किशोरावस्था ते परिपक्वता या मार्ग तत्वांवर आधारित चित्रपट ‘उनाड’

0

पटकथा – आदित्य सरपोतदार, सौरभ भावे आणि कल्याणी पंडित. दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार. संगीत – गुलराज सिंह. कलाकार – अभिषेक भारते, देविका दफ्तरदार, आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, प्रियंका तेंडुलकर, प्रवीण प्रभाकर, अविनाश खेडेकर

प्रस्तावना
‘कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं देखील, खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात!’ अंतू बर्वा या व्यक्तीचित्रामध्ये पुलंनी एकुणात कोकण, तेथील निसर्ग आणि त्या निसर्गात ‘जन्मलेली, घडलेली रमलेली, रुजलेली आणि मुरलेली माणसं’ यांच्यातील साम्य आणि नातं याचं यथार्थ वर्णन नेमक्या शब्दात केलं आहे. आणि ते महाराष्ट्राच्या हृदयात कायमचं सामावलं आहे. कोकणाला पर्यटनस्थळ म्हणून भेट देतांना कोणीतरी कुठेतरी अंतू बर्वासारखी माणसं शोधत निश्चितपणे भटकत असतील, यात काही शंका नाही. अनेकजणांनी कोकणच्या अनेक फेऱ्या केल्याही असतील तरी परंतु नैसर्गिक आणि सामाजिक कोकण संपूर्णपणे माहित असलेला माणूस शोधून सापडणं कठीणच!

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील ‘हर्णे’ बंदरात मत्स्य व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो हे किती लोकांना ज्ञात आहे. तद्वतच येथील समुद्रात ‘सुवर्णदुर्ग’ नावाचा एक ऐतिहासिक किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये याची डागडुजी करून घेतली होती. आंजर्लेचा बीच, पांढरी वाळू आणि लांबचलांब समुद्रकिनारा सर्वोत्तम. हर्णे आणि आंजर्ले  ही गावं जवळजवळ असून मध्ये जेट्टीने खाडीतून प्रवास केल्यास अर्धातास सुद्धा लागत नाही.

असो आज इथे या दोन कोकणातील सौंदर्यस्थळांचा उल्लेख करण्याचं प्रयोजन एवढंच की दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी ही दोन गावं, इथला परिसर, मत्स्यव्यवसाय आणि बोटीचा व्यवसाय यातच गुंतलेली माणसं आणि त्यामुळे दिशाहीन जगणारी तरुणाई या विषयावर ‘उनाड’ या सिनेमाची कथा गुंफली आहे.

आंजर्ले आणि हर्णे या दोन निसर्गरम्य ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं असून इथल्या मातीशी जुळलेला माणूस, व्यवसाय, नाती-गोती, हेवे-दावे आणि आपुलकी या सगळ्या मानवी संबंधाचा समावेश या कथानकात करण्यात आला आहे. टिपिकल कोकणातील गावं, कोळीबांधव, निळाशार अथांग समुद्र, त्याच्या तालावर डोलणाऱ्या लहान-लहान होड्या, मोटारबोटी, दोन्ही काठांनी हिरव्यागार वनराईतून वळणा-वळणाचा रस्ता, त्याच्यावरून जुल्फ उडवीत मोटारसायकलस्वार, छोट्या-छोट्या वाड्या, कौलारू घरं, त्यातून पावसाळ्यात निथळणारं पाणी, असं सगळं अनुभवायला हवं असेल तर ओटीटी वरील जिओ सिनेमा प्रदर्शित ‘उनाड’ बघायलाच हवा.

कथासार
अगदी सामान्य कुटुंबातली, बंड्या, शुभम आणि जमील ही तीन मुलं, एकमेकांशी घट्ट मैत्री, तारुण्यात प्रवेश करतांनाची संवेदना, नुकतीच मिशी फुटायला सुरुवात झालेली, या तिघांचीही घरची परिस्थिती वेगवेगळी, स्वभाव वेगवेगळे आणि तरीही एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती, जमेल तेव्हा आणि जमेल तसा शिक्षणाचा विचार, दिवसभर हुंदडायला, पाण्यात डुंबायला वेळच पुरत नाही. बंड्याचा जीव चैतूत गुंतायला सुरुवात झालेली, जमिलकडून कुटुंबाला खूप अपेक्षा, दुबईला पाठवण्याची तयारी, ते ओझं घेऊन तो बुजल्यासारखा वावरतोय आणि शुभम हा बंधमुक्त जगणारा अवलिया. बेधडक, बिनधास्त आणि कोणत्याही बंधनाला न जुमानता आपल्या मर्जीचा राजा, रागीट, हजरजबाबी. यांच्या आयुष्यात पुण्याची स्वराचा प्रवेश होतो. ही पण बिनधास्त, हसरी आणि मोकळ्या स्वभावाची असल्याने शुभमचा गैरसमज होतो. तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेमभावना फुलत-फुलता त्याच्या चुकीच्या वागण्याने स्वरा दुखावते आणि नकळतपणे फुलणारे संबंध संपुष्टात येतात. मुळातच रागीट, संतापी आणि अतिरेकी स्वभाव, त्यात स्वराकडून अपमानित झालेला शुभम तिच्या मागावर रहातो आणि भलतीच चूक करून बसतो. या एकुणात प्रकाराने तिघंही सैरभैर होतात. परिणामस्वरूप शुभम, बंड्या आणि जमील यांना मारामारीला सामोरे जावं लागतं. पळापळ करताकरता लपण्याच्या प्रयत्नात शुभम एका बोटीत प्रवेश करतो, जी मासेमारीसाठी बराच काल समुद्रातच फिरणार होती. शुभमचा हा जबरदस्तीचा सामुद्रीप्रवास त्याच्याबद्दल गावात गैरसमज पसरवतो, तो पळून गेल्याची अफवा पसरते आणि पोलीस त्याच्या शोधात सगळ्यांनाच धारेवर धरत सुटते.परंतु कामाची, जबाबदारीची आणि कर्तव्याची जराही जाणीव नसलेल्या शुभमला, तांडेल बोटीवरची कामे करायला सांगतो. परंतु शुभम चक्क नकार देतो. जो आमचा नाही त्याला जेवण नाहीमग त्याला जेवणच मिळत नाही. भुकेसाठी शरणागती पत्करावी लागते आणे तो त्या बोटीवरच्या खलाशीमंडळीत रमतो, काम करायला लागतो आणि आपली उपयुक्तता सिद्ध करतो. त्याच्या अनुपस्थितीत गावातील वातावरण पूर्णत: त्याच्या विरोधात बनलेलं असतं.

बोटीवरच्या वास्तव्यात शुभममध्ये बराच फरक पडलेला असतो. जबाबदारीची जाणीव, आपली कर्तव्ये, आपलं वर्तन, बेदरकारपणा, दुसऱ्याला न जुमानण्याची प्रवृत्ती, आजवर केलेल्या चुका आणि आईवडिलांची विचारधारा. या सर्व बाबतीत आमुलाग्र बदल घडलेला असतो. तद्वतच आकारण पोलीस स्टेशनची हवा खावी लागल्याने दुबईसाठीचे पैसे खर्चून जमील सुटतो. त्यालाही आपल्या घरच्यांची एकुणात परिस्थिती ज्ञात होते आणि वडिलोपार्जित बेकरी व्यवसायाची धुरा तो सांभाळायला लागतो.या एका घटनेमुळे या तिघांच्याही आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं.

लेखन आणि दिग्दर्शन
या चित्रपटाला तशी कथानकाची गरजच नाही. कारण दिग्दर्शकाने कोकणातला ‘निसर्ग आणि माणूस’ यांच्यातील नातं, इथली माणसं, त्यांचं राहणीमान, लहानलहान बोळकांड्या, त्यातून सैरावैरा हुंदडणारी पोरं, शिक्षणामुळे कौटुंबिक व्यवसायात स्वारस्य नसलेली तरुणाई, त्यांच्यातील मैत्री, प्रेमसंबंध, आईवडील दोघंही उपजीविकेसाठी झगडत असताना, आई-वडिलांचा, त्यांच्या व्यवसायाचा मनसोक्त धिक्कार करत उनाडपणे जगणारी तरुणाई याचं चलतचित्रण करत कथानक विणलं आहे. केवळ संदर्भासाठी रचलेली पात्रं, हीच त्या कलाकारांची ओळख असल्याने प्रसिद्ध चेहरे घेण्याची गरज दिग्दर्शकाला अजिबात वाटली नाही.

कोवळी मनं, नितळ, निखळ, तरल भावभावना यांचा सुरेख मिलाप, सोबत मनोरंजन आणि खूप काही दाखवण्याचा, देण्याचा आणि प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न १०० % यशस्वी झाला आहे. प्रत्येक दृश्य, साधे रोजच्या व्यवहारातले संवाद, चपखल अभिनय आणि अनुरूप संगीत या सगळ्या बाबींचा अप्रतिम परिणाम प्रेक्षकांवर होतो. दिग्दर्शकबरहुकूम लॉरेन्स डिसुझा यांचं छायाचित्रण खूपच सुंदर आहे. प्रत्येक प्रसंग, दृश्य, फ्रेम याला वेगळी पद्धत वापरल्याने संवादापेक्षाही हे प्रसंग जास्त बोलके होतात आणि प्रेक्षकांशी संवाद साधतात. आजची तरुणाई अपेक्षांच्या ओझ्याखाली घुसमटून गेली आहे. शहरातील तरुणाई शिक्षणाच्या स्पर्धेत धावते आहे तर खेड्यापाड्यातील अर्धवट शिक्षित पोरं आईवडिलांच्या उपजीविकेचा मनसोक्त धिक्कार करत दिशाहीन भरकटते आहे. लेखकाने समाजप्रबोधनाचा दावा केलेला नाही. साध्या कहाणीतून परिस्थिती केवळ मांडली आहे. परंतु प्रेक्षकांना कथानकात आणि या तिघांमध्ये गुंतून ठेवण्याची किमया साधली आहे. मूळ कथानक आणि तांत्रिक बाबी यांचा सुरेख संगम या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो.

सारांश
कोळीवाड्यातल्या तीन जिवलग मित्रांची ही कहाणी. यातील भूमिका या प्रतीकात्मक आहेत. त्यांच्या माध्यमाने हा चित्रपट कोकणातील तरुणाई, त्यांच्यातील मैत्री, केवळ उनाडपणा करण्यात दिवस घालवायचा, एवढंच उद्दिष्ट, मुलामुलींना एकमेकांबद्दलचं वाटणारं आकर्षण, स्वत:चं असं काहीच अस्तित्व नसल्याने अव्यक्त प्रेम, कोवळं मन, अपराधीपणाची भावना, चुकीच्या निर्णयाचं परिमार्जन आणि जीवनाची दिशा सापडल्याचा आनंद असे आपोआप घडणारे संस्कार, याचं सुंदर वर्णन बघायला मिळतं. ‘शुभमच्या’ भूमिकेसाठी आशुतोष गायकवाड याने आपली जबाबदारी पार पाडली आहे. अभिषेक भारतेचा ‘बंड्या’ आणि चिन्मय जाधवचा ‘जमील’ रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. हेमल इंगळे हिने स्वरा मस्त रंगवली असून देविका दफ्तरदार, प्रियंका तेंडुलकर, प्रवीण प्रभाकर, अविनाश खेडेकर यांनी आपापली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आहे. संदेश जाधवचा तांडेल विशेष आकर्षित करतो.

जिओ सिनेमा – उनाड

एनसी देशपांडे
मोबाईल – 9403499654

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.