नात्यांचा कॅलिडोस्कोप
लेखिका - आदिती मोराणकर : मुलांच्या भावविश्वाच्या चढउतारांचा वेध घेणारी लेखमाला -२८
आदिती मोराणकर
कॅलिडोस्कोप फिरवल्यावर प्रत्येक वेळी एक नवीन चित्र तयार होतं. त्याला परत थोडा धक्का दिला तर त्याच्या आत असलेल्या मर्यादित काचेच्या तुकड्यांपासून अमर्याद आकृत्या तयार होतात. पुठ्ठा तोच, आरसे तेच आणि काचेचे तुकडेही तेच आणि तेवढेच, मात्र त्यांची दिशा फिरवली की आपल्या डोळ्यांना पुर्ननिर्मितीतून त्या काचा अद्भुत कलेचा आनंद देतात. आपल्या आयुष्याच्या कॅलिडोस्कोपचा विचार केला तर आई तीच, बाबा तेच आणि रंगीत काचेच्या तुकड्यांसारखे अनेक रंगीबेरंगी स्वप्न डोक्यात असलेली मुलंही तीच ! आपल्या नात्यांच्या कॅलिडोस्कोपचा आनंद घ्यायचा असेल तर तो कॅलिडोस्कोपदेखील आयुष्यात फिरवत रहायला हवा.
किती सहज वाटतात ना या गोष्टी? “आई-बाबा म्हणून आपल्याला सगळं कळतं, आम्ही जे काही करू तेच आमच्या मुलांसाठी योग्य असेल. त्याला काय समजतं? त्यांनी आमचं ऐकलं तर त्याच आयुष्यभर भलं होईल!” या मानसिकतेतून पालक म्हणून आपण बाहेर पडत नाही. “आपले आई-वडील आपल्याला समजून घेत नाही. नेमकं मला जे मनापासून करायचं असतं तेच मला करू देत नाहीत. मी त्यांच ऐकलं कि खूष असतात मात्र मी जिद्दीने काही गोष्टी माझ्या मनासारख्या केल्या तर ते रागावतात.” हे विचार मुलांच्या डोक्यामध्ये पक्के झालेले असतात. (अर्थात काही वेळेस त्यांना तसेच अनुभवही आलेले असतात. ) मुलांच आपल्याबद्दल मत तयार होण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याकडून त्यांना मिळालेली वागणूकच कारणीभूत असते असं नाही. कधीतरी त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या घरचे किस्से ऐकून, त्यांचे आई-वडील त्यांच्याशी कसं वागले यावरून ‘आपल्या घरी जर असं काही घडलं तर आपलेही आई-वडील असंच वागतील’ असा ठोकताळा मुलं करतात.
मध्यंतरी श्लोकची आई मला भेटायला आली. तसं बघायला गेलं तर श्लोकच्या घरचं वातावरण अतिशय खेळकर आणि आनंदी होतं. त्याच्या प्रत्येक योग्य निर्णयांमध्ये आई-वडिलांचा नुसता पाठिंबाच नाही तर उत्स्फूर्त सहभाग असायचा. अलीकडे मात्र श्लोकचं त्यांच्याशी वागणं बदललेलं होतं. तो मन मोकळं बोलत नव्हता. गमतीजमती सांगत नव्हता. इतकंच काय शाळेत होणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याला दुसरं बक्षीस मिळालं हेसुद्धा त्यानी घरी सांगण्याचं टाळलं.
ऑनलाइन शाळा असल्यामुळे स्पर्धा अर्थातच ऑनलाइन झाली होती. त्याचा निकाल पालकांना व्हाट्सअपवर पाठवण्यात आला होता. श्लोकचा दुसरा नंबर आल्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यासाठी आई त्याच्या खोलीत गेली तेव्हा तो मित्र-मैत्रिणींशी व्हिडिओ कॉल वर बोलत होता. विषय अर्थातच नुकत्याच झालेल्या स्पर्धेचा होता. त्यांच्या गप्पा ऐकणं प्रशस्त न वाटल्याने आईने रुमचं दार लावून घेतलं व आई बाहेर आली. त्याचा व्हिडिओ कॉल संपल्यानंतर तोही रूम मधून बाहेर आला आणि रोजची इतर कामं करू लागला. त्याचा मूड फार चांगला नाही असं बघून त्याच्या आईने कुठलाच विषय काढला नाही. रात्री जेवतांनाही तो गप्पच होता. शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून त्याचे बाबा म्हणाले, ”काय श्लोक स्पर्धेत दुसरा नंबर आला ना?” त्यावर तडकाफडकी तो म्हणाला, “तुम्हालाही आनंद झाला नसेलच ना? पहिला नंबर आला की सगळ्यांना आनंद होतो पण दुसरा आला की सुतकी वातावरण करता. मी पण पहिल्या नंबर इतकी मेहनत केली होती हे कोणीच समजून घेणार नाही का? पहिला नंबर आला की मिरवायचं आणि दुसरा नंबर आला कि मनस्ताप सहन करायचा! असं असेल तर मी यापुढे स्पर्धेत भागच घेणार नाहीये.” एवढं बोलून तो अर्धवट जेवणातून उठून त्याच्या रूममध्ये निघून गेला.
त्याच्या या प्रतिक्रियेमागचं कारण त्याच्या पालकांना काही केल्या सापडेना. आजपर्यंत कुठल्याही स्पर्धेत त्याने पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवला किंवा एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळवलंच नाही तरीसुद्धा त्याच्या सहभागाकरिता देखील त्याच्या आई-वडिलांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्याची उमेद कायम वाढवली होती. असे आई वडील ‘पहिला नंबर आला नाही म्हणून रागवतील’ असं श्लोकला का वाटलं असेल? या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न श्लोकची आई करत होती. थोड्या वेळ श्लोकशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याचा मित्र सोहम हा त्याच स्पर्धेत तिसरा आला होता आणि मोठ्या उत्साहाने ती बातमी त्याने त्याच्या पालकांना सांगितली होती. त्यानंतर जे काही घडलं त्याचा परिणाम सोहमवर तर झालाच, त्याच बरोबर श्लोकवर देखील झाला होता. सोहमने बक्षीस मिळाल्याची बातमी देताच “तिसऱ्या नंबरवर इतकं खुश होण्याचं काही कारण नाही. आपल्याआधी कोणीतरी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे याची लाज वाटू दे. ऑनलाईन असल्याने तुम्ही सगळेच अगदी हलक्यात घेताय. पुढच्या वेळेला पहिला नंबर आला तर एवढ्या उड्या मार. तिसऱ्या नंबरची काहीही किंमत नाही” या भाषेत त्याच्या पालकांनी त्याला खडे बोल सुनावले होते.
खरंतर स्पर्धेसाठी सोहमने देखील तासंतास तयारी केली होती. उत्साहात स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याला मिळालेल्या तिसऱ्या नंबरवर तो खरंच आनंदी होता पण त्याचा आनंद त्याच्या पालकांनी अडगळीत काढला होता. तसंच ‘माझ्या दुसऱ्या नंबरच्या बक्षिसाचं माझ्या आई-वडिलांना काय कौतुक वाटणार आहे? त्यांनाही मी कायम पहिलाच यायला हवा असतो का? माझ्या छोट्या छोट्या कामाचं ते कौतुक करतात, ते खरंच मनापासून असतं का? मला कौतुक करून करून पहिल्या नंबर पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो का? सगळे पालक पहिला नंबर मिळाल्याशिवाय समाधानी होतच नाहीत का?’ असे अनेक प्रश्न श्लोकच्या मनात निर्माण झाले होते. अर्थातच याला त्याचे स्वतःचे पालक जबाबदार नव्हते पण आता श्लोकचा थोडासा हललेला कॅलिडोस्कोप सुधरवण्याची जबाबदारी त्याच्याच पालकांची होती.
श्लोकचा मुद्दा लक्षात आल्यानंतर श्लोकच्या पालकांनी अतिशय सकारात्मकतेने आणि शांततेने त्याचं बोलणं ऐकून घेतलं. कुठलाही त्रागा न करता भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. “त्यावेळेस तुला आम्ही ना खुश आहोत किंवा आम्हाला तुझा पहिला नंबर यायला हवा होता असं कधी तुला वाटलं का?” असा प्रश्न त्यांनी श्लोकला विचारला. बराच वेळ विचार केल्यानंतर,” नाही, मला याआधी असं कधीच वाटलं नाही. उलट तुम्ही वेळोवेळी माझं कौतुक केलं त्यामुळे मला परत काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा होत होती.” अशी प्रांजळ कबुली श्लोकने दिली मग मात्र ‘यावेळी आपलं आपल्या पालकांबद्दल “रीडिंग” चुकलं’ याची त्याला स्वतःलाच जाणीव झाली.
श्लोक तोच होता, आई-वडील तेच होते, फक्त “कॅलिडोस्कोप” मधल्या काही काचा परिस्थितीनुसार विखुरल्या होत्या. त्यांनी कॅलिडोस्कोप थोडा हलवल्यावर त्या काचा परफेक्ट त्यांच्या जागेवर जाऊन चपखल बसल्या आणि एक नवीन, रंगीबिरंगी, एकमेकांत गुंफलेली सुंदर आकृती तयार झाली.
रोजच्या जगण्यात असे खूप प्रसंग येतात. कितीतरी गोष्टी आपल्यासमोर घडतात तर काही आपल्या वाचनात येतात. अलगद आपण त्या गोष्टींमध्ये हरवून जातो. कधीतरी त्या गोष्टींमधलं पात्र आपण स्वतः असल्याची जाणीव आपल्याला होते आणि मग त्या पात्रावर होणारा अन्याय, त्याला मिळणारी वागणूक आपल्यालाच मिळाल्याची भावना आपल्याही मनात निर्माण होते. आपण कुठेतरी त्या पात्राला “रिलेट” करायला सुरुवात करतो. तसंच काहीसं मुलांच्या बाबतीत कायम घडत असतं. आपल्याला सारासार विचार बुद्धीने निर्णय घेण्याची क्षमता केवळ अनुभवांमधून आलेली असते. काही गोष्टी आपल्या आयुष्यात आधी घडून गेलेल्या असतात. त्या गोष्टींचा आपल्या मनावर, शरीरावर, वागणुकीवर आणि एकंदर परिस्थितीवर झालेल्या परिणामातून आपल्याला चांगले वाईट अनुभव आलेले असतात. म्हणूनच तीच गोष्ट परत आपल्या समोर आल्यानंतर ती स्विकारायची कि टाळायची? आणि स्वीकारायची असेल तर किती मर्यादेपर्यंत स्वीकारायची? याचा निर्णय पालक म्हणून आपण घेऊ शकतो.
मात्र बालक म्हणून मुलांसमोर येणारे प्रसंग, प्रत्येक परिस्थिती ही त्यांचा पहिलाच अनुभव असतो. त्यातून त्यांना मिळणारा आनंद किंवा दुःख, समाधान किंवा नैराश्य त्यांना अनुभवु द्या. त्यांचे हेच नवीन नवीन अनुभव त्यांना संपन्न करतील आणि आपली मुले जेवढी संपन्न होतील तेवढ्याच त्यांच्या कॅलिडोस्कोपमधल्या रंगीत काचांचे तुकडे वाढत जातील. त्यातल्या काही काचा खूप रंगीबेरंगी असतील ज्या त्यांना मिळालेल्या आनंदाच्या, यशाच्या, समाधानाच्या असतील तर काही काचा मात्र त्यांना सामोरे जावे लागलेल्या दुःखाच्या, अपयशाच्या, नकाराच्या असतील; पण या ‘दोन्ही प्रकारच्या काचा एक सुंदर चित्र तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकतात’ ही बाब त्यांना शिकवण्यासाठी हा नात्यांचा कॅलिडोस्कोप रामबाण उपाय आहे.
एखाद्या प्रसंगांमध्ये आपण किती प्रकारे व्यक्त होऊ शकतो? याची पालक म्हणून जर आपण काळजी घेतली आणि त्या परिस्थितीत आपल्या मुलांसाठी योग्य अशी प्रतिक्रिया आपण मुलांना दिली तर आपल्या वागण्यातून मिळणार प्रेम, आपण त्यांना देत असलेली नवी उमेद आणि अपयश मिळाल्यानंतरही खचून न जाता परत नव्याने सुरुवात करण्याची जिद्द आपण मुलांना देऊ शकतो.
नात्यांचा कॅलिडोस्कोप हा अतिशय नाजूक असतो. जसा कॅलिडोस्कोप तसा बाहेरचा पुठ्ठा फाटला किंवा एखादा आरसा तडकला अथवा त्यातल्या काचा बाहेर आल्या तर तो कॅलीडोस्कोप निरुपयोगी ठरतो तसं नात्यांच्या कॅलिडोस्कोप मध्ये असणाऱ्या पुठ्ठायासारखं घट्ट धरून ठेवणारे पालकांचं आवरण जर विरळ झालं किंवा फाटलं तर त्याच्या आत बसवलेल्या मनाच्या आरशांना तडे जातात. अनेक प्रसंगातून गोळा केलेल्या रंगीबेरंगी काचा त्यातून बाहेर येतात आणि टोचण्यापलीकडे त्या काचांचा काहीही उपयोग होत नाही. कॅलिडोस्कोपमध्ये बंद असतांना आपल्या डोळ्यांना आनंद देणाऱ्या त्या काचा कॅलिडोस्कोप मधून बाहेर आल्यावर फक्त ‘कचरा’ म्हणून गणल्या जातात म्हणूनच पालक आणि बालक या दोघांनीही आपल्या “नात्यांचा कॅलिडोस्कोप” जीवापलीकडे जपायला हवा, वेळोवेळी हलकेच तो कॅलीडोस्कोप फिरवून नात्यांचे नवीन नवीन अनुभव घ्यायला हवेत.
कधी कधी मोठयांनी छोटेपणा आणि छोटयानी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर टिकून राहतो असं मला वाटतं. नवीन वर्ष सुरू होते आहे, नविन वर्षी नवा संकल्प करण्याची सवय आपल्याला झालेलीच आहे नाही का? २०२२ मध्ये आपण नात्यांच्या कॅलिडोस्कोला फिरवत राहण्याचा संकल्प करूया आणि यासाठी सगळ्यांचा सहभाग असेल असा आग्रह धरूया!
तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या मुला-मुलींना नवीन वर्ष प्रेमाचं, यशाचं, समाधानाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याचं जावो ही मनापासून शुभेच्छा! तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds