भावार्थ दासबोध -भाग १९४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १४ समास आठ अखंड ध्यान निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अनुमानामुळे अनुमान वाढते, ध्यान धरले तर अनुमानाची सवय नष्ट होते. लोक उगीचच कष्ट करून स्थूल गोष्टींचे ध्यान करतात. देव देहधारी अशी कल्पना केल्याने नाना विकल्प निर्माण होतात. देहाच्या योगामुळे भोगणे, त्यागणे,विपत्ती उद्भवते. मनाला काहीतरी आठवतं, विचारल्यावर भलतंच होतं, नाना स्वप्नामध्ये जे दिसू नये ते दिसतं. दिसतं ते सांगता येत नाही. बळजबरीने भावार्थ धरता येत नाही. साधक अंतर्यामी कासावीस होतो. संगोपन ध्यान घडावे, त्यात मनामध्ये विकल्प निर्माण होऊ देऊ नये. इतरत्र वावरत असलेले मन एकच एका ठिकाणी गेले, त्याने खंडित ध्यान केले त्यामुळे कोणाचे सार्थक झाले पहा बरे.

अखंड ध्यानामुळे ज्याचे हित घडत नाही तो पतित जाणावा. याचा अर्थ सावधानतेने पहावा. ध्यान धरणारे कोण, ध्यानामध्ये आठवतं ते कोण? दोन्हीमध्ये एकच भाव असला पाहिजे. अनन्य सहजच आहे ते साधक शोधून पाहत नाही. ज्ञानी माणूस ते पाहून समाधान मिळवतो. अशी ही अनुभवाची कामें आहेत. प्रत्यय नसेल तर भ्रमाची बाधा होते. लोकांच्या रुढीनुसार संभ्रम निर्माण होऊन त्यानुसार प्राणी चालतात. रुढींचे पालन करून अवलक्षण केले जाते. प्रमाण आणि अप्रमाण बाजारी लोक जाणत नाहीत. खोटे समाचार उठवतात व उगाच बोंबा मारतात आणि मनामध्ये काहीतरी वेगळच खोटं आणतात. कोणी एक ध्यानस्थ बसला त्याला कोणी शिकवतं मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरं होईल. मनाच्या दृष्टीने कोणता दुष्काळ, माळ आखूड अशी कल्पना केली, असे सांगणारे आणि ऐकणारे दोघे मूर्ख जाणावे.

प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाहीत, दोरे फुले गुंफावे लागत नाहीत, कल्पनेची माळ थिटी करतात कशासाठी? बुद्धी नसलेले सगळे प्राणी जे जे करतो ते सगळे बाष्कळपणाचे असते त्या मुर्खांशी कोणी खळखळ करायची? ज्याने जसा परमार्थ केला तशीच पृथ्वीवर रूढी पडली आणि सातपाच अनुयायी मिळून अभिमान बाळगायला लागला. प्रत्यय नसलेला अभिमान म्हणजे रोग्याना झाकून मारल्यासारखं आहे. सगळंच अनुमान असेल तिथे ज्ञान कसं मिळेल? अशा तऱ्हेने सगळा अभिमान आहे तो सोडून द्यावा. अनुभवाद्वारे विवेक मांडावा. मायारुपी पूर्व पक्ष विवेकाच्या बळाने खंडित करावा.असे समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे अखंड ध्यान निरूपणनाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १४ समास ९ शाश्वत निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. देहाचे कौतुक पाहिले आणि आत्मअनात्म विवेक शोधला. देह म्हणजे अनात्मा. आणि आत्मा सगळ करणारा आहे. आत्म्याला अनन्य असं म्हणतात ते विवेकामुळे प्रत्ययाला आले. आता ब्रम्हांडरचना समजली पाहिजे. आत्मानात्मक विवेक हा जो पिंडामध्ये असतो तसाच सारासार विचार ब्रह्मांडामध्ये असतो. त्याचे विवरण करून घेतलं पाहिजे. तेच निरुपण पुढे करीत आहे. असार म्हणजे नाशवंत. सार म्हणजे शाश्वत.ज्याचा कल्पान्त होईल ते सार नव्हे. पृथ्वी पाण्यापासून झाली. पुढे ती पाण्याला मिळाली. पाण्याची उत्पत्ती तेजापासून झाली. तेजाने पाणी शोषले. महातेज आटून गेले. पुढे तेजच उरले. तेज वायूपासून झाले. वायु निर्माण झाला त्यामुळे तेज जाऊन सगळीकडे वायुच व्यापून उरला. वायू गगनापासून निर्माण झाला मग नंतर गगनातच तो विरला.

अशाप्रकारचा कल्पांत वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. गुणमाया मूळमाया परब्रम्हि लयास पावते. त्या परब्रम्हाचे विवरण करण्यासाठी विवेक पाहिजे. सर्व उपाधींचा शेवट जिथे होतो, तिथे दृश्य खटपट नाही त्या ठिकाणी सगळ्यांच्या ठाई निर्गुण ब्रह्म घनदाट असल्याचं दिसून येतं. अशी माहिती समर्थ देत आहेत. हा भाग येथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!