक,दि.१६ एप्रिल २०२३ –आपण ज्या गोष्टींसाठी मुलांना तयार करत आहोत, त्या भविष्यात असतील की नाही, हे सांगता पण येणार नाही. त्यामुळे त्या स्पर्धेमागे न धावता मुलांमधील सर्जनशीलता, उत्सुकता, क्षमता यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. ही काैशल्येच खऱ्या अर्थाने जीवन शिक्षणातून घडवायला मदत करते. त्यासाठी शिक्षण कसे असावे, याचा वस्तूपाठच शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून मिळतो. ही दोन्ही पुस्तके केवळ प्रबोधन करणारी नाही तर इतिहासाचा मागोवा घेऊन भविष्याबाबत दिशादर्शन करणारी आहे. पालक म्हणून जेव्हा अापण संभ्रमित होतो, अशा वेळी ही पुस्तके आपल्याला  खऱ्या अर्थाने अंतर्मुख करायला लावतात, असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त  सूरज मांढरे यांनी व्यक्त केले.

इस्पॅलियर हेरिटेज स्कूलच्या अॅम्फी थिएटर मध्ये साकेत प्रकाशनतर्फे झालेल्या सोहळ्यात शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षण अायुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते तर मुलांचे व्यक्तिमत्व साकारतांना…या पुस्तकाचे प्रकाशन कवी संगीतकार डाॅ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल शिक्षण महर्षी प्रा. रमेश पानसे होते. याप्रसंगी अादिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापक संचालक लीना बनसोड, साहित्यिक बाबा भांड, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, महापालिका आयुक्त   डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. प्राजक्ता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. पानसे यावेळी म्हणाले की, बालशिक्षणात काम करताना सामाजिक सत्य सापडले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून लहान मुलांमधून प्राैढ तयार होत असल्याने लहान मुलांच्या अनुषंगाने बालशिक्षणाची रचना करावी. बालशिक्षण दुर्लक्षित राहिल्यास समाज अविकसित राहतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाैद्धिकतेसोबत अाजचा कार्यक्रम पुस्तक न वाचता पुस्तकाचे महत्व सांगणारा ठरला, याबद्दल प्रा. पानसे यांनी या कार्यक्रमाचे विशेष काैतुक केले. नवीन शैक्षणिक धोरणाची निर्मितीत व अंमलबजावणीत प्रत्येक टप्प्यावरील मुलांच्या दृष्टीने विचार व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कलागुणांना वाव देण्यासाठी वाचनाचा संस्कार महत्वाचा  आहे, हे संस्कार सचिन जोशी यांच्या पुस्तकांतून होत असल्याचे साहित्यिक बाबा भांड यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐनवेळी आलेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. मात्र, शाळेच्या प्रत्येक स्टाफने कमी वेळेत अत्यंत चांगले नियोजन केल्याने या व्यवस्थापनाचे काैतुक उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. यावेळी मुलांनी राईट टू एज्युकेशन या विषयावर आधारित नृत्य सादर केले. आर्या पगारे, कस्तुरी कुलकर्णी, गाैरी शिंदे या विद्यार्थिनींना सूत्रसंचालन केले.

सकारात्मक पालकत्व स्वीकारा..
सकारात्मक, प्रेरणादायी असे पालकत्व स्वीकारले पाहिजे. अनेकदा पालक आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादत असतात. प्रिव्हिलेज वाटते अशा पद्धतीने पालकत्व स्वीकारावे. मुलांना क्षण साजरा करता यायला हवे. प्रत्येक मुलाची उमलण्याची व फुलण्याची वेगळी वेळ असते. म्हणूनच मुलांना पालकांनी सतत मी अाहे..हे सांगत राहावे, असे मत संगीतकार डाॅ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सचिन जोशी यांचे पुस्तके ही स्टोरी टेलिंग अाणि नाती साजरी करणारी असल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.