आमवाताचे लक्षणे ! आणि काय आहेत आयुर्वेदिक उपचार पद्धती 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
अनेक वेळा रुग्ण तक्रारी घेवून येतात की- सांधे सूजतात-सकाळी उठल्यावर अंग जड पडते,हात,पायांची बोटे वळतच नाही,दुखतात, दिवस व्यवस्थित सुरु झाला,सूर्य डोक्यावर आला की हात पाय बोटे सरळ होतात,वळायला सुरुवात होतात इत्यादी अनेक प्रकारच्या तक्रारी घेवून येतात इत्यादी असे रुग्ण आधुनिक शास्त्राचे उपचार घेवून आलेले असतात,पण आजारात फरक पडत नाही.यात रक्ताच्या तपासण्या केल्या जातात व शेवटी आधुनिक भाषेत संधिवात,rheumatoid arthritis असे निदान करून समोर प्रश्न चिन्ह करून उपचार चालू ठेवले जातात,यात स्टेरॉईड्स,वेदनाशामक औषधे यावर रुग्णांना ठेवले जाते सोबत कॅल्शिअम, जीवनसत्व बी १२ ची कमतरता असे निदानही त्यात करून त्याचे औषधे सुरु ठेवली जातात.असे उपचार करून थकलेले रुग्ण शेवटी आयुर्वेदाकडे फाईल्स घेवून येतात व त्यांची करूण कहानी सांगायचा प्रयत्न करतात. आयुर्वेद योग्य अशी रुग्णाची केस हिस्टरी घेतात व निदान करतात.साधारणत: अश्या तक्रारी घेवून् येणारे रुग्ण हे आमवात या आयुर्वेदीय निदानाचे असतात.अश्या या आमवात आजाराविषयी आज आपण बघणार आहोत.

१.आमवात म्हणजे काय व कसा हा आजार निर्माण होतो?
आमवात हा आजार संधीवाताप्रमाणेच आहे तसेच हा वाताचाच आजार आहे.फक्त आमवात व संधीवात यात लक्षणे भिन्न भिन्न असतात,व त्यावरून हा वेगवेगळा ओळखला जातो.हा आजार निर्माण कसा होतो हे जाणण्या आधी आपणा सर्वांनी  यापूर्वीच्या लेखांमध्ये आयुर्वेदातील धातुपरंपरा बघितली आहेच.रस धातु पासून् शुक्र धातु पर्यंत पोषण परंपरा आपण बघितली आहे.यात जेव्हा पहिला रस धातु विपरीत अन्नपचनाने तयार झाला तर उत्तरोत्तर धातु हे विकृत तयार होतात व याने वात दोषाचे संतुलन बिघडते .यात विकृत झालेला व खराब पचनातून तयार खराब कफ म्हणजेच यास आम असे म्हटले जाते.हे दोन्ही शरीरातील पोषण करणाऱ्या मार्गांना बंद करतात.परिणामी आमामुळे बिघडलेला वात दोष मोठ्या सांध्याच्या ठिकाणी विकृती निर्माण करतो.व आमवाताची निर्मिती होते.

२.आमवात निर्मिती चे कारणे काय ?
-भुक अजिबात न लागणे,व्यायाम अजिबात न करणे असे असताना भूक लागलेली नसताना, व्यायाम करत नसताना अतिशय स्निग्ध आहार घेणे किंवा विरुध्द आहार घेणे
-किंवा अतिशय स्निग्ध आहार घेणे व विरुध्दाहार करून लगेच व्यायाम करणे
-जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिणे,माठातील पाणी भरपूर् पिणे
-बेकरीचे आंबवलेले पदार्थ अतिप्रमाणात सेवन करणे
-जेवणा आधी, जेवणामध्ये भरपूर् पाणी पिणे
-दुपारी,रात्री जेवणानंतर लगेच झोपणे
-अतिशय तेलकट तूपकट पदार्थांचे सेवन करणे
-अतिप्रमाणात पालेभाज्यांचे सेवन करणे
-आधुनिक औषधांचे अत्यधिक प्रमाणात सेवन करणे
-चिकन गुनिया,डेंग्यु,मलेरिया यासारख्या आजारानंतर योग्य ते पथ्य न पाळणे
-बाहेरच्या पदार्थांचे अत्यधिक सेवन करणे
-वाईट सवयी असणे,व्यसन असणे
-शिळे पदार्थ सेवन सतत करणे
-दही,मासे,गूळ,नासलेल्या दूधाचे पदार्थ सेवन करणे
-दूध+मासे,दूध+खिचडी,दूध+फळे,चहा पोळी ,दूध+अन्न एकत्र खाणे
-वेळो अवेळी जेवण करणे,एकावर एक असे सतत खाणे,
-शौच,लघवी याचे वेग जावे वाटत असतानाही रोखणे
-जे पदार्थ शरीराला सहन होत नाही अश्या पदार्थांचे सेवन करणे
-माठातले ,फ्रिजमधले पाणी सतत पिणे,शीतपेयांचे अत्यधिक प्रमाणात सेवन करणे.
-जास्त प्रमाणात मोड आलेली कडधान्ये खाणे
अश्या प्रकारचे अनेक अपथ्य आमवात घडवून आणण्यास साहाय्यकारी ठरतात.

३.आमवाताची लक्षणे काय?
-मोठ्या सांध्यावर सूज असणे
-हाता पायांची बोटे सूजणे
-अंगात बारीक ताप असल्याप्रमाणे वाटणे
-सतत आळस,अंग जड वाटणे, झोप येणे,जांभया येणे ही लक्षणे दिसणे
-सांधे दुखणे,ठणकणे
-सांधे जखडल्यासारखे वाटणे
-सकाळी सांधे जखडणे ,हातापायांचे बोटे न वळण,सूर्य वर येताच हळू हळू बरे वाटणे
-सतत सांधेदुखीचे जागा बदलणे
-सांध्याच्या ठिकाणी स्पर्श गरम असणे व त्या ठिकाणी स्पर्श सहन न होणे.
-ह्रद्यात अस्वस्थपणा जाणवणे
-खाल्लेल्या अन्नाचे पचन न होणे,संपूर्ण अंगावर सूज येणे
-अतिप्रमाणात झोप येणे,लघवीस जास्त प्रमाणात जावे लागणे
-तोंडास सतत पाणी सुटणे
-अजिबात भूक न लागणे
अशी सर्व लक्षणे आमवातात दिसतात.

४.आमवातातील तपासण्या ?
-आयुर्वेदानुसार नाडी परिक्षा,शौच,लघवी,घाम,डोळे,जीभ,त्वचा,शरीर ,प्रकृती अश्या अनेक परिक्षा केल्या जातात,याशिवाय दर्शन(म्हणजे रुग्णास समोर व्यवस्थित बघणे),स्पर्शन(सांधे स्पर्श परिक्षण करणे),प्रश्न( रुगणाला प्रश्न विचारून सर्व इतिहास जाणून घेणे)
या लेखात वर आमवाताची निर्मीती दिलेली आहे ती निर्मिती प्रक्रिया  जरी दृश्य स्वरूपात नसली तरी लक्षणांवरून व इतर सर्व गोष्टींवरून याची खात्री नक्की होते.
आधुनिक शास्त्रात मात्र आम वाताची तपासणी RA FACTOR,SERUM URIC ACID TEST यासारख्या तपासण्या करून केली जाते.

५.आमवात लवकर बरा न झाल्यास काय complication होवू शकतात?
-आमवात हा खूप कष्टाने बरा होणारा आजार आहे.हा बरा न झाल्यास किंवा उशिरा उपचारास सुरुवात केल्यास ह्रद्याचे आजार,सांध्यामध्ये रचनात्मक,क्रियात्मक विकृती,ह्रद्यातील झडपा खराब होणे आदी ठिकाणी उपद्र्व निर्माण होतात.

६.आमवातावरील उपचार आयुर्वेदिय पध्दतीने कसे केले जातात?
अ) पथ्यपालन
ब)पंचकर्म उपचार
क)औषधोपचार
ड)रसायन उपचार
असे टप्पे येतात. यात पथ्यपालनात वर वर्णित सर्व अपथ्याचे वर्ज करून भोपळा,गिलके,दोडके,पडवळ,कारली,सूरण,शेवगा,आले,लसून,यव,कुळीथ,वरी,नाचणी,हिरवे मूग,शुंठ व नागरमोथा टाकून उकळलेले पाणी,डांगर,बटर काढलेले ताक,एरंड तेल,भाजलेले धान्य खाणे,बाजरीची भाकरी,कुळीथ यूष अश्या प्रकारचे अनेक विशिष्ठ पथ्य पाळणे.

यात पंचकर्मोपचार व औषधोपचार सोबतीने केल्यास लवकर् फरक पडतो.यात रुग्णास शरीरात तयार झालेल्या आमाचे म्हणजेच घाणेरड्या भागाचे पूर्ण पाचन करून भूक व्यवस्थित लागण्यास व योग्य त्या पध्दतीने पोट व आतडे साफ होण्यास औषधे दिली जातात व त्यानंतर पंचकर्मात बस्ती,विरेचन यासार्कहे ठोस उपचार केले जातात्.यात एरंड तेलाचा वापर भरपूर केला जातो.

औषधी उपचारात रास्नापंचक,रास्नासप्तक काढा,महारास्नादी काढा,एरंडमूळ,पुनर्नवा,अजमोदा,शुंठी,सिंहनाद गुग्गुळ.रास्ना गुग्गुळ,गोक्षुरादी गुग्गुळ,दशमूळ,भल्लातक,देवदार,रास्ना,गुळवेल,योगराज गुग्गुळ,गोमूत्र कॅप्सूल अश्या अनेक विध औषधांचा वापर केला जातो व आमवात बरा करण्यास मदत होते.

एकदा लक्षणे पकड मध्ये आल्यानंतर योग्य ती औषधे वापरून पुन्हा आजारहोवू नये याकरीता प्रयत्न केले जातात.आजार आटोक्यात येत नसल्यास वेळप्रसंगी सुवर्ण कल्पांचा देखील वापर केला जातो.

व एकदा बरा झाल्यास जानुबस्ती,सर्वांगधारा,पत्रपोट्टली,पिंडस्वेद,वाळुचा शेक आदी द्वारे शरीर स्थिर करण्याचे व सांधे व्यव्स्थित करण्याचे काम केले जाते.
रसायन चिकित्सेतसुवर्ण कल्प,क्षीरपाक म्हणजे दूधात उकळून घेण्याचे औषधे दिली जातात.

अश्या प्रकारे आपण योग्य पध्दतीने उपचार केल्यास आमवात या आजाराला जिंकू शकतो.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

 

मोबाईल -९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.