नाशिक-लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृहे बंद असतांना नाट्यप्रेमी आणि नाट्यकलावंतांच्या’नाट्यरसिक, नाशिक’या समुहाने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करणे सुरू ठेवले होते. या पैकीच एक उपक्रम म्हणजे’नाट्यरसिक आयडॉल’ही स्पर्धा.’नाट्यरसिक आयडॉल’ही स्पर्धा म्हणजे नाट्यकलावंतांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले एकव्यासपीठ.या स्पर्धेची अंतिम फेरी रविवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६ या वेळात बेकर्स क्राफ्ट, दुर्गानगर, त्रिमुर्ती चौक येथे होणार असल्याची माहिती समुहाचे श्रीराम वाघमारे यांनी दिली. कल्पेश कुलकर्णी, प्रांजल सोनवणे व भारत मधाळे या तीन स्पर्धकांमध्ये हि अंतिम फेरी होणार आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी’आपली आवड’ही फेरी घेण्यात आली. सहभागी स्पर्धकांना त्यांना आवडणारी एखादी व्यक्तीरेखा यात सादर करावयाची होती. या फेरीत ३० नाट्यकलावंत स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. प्राथमिक फेरीमधुन महेंद्र चौधरी, सागर कोरडे, महेश खैरनार, कल्पेश कुलकर्णी, सतिश वराडे, भारत मधाळे, सई मोने, केतकी कुलकर्णी, प्रिया सुरते, श्रुती भावसार, ऋतुजा घाटगे, प्रांजल सोनवणे या १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली.
या १२ स्पर्धकांमध्ये लघुनाट्य, नाट्यछटा, एक ही फिल्मसे आणि न्रुत्य अशा विविध फेऱ्या घेण्यात आल्या. १२ मधुन १०, १० मधुन ७, ७ मधुन ४ आणि अंततः ४ मधुन ३ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेतील विविध फेऱ्यांना विवेक गरूड, माधुरी माटे, अभिनेते मिलिंद सफई, सिनेदिग्दर्शक सुहास भोसले, महाराष्ट्राची लावण्यवती उपविजेती क्षमा देशपांडे इत्यादींनी अतिथी परिक्षक म्हणून तर शुभांगी पाठक, विजय पवार यांनी नियमित परिक्षक म्हणून कामकाज पाहिले. तर पुनम पाटील, पल्लवी पटवर्धन, मुकेश काळे, जयदीप पवार यांनी या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
अंतिम फेरीत स्पर्धकांना काव्यअभिवाचन, गीत गायन, मनोगत सादरीकरण अशा ३ फेऱ्यांमधुन जावे लागणार आहे. अंतिम फेरीसाठी अभिनेता, दिग्दर्शक सचिन शिंदे परिक्षक म्हणून लाभणार आहेत. तर या प्रसंगी सुत्रसंचालन पुजा सोनार करणार आहे.
‘नाट्यरसिक आयडॉल’च्या यशस्वीतेसाठी अजय भावसार, कविता आहेर, संदीप पवार, भुषण भावसार, दिगंबर काकड, दिप्ती भालेराव, दुर्वाक्षी पाटील यांनी परिश्रम घेतले.