नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी : शेतकऱ्यांना दिलासा
नाशिक, दि.१० एप्रिल २०२३ – नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये शनिवारी अवकाळी पाऊस पडला. वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.
बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराणे, तर सटाणा, शेमळी, अजमोर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापूर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी ८ एप्रिल २०२३ रोजी बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाणचे प्रांत बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डाळिंब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेत शिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. गारपीट परवा झाली आणि आमचा अयोध्या दौरा परवाच होता. गारपीट होण्याआधी मी इथे यायला हवे होते ? असे विरोधकांना म्हणायचे आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी : शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.
दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.
महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी असा : अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार