अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी ’यांच्या समृद्ध अभिनयाने गाजलेला :ओह माय गॉड २

0

पार्श्वभूमी
बॉलीवूडची हॉलीवूडशी नेहमीच तुलना होते आणि हॉलीवूडला जगामध्ये जास्त पसंती दिली जाते. ‘अॅक्शन आणि थ्रिलर’ या सेग्मेंटमध्ये हॉलीवूड निश्चितपणे पुढे आहे, यात काही वादच नाही. परंतु बॉलीवूड जरी हॉलीवूडच्या ‘अॅक्शन आणि थ्रिलर’ चित्रपटांची नक्कल करीत असले तरीही सामजिक विषयांना हाताळण्यात बॉलीवूड निश्चितपणे अग्रस्थानी आहे. एवढेच नव्हे तर सामाजिक विषयांवरील यशस्वी चित्रपटांची प्रसिद्धी लक्षात घेऊन त्या यशस्वी फॉरमॅटचा पुरेपूर लाभ उठवत इतर सामाजिक विषयांच्या बाबतीत समाज प्रबोधन करण्यात यशस्वी होत आहेत.

ओएमजी -२ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे ‘अक्षय कुमार आणि परेश रावल’ यांच्या समृद्ध अभिनयाने गाजलेला OMG हा चित्रपट खूप गाजला. विषयांचं गांभीर्य, परेश रावलचा कांजीभाई आणि एकुणात सादरीकरण याच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात आणि तिकीटबारीवर या चित्रपटाने भरघोस यश प्राप्त केलं. सध्याच्या युगात चित्रपटांना मिळालेल्या यशाचा पुरेपूर लाभ उठवण्याचा एक नवीन ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरु झाला आहे.

‘ओह माय गॉड ‘ चित्रपटातील नैसर्गिक आपत्तीने रस्त्यावर आलेला ‘कांजी भाई’ प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात आहे. या भूमिकेची प्रसिद्धी लक्षात घेऊन ‘नास्तिक ते आस्तिक’ हा कांतीभाईचा प्रवास ‘ओएमजी २’ या चित्रपटात दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दाखवला आहे. २०१२ सालीच्या त चित्रपटात ‘अक्षय कुमार आणि परेश रावल’ यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ‘देव, देवालय आणि देवत्व’ याची चेष्टा आणि न्यायालयात खेचण्याचा काल्पनिक आणि अकल्पित विषय घेऊनही समाजाने विरोध केला नाही.

परेश रावलचा कांजीभाई हुशार होता आणि जाणीवपूर्वक त्याने कोर्टात इन्श्युरन्स कंपनी आणि मंदिराच्या माध्यमातून देवांचा धंदा  करणाऱ्या दलालांना खेचले होते.  ‘ओएमजी २’ या चित्रपटात अक्षय कुमार सोबत भोळा कांती भाई म्हणून पंकज त्रिपाठीची निवड केली आहे. जन्मताच भोला-भाला चेहरा लाभलेला हा कांती भोलेनाथच्या गायडन्सखाली कोर्टात दाखल होतो आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देतो. देवत्व या विषयाचा प्रपोगंडा आणि वास्तविकता याच्यावरील उघड भाष्य यशास्वी ठरल्यानंतर एकुणात ‘जागतिकीकरणाच्याच्या गर्तेतील समाज, आधुनिक विज्ञान, सहज उपलब्ध ज्ञान आणि सध्याची शिक्षण व्यवस्था’ यांच्यात भरडली जाणाऱ्या पुढची पिढीची दिशाहीनता यावर ‘स्पष्ट, रोखठोक आणि मुद्देसूद’ भाष्य करण्यात हा नवीन चित्रपट निश्चितपणे यशस्वी झाला आहे. थोडक्यात काय तर विषयाचं ‘गांभीर्य, सच्चाई, मांडणी, कलाकारांची निवड, त्यांचा अभिनय आणि एकुणात मांडणी’ याचमुळे अशा चित्रपटांना प्रचंड यश लाभलं आहे.

प्रस्तावना
आई-वडिलांनी सांगितलेली एखादी गोष्ट मुलांना पटेलच असं नाही. परंतु तीच गोष्ट एखाद्या ‘प्रबोधनकार किंवा मॅनेजमेंट गुरु’ यांनी सांगितली की टाळ्यांच्या कडकडात स्वीकारली जाते. सध्याचा प्रेझेंटेशनचा जमाना असल्याने कितीही कडू जहर गोष्ट साखरेच्या पाकात घोळून सांगितली की हसतहसत गळ्याखाली उतरते. ओएमजी २ चं कथानक पहिल्यापेक्षा बरंचसं सोपं आहे. देव या संकल्पनेचा अस्वीकार करणारा नास्तिक कांजीभाई नैसर्गिक आपत्तीसाठी देवालाच न्यायालयात खेचतो. नवीन चित्रपटात अमित राय या दिग्दर्शकाने देवावर नितांत श्रद्धा असलेल्या भक्ताच्या मदतीने अतिशय महत्वाचा विषय त्याच्या पद्धतीने व्यवस्थित समाजापर्यंत पोहोचवला आहे.

खरंतर एकुणात शैक्षणिक धोरणात समाजाला ‘लैंगिक शिक्षण’ हवं की नको या विषयावर अनेक टिकाणी चर्चिला जातो, परंतु आजतागायत यावर ठोस निर्णय अथवा कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. तेवढ्यापुरता हा विषय चघळला जातो, टाळ्या वाजतात, आशा निर्माण होतात, आश्वासने दिली जातात, परंतु नंतर या विषयाचा साधा उल्लेखही होतांना दिसत नाही. परिणामस्वरूप नवीन पिढीसाठी शिकणाविना लैंगिक आकर्षणे मोबाईलच्या रूपाने बोटांवर विसावलेली आहेत. ‘पालक, शिक्षण व्यवस्था आणि समाज’ मुलांच्या हुशारीच्या कौतुकात त्यांचा अधोगतीकडे होणारा जलदगतीचा प्रवास हतबलतेने बघत आहेत. कारण लैंगिकता आणि लैंगिक भावभावना आणि जाणीवा या विषयावर उघडपणे बोलणे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. केवळ याच एकमेव कारणास्तव नवीन पिढीच्या एकुणात शिक्षणात ‘लैंगिक शिक्षण’ या विषयाचा ‘समावेश, त्यामागील विचार, तर्कशास्त्र, विज्ञान आणि आवश्यकता’ याला तिलांजली दिली जाते. समाजामध्ये एखाद्याने या विषयावर भाष्य किंवा वर्तन केल्यास त्याला असभ्य आणि पापी संबोधलं जातं, ही शोकांतिकाच आहे. आपल्या लैंगिक भावभावनांवर नियंत्रण नसलेल्या व्यक्तीला समाज सहजगत्या व्यभिचारी संबोधून मोकळा होतो.

कथासंहिता
लैंगिक अज्ञान, आधुनिकतेमुळे मुठीतील मोबाईल मधील अर्धवट ज्ञान, सततची आकर्षणे याचा बळी ठरलेला ‘विवेक’ या शालेय विद्यार्थ्याला आपल्या लैंगिक भावभावना यावर ताबा ठेवता न आल्याने शाळेतील शौच्यालयात केलेल्या कृतीमुळे शाळेतून बडतर्फ करण्यात येते. खरंतर स्वभावाने जरासा बुजरा असलेल्या विवेकला त्याच्या शाळेतील आठवी-दहावीतील विद्यार्थ्यांकडून त्याच्या ‘दिसणे, बोलणे आणि वावरणे’ याच्यावरून सतत चिडवले जाते आणि त्याच्या पौरुषतेवर चिखल उडवला जातो. मोबाईलच्या माध्यमाने लाभलेले अर्धवट लैंगिक ज्ञान, पौरुषतेबद्द्लच्या भ्रामक कल्पना याचे बळी ठरलेल्या या कंपूकडून हा सततचा मारा सहन न झाल्याने स्वत:ला कमजोर समजणारा विवेक बाजारात सहज उपलब्द्ध असणारया चुकीच्या औषधोपचारांच्या गर्तेत सापडला असतो आणि त्याचा उपयोग होत नसल्याने स्वत:ला अधिकाधिक कमजोर समजत असतो. शिवाय या विषयांवर घरच्यांशी बोलण्याची सोयच नाही आणि मित्रांशी बोललं तर चेष्टेचा विषय होण्याचीच शक्यता जास्त असल्याने व्यक्त होणार तरी कुठे, हा एक मोठ्ठा प्रश्न! परिणामस्वरूप आधुनिक इंटरनेट ते गावठी जडीबुटी असे सर्व पर्याय हाताळून हताश झालेली कुमारवयीन पिढी दिशाहीन होत आहे.

या चित्रपटाचा नायक ‘विवेक’चे वडील कांती मुद्गल शरण. महाकाल मंदिरापासच्या पूजासाहित्याच्या दुकानात नोकरी  करणारा ‘साधा-सरळ-सज्जन-शिवभक्त’ गृहस्थ आहे. त्याला आपल्या मुलाची ससेहोलपट दिसते आणि समजते आहे. पण स्वत: अशाच परंपरागत परिस्थितीत वाढला असल्याने या परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता त्याच्याठायी नसते. दिग्दर्शकाने कांतीच्या ‘कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक’ परिस्थितीचा दाखला देत समाजाला वास्तवाची जाणीव करुन दिली आहे. मग अशी व्यक्ती गरज पडल्यास आपल्या मुलाला भक्कम पाठींबा देत वाचवण्यासाठी काय, कसा विचार करेल आणि उपलब्द्ध साधनांचा कसा वापर करेल या धाग्यातून या चित्रपटाची मांडणी केली आहे.

शहरातील एक मोठी शिक्षणसंस्था, नावाचा दबदबा, आर्थिक ताकद, हुशार वकिलाची नेमणूक कामिनी यांच्या तुलनेत गरीब, अज्ञानी कांती, यांचा सत्र न्यायालयातील सामना पहिल्याच भेटीत संस्थेच्या ताकदीची, वकिलाच्या हुशारीची आणि त्यांच्या यशाची अनुभूती देतो. परंतु सुरुवातीस अज्ञानी वाटणारा कांती आपल्या मुलाच्या रक्षणासाठी, देवाच्या आशीर्वादाने विषयाचा सखोल अभ्यास करून तर्कशुद्ध पद्धतीने समाजाची आणि न्यायालयाची दृष्टी बदलण्यात यशस्वी होतो.

दिग्दर्शकाची करामत
या पिढीला, आपल्या वाढत्या वयातील मुला-मुलींना जवळ घेऊन ‘लैंगिक माहिती आणि संभाव्य धोके’ याबाबत स्पष्ट चर्चा करण्याची, गैरसमज दूर करून समजावून सांगणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी ‘पालक आणि शिक्षक’ दोघांनाही समन्वय साधून पुढाकार घेण्याची गरज आहे, यावर हा चित्रपट उघड भाष्य करतो. समाजमध्ये वावरतांना बायकोला बायको न म्हणता  ‘वाईफ किंवा पार्टनर’ म्हणणारा हा आपला बुजरा समाज लक्षात घेऊन दिग्दर्शक अमित राय याने चित्रांच्या माध्यमाने ‘शिस्न, योनी, लिंग’ या शब्दांचा स्पष्ट उच्चार करत त्या अवयवांची ओळख आणि कार्य समजून घेणं आणि समजावून सांगणं यात काहीही अश्लील नाही याची जाणीव करून दिली आहे.अर्थात या विषयाचं गांभीर्य, आशयघनता, अज्ञान, समाजाची हतबलता आणि न्यायालयातील वाद-विवाद आणि मोठ-मोठ्या संवादातून कधी उपदेश कधी संदेश देणारा असलेला हा चित्रपट, अतिशय गंभीर असावा, असा समज होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. परंतु दिग्दर्शकाने या मुद्द्याचा विचार करून वास्तवदर्शी तरीही हलका-फुलका आणि खेळकर पद्धतीने हा विषय मांडला आहे. त्यासाठी कलाकारांची केलेली सुयोग्य निवड आणि कथेबरहुकुम रचना करत हा कडू-जहर डोस समाजाच्या गळी उतरवण्यात यशस्वी झाला आहे.

शिवादूताच्या भूमिकेत अक्षय कुमारचा वावर गरजेपुरता, मोजका, खेळकर, आश्वासक राहिला आहे. पंकज त्रिपाठी हा मुळातच सर्वसामान्य भूमिकेत सहजी मिसळून जातो. भोळा चेहरा, देहबोली, हावभाव आणि आवाजावर असलेली हुकुमत त्याला मुलाची वकिली करणाऱ्या बापाच्या भूमिकेत शोभली आहे. कामिनीच्या भूमिकेत यामी गौतम हिने तिची भूमिका उत्तमपणे पेलली असून स्वत:चा पराभव स्वीकारण्याची वृत्ती दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तद्वतच न्यायाधीशाच्या भूमिकेत पवन मल्होत्रा याने गंमत आणली आहे. आरुष शर्मा याने विवेकच्या भूमिकेला न्याय दिला असून एकुणात सादरीकरण उत्तम झालं आहे. ओएमजी आणि ओएमजी २ यांच्यात तुलना होऊच शकत नाही. कारण पहिला पटकथा आणि दिग्दर्शन यांचा विचार करता आव्हानात्मक होता तर दुसरा साधासोपा वाटला तरीही अतिशय हुशारीने मांडला आहे, असं निश्चितपणे म्हणता येईल.
एनसी देशपांडे 
मोबाईल ९४०३४ ९९६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.