ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांचे निधन 

0

पुणे,दि,१३ जानेवारी २०२४ –ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांचे पुण्यात आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने   निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,त्याआधीच त्यांचे निधन झाले होते. डॉ. प्रभा  अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील. दोनच वर्षांपूर्वी कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

दुर्दैवी गोष्ट म्हणजे आज मुंबईत त्यांचा कार्यक्रम ठरला होता. यासाठी त्या मुंबईला येणार होत्या,मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.उस्ताद राशिद खान यांच्या निधनाच्या वृत्तातून संगीत विश्व सावरत असतानाच आणखी एक धक्का बसला.

स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांच्या निधनाने संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शोकसंवेदना
स्वरयोगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन, भावगीत गायकीवरही अत्रे यांचे प्रभुत्व होते. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभावान आणि श्रेष्ठ कलावंताला मुकला आहे, अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

त्यांचे गायन कला क्षेत्राला प्रेरणा देणारे व रसिकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ‘किराणा ‘ घराण्याच्या गायिका असलेल्या प्रभाताई या बालपणापासून संगिताची आराधना करीत होत्या. विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन करणाऱ्या अत्रे यांनी संगितात डॉक्टरेटही केली. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचविणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर प्रभाताईंना सद्गती देवो.मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि सर्व संगीत चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे,असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
___________________________

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, पद्मविभूषण प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून लौकिक असलेल्या प्रभाताईंनी तब्बल सात दशके अविरतपणे संगीतसेवा केली. वयाच्या ९२ व्या वर्षी देखील त्या गायन क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांच्यासारख्या संगीतक्षेत्राला वाहून घेतलेल्या गायिकेचं निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची अपरिमित हानी आहे.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!
छगन भुजबळ,
मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,महाराष्ट्र राज्य
________________
जागू मैं सारी रैना बलमा….
लहानपणी ही बंदिश कानावर पडली आणि अक्षरशः झपाटलो गेलो त्या दैवी स्वरांनी. त्या वेळी हे कोण गातंय, काय गातायत, राग कोणता हे काहीही माहित नसतानाही प्रभा ताईंच्या जादुई स्वरांनी खेचून घेतले होते. एखादे आवडते गाणे जसं आपण सारखं सारखं ऐकतो तसा प्रभाताईंचा मारूबिहाग ऐकायचं जणू वेड लागले.

दैवी स्वच्छ निकोप, सुरेल आवाज. भगवंताचा त्यांच्या आवाजाला स्पर्श झालेला असावा इतका सात्विक आणि दैवी स्वर होता प्रभाताई यांचा. किराणा घराण्याचे सुरेल प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या प्रतिथयश गायिका होत्या. त्यांच्या अनेक  मैफिल प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. मैफिलीतील प्रत्येक श्रोता देहभान हरपून त्यांना ऐकत आलाय. संगीताच्या विद्वत्तेचे तेज त्यांच्या गायकीतून झलकत असे. शास्त्रीय संगीत शिकणारे अनेक त्यांचे विद्यार्थी आहेत. स्वतः ची संगीत साधना करत असतानाच ज्ञानदानाचे पुण्यकर्म त्यांनी शेवटपर्यंत केले.
प्रभाताईंनी गायलेले मारुबिहाग, कलावती, यमन, इ. केवळ अविस्मरणीय. त्यांची मेहफिल ही केवळ मैफिल नसे त्यातून त्या गात असलेल्या रागाविषयी माहिती श्रोत्यांना देत असत त्यामुळे श्रोत्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गाणे अधिक प्रभावीपणे समजत असे. सौंदर्यपूर्ण गाणे कसे असावे याचा उत्तम परिपाठ म्हणजे प्रभाताई यांचे गाणे. शास्त्रीय संगीतात डॉक्टरेट असलेल्या प्रभाताई कित्येक विद्यार्थ्यांचे आदर्श आहेत आणि राहतील. भुतलावावर आपल्या मेहफिलीची सांगता करून त्या गंधर्वलोकी गेल्या आहेत तिथेही त्यांच्या गाण्याने संगीताचे दालन समृद्ध करतील यात शंका नाही… अशा या थोर विदुशी डॉ. प्रभा अत्रे यांना शतशः नमन आणि विनम्र श्रद्धांजली
विवेक केळकर, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.