वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी,१२ भाविकांचा मृत्यू
चेंगराचेंगरीनंतर वैष्णोदेवीची यात्रा स्थगित
जम्मू – लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैष्णो देवी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.अचानक झालेल्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चेंगराचेंगरीनंतर वैष्णोदेवीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे
रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तरुण भाविकांच्या दोन समूहात वाद झाला. हा वाद चिघळून हाणामारी सुरू झाली. त्यामुळं घाबरून पळापळ सुरू झाली आणि हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक खासदार जुगल किशोर यांनी दिली आहे.
वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
Reasi, J&K | Vaishno Devi yatra resumes following a brief suspension after 12 people lost their lives in a stampede incident in Katra pic.twitter.com/n2xZO2wuj9
— ANI (@ANI) January 1, 2022