दशक १६ समास ३ पृथ्वीस्तवन निरूपण नाम समास तृतीय
जय जय रघुवीर समर्थ. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे तीन मजले रचलेले आहेत.पाताळलोकात भयंकर सर्प वगैरे राहतात. नाना वृक्षवल्ली, बीजांची खाणी म्हणजे ही विशाल धरणी आहे. येथे अभिनव कर्त्यांनी मोठमोठी कामे केली आहेत. गड कोट नाना नगर शहरे, गावे अशी मनोहर रचना आहे. सगळ्यांच्या ठाई परमेश्वर वस्ती करतो. पृथ्वीवर अनेक महाबली होऊन गेले. त्यांनी पराक्रम गाजवला, त्यांच्या सामर्थ्याने प्रसिद्ध झाले, पण पृथ्वीच्या शिवाय ते घडत नाही.
जगामध्ये अनेक जीव येतात जातात पण पृथ्वीला पर्याय नाही. किती नाना प्रकारचे जीवन पृथ्वीवर आहे त्याचा अंदाज लागत नाही. कित्येक लोक ‘माझी भूमी’ म्हणतात शेवटी आपणच मरून जातात. तर काही काळ कशीबशी जगतात. असा पृथ्वीचा महिमा आहे. त्याला दुसरी उपमा काय द्यावी? ब्रह्मादिकापासून आम्हा सगळ्यांना पृथ्वीचाच आश्रय आहे, असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पृथ्वी स्तवन निरूपणनाम समास तृतीय समाप्त.
दशक सोळा समास ४ आप निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आता सगळ्यांचं जन्मस्थान असलेल्या, सगळ्या जीवांचे जीवन असलेल्या, ज्याला आपोनारायण असे म्हणतात. पृथ्वीला आधार म्हणजे पाण्याचा समुद्र. सप्तसिंधूचे पाणी, नाना मेघांचे पाणी, भूमंडळावर चाललेले दिसते. नाना देशांच्या नाना नद्या,त्या वाहत जाऊन सागराला मिळतात. लहानथोर नद्या म्हणजे पुण्यराशी असून त्यांचा महिमा अगाध आहे. नद्या पर्वतावरून कोसळतात. नाना कपारीमधून खाली उतरतात, खळखळ पाणी वाहते. कूप, वावी,सरोवर तळीही उदंड थोर थोर आहेत.
नाना देशात निर्मळ झरे उचंबळतात. गायमुखी पाट वाहतात, नाना कालवे वाहतात, नाना झरे झीरपतात. डोह, विहीर, पाझर पर्वत फुटून पाणी वाहते असे पाण्याचे उदंड प्रकार भूमंडळावर आहेत. जितके डोंगर तितक्या धारा, भयंकर कोसळतात. झरा, ओहोळ, फवारे, उकळ्या सांडताना दिसतात. किती म्हणून सांगायचं? नाना कारंजातून पाणी भरून आणावे. डोह, डबके, लहान टाकी, नाना गिरीकंदर नाना ठिकाणचे पाणी वेगळे असते. एकाहून एक तीर्थ महापवित्र पुण्यदायक आहेत. त्यांचा महिमा अगाध असल्याचे शास्त्रामध्ये सांगितले आहे. नाना तिर्थांचे पवित्र पाणी नाना स्थळोस्थळी थंड पाणी, तसंच नाना ठिकाणी उष्ण पाणी दिसते. नाना वेलांमध्ये जीवन, नाना फळाफुलांमध्ये जीवन, नाना कंदमुळे यामध्ये जीवन आढळते. क्षारोदक, सिंधोधक, विषोदक, अमृतमय पाणी, नाना स्थळांच्या ठिकाणी नाना गुणांचे पाणी आढळते.
नाना उसाचे रस, नाना फळांचे नाना रस, गोरस, मध, पारा, गुळवणी, काकवी नाना मुक्ताफळांचे पाणी, नाना रत्नांमध्ये तळपणारे पाणी, नाना शस्त्रांमध्ये पाणी असे पाणी नाना गुणांचं असते. वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे सुध्दा पाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. नानाभेद विचार केला असता स्पष्ट होत जाते. समस्त देह हा पाण्याचा झालेला आहे, भूमंडळही पाण्याचे आहे. चंद्रमंडळ, सूर्यमंडळ देखील पाण्यामुळे आहे. क्षारसिंधू, क्षीरसिंधू, सुरासिंधू आज्यसिंधू, दधीसिंधू, युक्षरस सिंधू,शुद्ध पाण्याचा समुद्र असे पाणी विस्तारले आहे. ते मुळापासून शेवटापर्यंत आले आहे. मध्ये ठायी ठायी प्रगट झाले आहे ठायी ठायी गुप्त झाले आहे ज्या ज्या बिजामध्ये मिश्रित झाले तो तो स्वाद पाण्याने घेतला. उसामुळे ते अत्यंत सुंदर गोडीला आले. उदकाचा बांधा म्हणजे शरीर. त्याला त्यानंतर देखील उदकच पाहिजे!
उदकाचा उत्पत्तीविस्तार किती म्हणून सांगायचा? पाणी हे तारक आहे, पाणी हे मारक आहे. पाणी हे नाना सौख्य देणारे आहे. पाण्याचा विवेक अलौकिक आहे. भूमंडळावर पाणी धावताना नाना सुंदर ध्वनी उत्पन्न होतात. धबाबा धबाबा धारा कोसळतात. ठाई ठाई डोह तुंबतात, विशाल तळी भरतात. कालवे पाट दुधडी भरून वाहतात. काही गुप्त पालथ्या गंगा वाहतात, पाणी जवळच असतं. खळखळ झरे वाहतात. भूमीच्या गर्भामध्ये देखील डोह भरलेले आहेत. कोणाला पाहायला मिळाले नाही ना ऐकायला मिळाले नाही. ठाई ठाई भागीरथीचे झरे आहेत. पृथ्वीच्या तळाशी पाणी भरलेले आहे. पृथ्वीमध्ये पाणी खेळत आहे. पृथ्वीवर उदंड पाणी प्रगटलेले आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळामध्ये पाणी आहे. मेघापासून अंतराळातून पाण्याची वृष्टी होते. जीवन हे पृथ्वीचं मूळ आहे. जीवनाचे मूळ दहन आहे. दहनाचे मूळ पवन आहे. ते एकापेक्षा एक थोर आहेत. त्या सगळ्यांपेक्षा थोर परमेश्वर आहे. तो महाभूतांचा विचार आहे त्याहून थोर परब्रम्ह जाणावं. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आपनिरूपण नाम समास चतुर्थ समाप्त.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७