आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आपण एखाद्या प्रवासाला निघालो की आधी आपण कुठे जायचं ठरवतो, मग प्रवास कसा करायचा ते ठरवतो. कारने जायचं? रेल्वेने जायचं? की विमानाने प्रवास करायचा? हे ठरल्यानंतर मग प्रवासाची तयारी सुरू होते. तिकीट काढणं, तिकीट कन्फर्म झालं की बॅगा भरणं आणि फायनल प्रवासाला निघणं. मग एकेक टप्पा पार करत, एक एक स्टेशन ओलांडत आपल्या ठरवून ठेवलेल्या जागी सुरक्षित पोहोचलं की भरुन पावतं. फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातांना आपण इतकी जय्यत तयारी करतो, इतका सखोल विचार करतो, पण आपल्या मुलांच्या बाबतीत, त्यांच्या जीवनात रोज घडणाऱ्या प्रसंगांच्या बाबतीत, आणि त्या प्रसंगातून मुलांच्या जीवनावर आयुष्यभरासाठी होणाऱ्या संस्कारांच्या बाबतीत आपण इतके गाफील का राहतो ?