भावार्थ दासबोध -भाग १६४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १२ समास ३ भक्त निरुपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर अनेक लोक आहेत त्यांनी विचारपूर्वक वर्तन करावे. इहलोक आणि परलोक यांचा विचार करावा. इहलोक साधण्यासाठी जाणत्या लोकांची संगत धरावी तर परलोक साधण्यासाठी सद्गुरु पाहिजे.  सद्गुरूला काय विचारावे हेही अनेकांना समजत नाही. अनन्यभावाने शरण जावे आणि मग सद्गुरूला दोन गोष्टी विचाराव्या. या दोन गोष्टी कोणत्या? देव कोण आपण कोण या गोष्टींचे विवरण करण्यास सांगावे आधी मुख्य म्हणजे देव कोण आहे? आणि आपण भक्त तो कोण आहोत? पंचकर्म महावाक्य विवरण केलेच पाहिजे. सर्व केल्याचे फळ शाश्वत हे निश्चल आहे हे ओळखावे.

आपण कोण हा शोध घ्यावा. सारासार विचार केला तर शब्द हा शाश्वत नाही. तो जाणण्यासाठी आधी भगवंताला ओळखले पाहिजे. निश्चळ, चंचळ आणि जड हा केवळ मायेचा विस्तार आहे. यामध्ये वस्तू म्हणजे परब्रम्ह याचा समावेश होणार नाही. ते परब्रम्ह ओळखण्यासाठी विचारपूर्वक त्रैलोक्य हिंडावे. मायेचे विचार परीक्षा घेणाऱ्याने तोडून टाकावे. खोटे सोडून खरे घ्यावे. विविध लोकांची परीक्षा करावी. मायेचे सगळे स्वरूप जाणावे. माया ही पंचभौतिक आहे. माइक आहे ते नाश पावते. पिंड, ब्रम्हांड, अष्टकाया नाशवंत आहे. दिसेल तितके नष्ट होईल. उपजेल तितके मरेल.  रचेल तितके खचेल, असे मायेचे रूप आहे. वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल. कल्पांत काळ आल्यावर भुताला भूत खाईल. आहेत तितके देहधारक नष्ट होतील.

ही तर रोकडी प्रचिती आहे. मनुष्य नसेल तर त्याची उत्पत्ती कशी होईल? अन्न नसले तर उत्पत्ती कशी होईल? झाडे नसतील तर अन्न कसे निर्माण होईल? पृथ्वी नसेल तर झाडे कशी निर्माण होतील? पाणी नसेल तर पृथ्वी कशी निर्माण होईल? तेज नसेल तर पाणी नाही, वायू नसला तर तेज नाही असे जाणावे. अंतरात्मा नसेल तर वायू कसा निर्माण होईल? विकार नसेल तर अंतरात्मा असेल.  याचा विचार करा. पृथ्वी नाही, आपही नाही, तेज नाही, वायूही नाही. अंतरात्मा म्हणजे विकार नाही. तो निर्विकारी आहे. जे निर्विकार, निर्गुण आहे तीच शाश्वताची खूण आहे. संपूर्ण अष्टधा प्रकृती नाशवंत आहे. नाशवंत समजून घेतले तर असलेल्याचे नसलेले झाले! नाशवंत असे आहे हे समजल्याने समाधान मिळते.  विवेकाने विचार पाहिला तर मनाला सारासार दृष्टी येते. त्यामुळे हा विचार सुदृढ होतो. शाश्वत देव हा निर्गुण आहे अशी अंतरामध्ये खूणगाठ बाळगली पाहिजे. देव कळला, आता मी कोण? हे कळले पाहिजे. देह तत्व शोधायला हवे. मनोवृत्तीच्या ठाई मी तू पण आलेले असते.

सगळ्या देहाचा शोध घेतला तर मी पण दिसत नाही.  मी-तू पण हे तत्वतः तत्त्वांमध्ये विलीन झाले. दृश्य पदार्थच ओसरतात तेव्हा तत्वामध्ये तत्व सरते. मी पण-तू पण हे उरत नाही. फक्त वस्तू उरते. पंचीकरण तत्व विवरण महावाक्य वस्तू आपणच आहोत. मी पण विरहित समर्पण केले पाहिजे.  देव-भक्तांचे मूळ शोधून पाहिले असता आत्मा हा केवळ निरूपाधिक आहे हे लक्षात येते. मी पण बुडाले, वेगळेपण गेले, विवेकामुळे उन्मनी पद निवृत्तिपदास प्राप्त झाले. अनुभवामध्ये ज्ञान लय पावले. ध्येयच साकार झाल्याने ध्यान राहून गेले.  आब्रह्मस्तंभापर्यंत सर्वकाही कार्यकारण सापेक्ष आहे, असे समजून आल्याने त्या सर्वांचा त्याग केला.

जन्म मरण चुकले. सगळे पाप बुडाले. यम यातनेचे निःसंतान झाले. सगळी बंधने तुटली. विचारामुळे मोक्ष प्राप्त झाला. सर्व जन्माचे सार्थक झाले. नाना संशय नष्ट झाले. नाना भीती धाक संपले. ज्ञानविवेकामुळे अनेकजण पावन झाले. पतितपावनाचे म्हणजे परमेश्वराचे दास तेच जगाला पावन करतात. अशी ही प्रचिती अनेकांच्या मनाला आली. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे  भक्त निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.