नाशिक,दि,२९ ऑक्टोबर २०२४ – येथील नृत्यांगण कथक नृत्य संस्था आणि rhythm म्युझिक अॅण्ड डान्स अकॅडमी च्या विद्यार्थिनींनी मलेशिया येथे विविध तीन ठिकाणी सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात दमदार कथक नृत्याचे सादरीकरण करून मलेशियातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
मलेशिया येथे नुकतेच क्वालालंपूर , ब्रिकफील्ड येथे भारतीय शास्त्रीय गायन, वादन, आणि नृत्याच्या सादरीकरणासाठी नाशिक येथील कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक पं. अविराज तायडे, तबलावादक आणि गुरू नितीन वारे आणि नितीन पवार तसेच कथक गुरू कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्या वसुंधरा आहेर, रिया भावसार, जान्हवी कुलकर्णी, श्रावणी पुराणिक, साक्षी पुजारी, अदविका महाजन, तेजल मांडवकर, ऋतुजा बेलगावकर तसेच कथक गुरू शिल्पा सुगंधी आणि त्यांच्या शिष्या आकांक्षा गोवर्धने , अर्चना शर्मा , प्रतीक्षा खंदारे, देवांशी पुरोहित, अग्रजा दुबे, आदिती जोशी यांनी भारतीय शास्त्रीय कलांचे दर्जेदार सादरीकरण करून मान्यवरांची आणि रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
मलेशिया येथील भारत क्लब च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सांगीतिक महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी या कलाकारांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मंडळ, मलेशिया तर्फे आयोजित “परंपरा” या सांगीतिक मैफिलीत नाशिकच्या कलाकारांनी गायन वादन आणि नृत्याचे नेत्रदीपक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ऑडिटोरियम, मलेशिया येथे “मलेशिया-इंडिया हेरिटेज सेंटर” , ग्लोबल इंटरनॅशनल असोसिएशन आणि “भाई मर्दाना म्युझिक अकादमी मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” कलासंगम ” या कार्यक्रमात नाशिकच्या या सर्व कलाकारांनी शास्त्रीय गायन तसेच कथकनृत्यात भजन, शिवस्तुती, गणेशवंदना , तराणा, होरी, त्रिवट, झुला, अशा विविध रचना अतिशय दमदारपणे प्रस्तुत करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मलेशियातील भारतीय दूतावासाचे उच्च आयुक्त श्री रामचंद्र रेड्डी , भारत क्लब चे अध्यक्ष सी. मुरली तसेच ” मलेशिया – इंडिया हेरिटेज सेंटर ” चे श्री गोयल यांच्या हस्ते सगळ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला आणि विद्यार्थिनींना त्यांच्या अंतरराष्ट्रीय पातळीवरील नृत्य सादरीकरणासाठी प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी श्री अरविंदर सिंग रैना यांचे विशेष सहकार्य लाभले.