पुणे – संगीत रंगभूमीवर आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे पुण्यात निधन झालं आहे. त्या ७० वर्षाच्या होत्या.गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून किर्ती शिलेदार यांना कलेचा वारसा मिळाला होता.
२०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.वयाच्या दहाव्या वर्षी ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर त्या थांबल्याच नाहीत. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता.
तमाशातल्या मैनेपासून ते शास्त्रीय संगीतपर्यंतच्या गायणाच्या अनेक छटा किर्ती शिलेदार यांनी यशस्वीपणे सादर केल्या.विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर करत ते गाजवले. भारतासह परदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली आहेत. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी गाजवली. यातील एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी काम केले. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कीर्ती शिलेदार यांच्याविषयी
कीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म पुणे येथे १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला.
वडील आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्यामुळे संगीत व अभिनय यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले.
वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले.
संगीत स्वरसम्राज्ञी, संत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी , स्वयंवर, मंदोदरी, संगीत सुभद्र, संशय कल्लोळ अशा अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका साकारल्या कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या.
महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) हे त्यांना मिळालेले काही मानसन्मान होत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली
संगीत रंगभूमीची व्रतस्थ शिलेदार
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.
शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.