विश्वास ग्रुपतर्फे रविवारी केतन इनामदार यांचे गायन

0

नाशिक (प्रतिनिधी) : नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजता केतन इनामदार यांचे गायन होणार आहे. त्यांना सौरभ ठकार (तबला) व संस्कार जानोरकर (संवादिनी) हे साथसंगत करणार आहेत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे या करणार आहेत.

मैफिलीचे हे एकवीसावे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.

केतन अनिल इनामदारचे गेली दहा वर्षापासून गुरू पं.मकरंद हिंगणे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू आहे. त्याने नुकतीच गांधर्व महाविद्यालयाची विशारद प्रथम (सहावी परीक्षा) परीक्षा दिली आहे. तसेच केतनचे अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण आर.एच.सपट महाविद्यालय, नाशिक येथे सुरू आहे.

भाद्रपद गणेशोत्सवात नाशिकच्या मेनरोड येथील गणपती मंदिरात त्याने गायन केले आहे. नाशिक आकाशवाणीच्या नवपालवी या कार्यक्रमात तसेच 2020 मध्ये नाशिकला झालेल्या अखंड ख्याल संकीर्तनात त्याला गायनाची संधी मिळाली आहे. गानवर्धन, पुणे (शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा 2020-पाचवा क्रमांक), सरस्वती संगीत विद्यालय, धुळे (ख्याल गायन ई-स्पर्धा 2020-दुसरा क्रमांक) व कल्याण गायन समाज यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. शास्त्रीय संगीतातील नव-नवीन प्रयोग व त्याअनुषंगाने रागांचे सादरीकरण याविषयी केतनचा अभ्यास सुरू असून त्या माध्यमातून त्याचा प्रवास सुरू आहे. नव्या पिढीतील प्रयोगशील गायक म्हणून केतनची वाटचाल सुरू आहे.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.