भावार्थ दासबोध – भाग १६३ 

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १२ समास २ प्रत्यय निरुपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. संसारात आलेल्या स्त्री पुरुष आणि निस्पृहांनी लक्ष देवून अर्थाकडे पहा. वासना काय म्हणते, कल्पना कशाची कल्पना करते, अंतरी नाना तरंग का उठतात? चांगले खावे, चांगले नेसावे,दागदागिने घालावेत,सगळे काही मनासारखे असावे असं प्रत्येकाला वाटत. मात्र तसे काहीच होत नाही. चांगला काही विचार करावा तर अचानक वाईट होते. जीवनात एक सुखी तर एक दुःखी असे प्रत्यक्ष दिसते. कष्टी माणसे आपल्या दुःखाची जबाबदारी प्रारब्धावर टाकतात. अचूक प्रयत्न केले नाहीत म्हणून केल्या कामाला यश येत नाही पण आपले अवगुण काही केल्या ते मान्य करीत नाहीत. जो स्वतःला जाणत नाही तो दुसऱ्यांचे काय जाणणार?

न्याय मिळत नसल्याने लोक दीनवाणे होतात. लोकांचे मनोगत समजत नाही, लोकांसारखे वागता येत नाही त्यामुळे मुर्खपणामुळे लोकांत नाना कलह निर्माण होतात. मग हे कलह वाढतात. एकमेकांच्या वर्तनामुळे कष्टी होतात, कितीही प्रयत्न केले तरी अंती श्रमच होतात. अशी वर्तणूक नसावी. नाना लोकांची परीक्षा घ्यावी, जसे आहे तसे नेमके समजले पाहिजे. शब्द परीक्षा, अंतर्मनाची परीक्षा ही दक्ष माणसाला समजते. नतद्रष्ट माणसाला मनोगत कसे कळेल?दुसऱ्यावर आरोप करणे, आपला कैवार घेणे, अशी उदाहरणे बहुतेकदा दिसतात. लोकांनी चांगले म्हणावे यासाठी चांगल्या माणसाला सोसावे लागते, सोसले नाही तर सहजपणे फजिती होते. आपणास जे मानत नाहीत, तेथे रहावेसे वाटत नाही मात्र भांडण करून कोणीही जाऊ नये. खरे बोलतो, खरे चालतो त्याला लहानथोर मानतात.

न्याय, अन्याय सर्वाना सहज समजतो. लोकांना कळत नाही तोवर जो क्षमा करत नाही त्याची योग्यता ओळखली जाते. जोवर चंदन झिजत नाही तोवर त्याचा सुगंध समजत नाही. चंदन आणि नाना वृक्ष सारखेच वाटतात.जोपर्यंत उत्तम गुण समजत नाही तोपर्यंत लोक प्रतिसाद देत नाहीत, उत्तम गुण लक्षात आले की जगातील लोकांतील अंतर कमी होते. लोकांतील अंतर कमी झाले की त्यांच्याशी सख्य होते, मग जगातील सर्व लोक आपल्यावर प्रसन्न होतात. जनता जनार्दन प्रसन्न झाला त्याला काय कमी आहे? मात्र सर्वांना राजी राखणे कठीण आहे. पेरले ते उगवते. उसने घेतलेले द्यावे लागते. वर्मावर बोट ठेवले तर लोकांत अंतर निर्माण होते. लोकांशी चांगले वागले, त्यामुळे सुख वाढले, उत्तरासारखे प्रत्युत्तर येते. हे सगळे आपल्यावर अवलंबून आहे. तेथे जगाला बोल लावता येत नाही. आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे.

एखादा दुर्जन वाईट माणूस भेटला तर क्षमा करणे कठीण जाते अशा वेळी मौन बाळगून त्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. प्राणी नाना परीक्षा जाणतात, मात्र अंतर्मन जाणत नाहीत त्यामुळे ते करंटे ठरतात, याविषयी संदेह नाही. आपल्याला मरण आहे, म्हणून चांगुलपणा ठेवावा, असे विवेकाचे लक्षण कठीण आहे. लहान थोर समान, आपले परके सर्व जन सगळ्यांची मैत्री बाळगावी, हे बरे. चांगले केले तर चांगले होते हा तर अनुभव आहेच, आणखी कुणास काय सांगणार? हरिकथा निरुपण, चांगुलपणा बाळगून राजकारण, प्रसंग पाहिल्याशिवाय खोटे. विद्या उदंड शिकला, मात्र योग्य काळवेळ पाहून तिचा वापर करता आला नाही तर त्या विद्येला कोण विचारतो? इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरुपण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!