दीपावली उटणे व अभ्यंग -एक आयुर्वेदिय परंपरा

अभ्यंग म्हणजे काय ?अभ्यंग व उटणे याचे काय महत्व ? दीपावली निमित्य डॉ.राहुल चौधरी यांचा विशेष लेख 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी
दिवाळी सण म्हटला की एक वेगळीच मजा असते.फराळ,लाडू,शेव,चकल्या,शंकरपाळे असे एक नी अनेक पदार्थ..ह्या पदार्थाची अक्षरश: लयलूट चालू असते.पण हे सर्व करत असताना ह्या ५ दिवसामध्ये अभ्यंग आणी उटण्याची मजा काही आगळी वेगळी च असते…ज्याला आपण दीपावली अभ्यंगस्नान  असे म्हणतो.अभ्यंगस्नान नरक चतुर्दशीला ला विशेष करून सांगितले जाते.त्यामागे आख्यायिका देखील आहे..नरकासुर नावाचा राजा होता त्याने स्त्रियांना बंदी करून ठेवले होते त्यावेळी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून स्त्रियांना बंदितुन सोडवले म्हणजेच नरकातून सोडवले…त्यावेळी नरकासुराने  श्रीकृष्णा कडे वर मागितला या दिवशी जो अभ्यंग स्नान करेल त्याला  नरकाची बाधा होणार नाही.म्हणून याधार्मिक दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.आणी अभ्यंग स्नांनाचे देखील महत्व आहे.या दिवसाला जसे धार्मिक महत्व आहे तसेच आयुर्वेद दृष्टिकोनातून  देखील खूप महत्व आहे.दिवाळी साधारणत: ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान येते म्हणजेच पावसाळा  नंतर लगेचच…गार वारे वाहणे,परतीचा पाऊस,धुक्याच साम्राज्य,  बोचरी थंडी या सर्व निसर्गात घडणाऱ्या गोष्टी शरीरात देखील बदल घडवून आणतात. पावसाळ्यात  भूक मंद  असते वाताचा तीव्र काळ  असतो त्यानंतर पित्ताचा काळ  म्हणजेच ऑक्टोबर हीट  पासून थंडी  पर्यंतचा प्रवास.तसा हा काळ खूप जास्त आजकाल दिसत नाही म्हणजे शरद आला गेल्यासारखाच असतो.असो ऋतू बदल हवामान बदल हा आपला लेखाचा विषय नाही. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात थंडी  तीव्र असते.मंद झालेला अग्नी हळू हळू वाढतो तसा ऑक्टोबर ते डिसेंबर  दरम्यान पित्ताचा जोर देखील वाढलेला असतो…पण या काळात हवेत रुक्षता वाढलेली असते तशीच शरीरात देखील वाढलेली असते.त्वचेची स्निग्धता  कमी होऊन त्वचा रुक्ष  पडते.याच थंडी च्या काळात सांधे दुखणे,ठणकणे,त्वचा विकार वाढणे ,त्वचा विकारात खाज जास्त येणे,त्वचा ओठ फुटणे इत्यादी गोष्टी दिसून येतात आणि  याच काळात उतार वयातल्या लोकांची अवस्था तर फारच बिकट होते .स्वेटर ,मोजे घालून अंग गरम ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

पण असा विचार करा की जर हेच शरिर  कायम स्निग्ध ठेवले तर…..तर काय…तर या गोष्टींची गरज कमी पडेल पण शरीरची झीज थांबेल ,वर उल्लेखलेले समस्या उद्भवणार नाही. या लेखात आपण अभ्यंग  म्हणजे काय,त्याचे प्रकार किती,फायदे काय कसे करावे याबाबत बघुयात.

१.अभ्यंग म्हणजे काय?
अभ्यंग म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत अंगाला तेल लावणे होय.बोली भाषेत यांस मॉलिश,हळुवार मसाज करने असे देखिल म्हणतात.

२.अभ्यंग कोणत्या वयात करावा !
आपण तस बघितल तर जन्मलेल्या बालकापासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांनी रोज अगदी रोजच अभ्यंग केला पाहिजे.आज काल आपण इतके कामात व्यस्त होतो की दिवाळीत मोती स्नानांच्या जाहिराती ऐकून फक्त १-२ दिवस आठवण राहून अभ्यंग  स्नान करतो

३.अभ्यंग करण्याआधी उटणे का लावावे?
उटणे हा एक अभ्यंग स्नानांचा भाग आहे..आपल्या शरीरावरील सर्व रंध्र मोकळी व्हावी,शरीरावरील मळ निघून जावा,त्वचा ही निरोगी,मुलायम राहावी याकारिता उटणे लावणे गरजेचे असते.उटणे दोन प्रकारे लावतात एक तेल उटण्यामध्ये टाकून पेस्ट करून आणि  दुसरा म्हणजे कोरडे चूर्ण अंगास लावणे .पहिल्या प्रकारास उत्सादन म्हणतात तर दुसऱ्यास उद्ववर्तन म्हणतात.उत्सादन शरीराचे पोषण करण्यास उपयोगि असते तर उद्वर्तन हे कफ व मेदाचा नाश करण्याकारिता केले जाते,स्थौल्या मध्ये वापरले जाते.

४.अभ्यंग  व उटणे याचे महत्व काय?
अभ्यंग  व उटणे हे आयुर्वेदात रोजच्या दिनचर्येंचा भाग सांगितला आहे.अभ्यंगात शिरोभ्यंग , कर्ण अभ्यंग, पादाभ्यंग, सर्वाग अभ्यंग असे विविध प्रकार वर्णन केले आहे…प्रत्येकाचे वेगळे महत्व आहे…शिरोभ्यंग केस केसाचे विकार,पक्षाघात,निद्रानाश,चेहरा थोडा खराब असणे किंवा डोक्याशी बुद्धिशी संबंधित सर्व विकार शिरोभ्यंगाने कमी होतात. कर्णाभ्यंग हे कानाला कमी ऐकू येणे,कान कोरडे पडणे,कान ठणकने,मान जखडणे इत्यादी  विकार कर्ण अभ्यंगाने कमी होतात.

पादाभ्यंग  तर सध्या foot  massage  नावाने मॉल  मध्ये देखील फिरती काश्याची वाटी लावून मशिन्स लावलेले दिसून येतात. हे एक चांगलंच आहे काही का असेना awareness  वाढतोय.पादाभ्यंगाने पाय जड पडणे,कोरडे पडणे,सुन्न पडणे,थकलेले असणे,जखडणे असे वेगवेगळे विकार शांत होतात.पाय स्थिर होतात.नेत्रशक्ती सुधारते.sciatica  सारख दुखणे कमी होते असे अनेक फायदे याने दिसून येतात.

सर्वांग अभ्यंग हा एक महत्वाचा प्रकार आहे…यात संपूर्ण शरीराला मसाज केला जातो..अगदी रगडणे असे नाही तर हळुवार पणे केला जातो.हा प्रकार अभ्यंगाच्या सर्व प्रकारात उत्तम मानला जातो.याने शरीर हे मजबूत,सर्व विकार सहन करण्यास सक्षम,सर्व ऋतू चे बदलते लक्षण सहन करण्यास सक्षम होते.शरीर त्वचा सुदृढ होते.खूप कष्टकारक काम करून देखील शरीर थकत नाही विकृत होत नाही,चेहरा शरीर सुरूप सुंदर पुष्टीदायक दिसते.मार लागल्याने देखील खुप गंभिर पणे इजा जानवत नाही.अभ्यंगाने रक्ताभिसरणास चालना मिळते . शरीरात उर्जा , चैतन्य, निर्माण होते. उष्णता निर्माण होते,  नसांना लवचिकता येते. त्वचेचा पोत सुधारतो , ग्लो येतो . त्वचेवर लकाकी येते. त्वचा मऊ मुलायम होते, अकाली आलेले वार्धक्य दूर होण्यास मदत होते, त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात, हाडांना बळकटी येऊन सांध्यांना होणारा त्रास थांबतो . त्वचेवरील मल दुर होवुन रंध्रे मोकळी होतात.नवीन त्वचा निर्मितीस वाव मिळतो. मनावरील ताण तणाव दूर होऊन उत्साह वाढीस लागतो , झोप छान लागते , थकवा दूर होऊन मन उल्हसित होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते.

५.अभ्यंग व उद्वर्तन करण्याची पद्धत काय?शास्त्रीय पध्दतीने कसे कराव्यात या दोन्ही गोष्टी?

अभ्यंग करताना शिर म्हणजेच डोके या भागापासून सुरुवात करावी.सुरुवातीला भ्रुमध्य म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये हळुवार गोलाकार पद्धतिने मसाज करावा त्यानंतर दोन्ही शंख प्रदेश म्हणजेच कानांच्या वरचा भागात मसाज करावा हळुवार पणे कपाळ,नाकाच्या दोन्ही बाजू ,भुवया,हनुवटी ,कानाच्या मागच्या बाजूला मसाज करून खाली छाती व हृदयाकडे यावे.तेथे दोन्ही हात व  खांदे  यांना वरून खाली या पद्धतीने हळुवार मसाज करावा, पोटाच्या ठिकाणी आधी बेंबीत थोडे तेल घालुन बेंबी भोवती हळुवार मसाज करावा त्यानंतर पूर्ण पोटाला गोलाकार मसाज करावा.त्यानंतर दोन्ही बाजू वर पासून कंबरेपर्यंत मसाज करावा.त्यानंतर गुडघ्याच्या दोन्ही वाट्या गोलाकार स्वरूपात मसाज करून दोन्ही पायांना हाताप्रमाणेच मसाज करावा.सुरुवात जरी अभयंगाची भ्रूमध्य पासून असली तरी आधी पूर्वतयारी वेळी दोन्ही तळहात  तळपाय चांगले मसाज करून गरम करावेत.मागच्या पाठीच्या बाजूने आधी मान नंतर सम्पूर्ण मणका आधी मसाज करावा.मणक्याला करण्याआधी माकड हाडाठिकाणी मसाज करावा .मग पोटऱ्यांना मसाज करून …छान तेलात भिजवलेले नागरमोथा, कचोरा,संत्रासाल,सारीवा,चंदन इत्यादी पासून बनवेलेलं उटणे पेस्ट स्वरूपात शरीरावर रगडावे त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी …आंघोळीनंतर अंग टॉवेल ने न पुसता हातानेच रगडून घ्यावे जेणेकरून उरलेले तेल जिरेल.अभ्यंगात तेल कोमट वापरावे व हळुवार जिरवावे.

६.अभ्यंगास तेल कोणते वापरावे?
साधारण पणे वैद्य अभ्यंग तेल  बनवतात ते घ्यावे अन्यथा तीळ तेलाचा च वापर करावा.

७. कोणते उटणे वापरावे ?
उटणे हे संपूर्णतः नैसर्गिक असावे.आज काल उटणे खूपच स्वस्त मिळते मार्केट मध्ये त्याला अति सुगंध असतो..  प्राकृत  नैसर्गिक उटणे व्यवस्थित बनवायचे असल्यास किमान १ ग्राम ला १रुपया प्रमाणे खर्च यायला हवा आणि सुगन्धित बनवायचे असल्यास १ ग्राम किमान दीड ते दोन रुपया प्रमाणे खर्च यायल हवा.कारण कचोरा,चंदन, नागरमोथा,सारीवा ही महागडी औषधे आहेत.बाजारातील उटण्यात सुगन्धी द्रव्यांचा स्प्रे मारून पॅॅक  केलेली असू शकतात.व त्याची शरीरावर रॅश देखील येऊ शकते.त्यामुळे सावधान  योग्य व्यवस्थित पारख करून उटणे घ्या.व सुरक्षित दिवाळी साजरी करा.

लेखक
डॉ.राहुल रमेश चौधरी 
एम.डी.आयुर्वेद मुंबई
एम ए.संस्कृत पुणेपी.एच.डी. (स्कॉ.)
सहयोगी अध्यापक ,सप्तश्रुंगी आयुर्वेद महाविद्यालय ,नाशिक
For  expert opinion available @
औदुंबर आयुर्वेद क्लिनिक,गंगापूर रोड, नाशिक
रेणुका हॉस्पिटल,जेलरोड,नाशिकरोड
सत्ययुग आयुर्वेद हॉस्पिटल,लेखानगर,नाशिक
Phon – 9096115930

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.