83 …..गत स्मृतींना उजाळा ……
८३ या चित्रपटा विषयी- सुप्रसिद्ध नाट्य-चित्रपट समीक्षक एनसी देशपांडे यांच्या लेखणीतून
एनसी देशपांडे
पार्श्वभूमी
आज आपण सर्वजण कौतुकाने हा चित्रपट बघायला दाखल होत असतांना, एक बाब प्रामुख्याने विसरतो की, वर्ल्डकपच्या त्या टूरला गेलेल्या त्या संघविषयी प्रेम आणि आत्मविश्वास आपल्या मनात अजिबात नव्हता. कारण अर्थातच त्यापूर्वी इंग्लंडला नमवून वेस्ट इंडीजच्या संघाने ७५ मध्ये वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं आणि ७९ मध्येही त्यांची दादागिरी राखली होती. त्यामुळे माल्कम मार्शल, अँडी रॉबर्टस, जोएल गार्नर यांच्या तुफानी माऱ्यासमोर आपला संघ तर टिकणारच नाही. शिवाय क्लाइव्ह लोंइड, व्हिव्हियन रिचर्डस, गार्डन ग्रीनिच आणि डेसमंड हेन्स आपल्या गोलंदाजांची पिसं काढणार, याचीच खात्री जास्त होती.
परंतु न भूतो न भविष्यती, अपेक्षा आणि कल्पना नसतांनाही अविश्वसनीय असंच घडलं होतं. अर्थात त्यामागे कपिलदेव रामलाल निखंज, हा केवळ २३-२४ वर्षांचा मुलगा होता, यावर कोणाचा विश्वास आजही बसणार नाही. कारण त्या संघामध्ये सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमाणी, संदीप पाटील अशी सर्व सिनियर मंडळी होती. आईची शिकवण, आत्मविश्वास, जिद्द आणि संघाला प्रेरित करण्याची क्षमता या बळांवर कपिलने या वर्ल्डकपवर भारताचं नाव कोरलं.
वय वर्षे ५०-६० च्या समस्त क्रिकेट प्रेमींच्या हृदयात साठवलेल्या सुखद आठवणींना उजाळा, हाच या चित्रपटाचा पाया आहे. आजही त्या दिवसाची आठवण होताच सामना बघण्यासाठी TV असलेल्या घरात गर्दी करावी लागत होती. त्या गर्दीतही हालचाल आणि कुजबुज करण्याची सोय नव्हती. जसं काही नियम तोडला तर विकेटच पडणार होती. इतकी निरव शांतता. त्यातही जरा प्रक्षेपण बिघडलं की TVचा अँटेना सेट करण्यासाठी एक्सपर्टस ठेवलेले होते. व्हिव्हियन रिचर्डसची तुफान फलंदाजी बघतांना आपण आता हरतो आहोत याची मानसिक तयारी सर्वांचीच झाली होती. तशातच विद्युत पुरवठा बंद पडला आणि TV प्रक्षेपणही. आपण हरलो आहोत या दु:खात असतांनाच पुन:श्च TV सुरु झाला आणि व्हिव्हियन रिचर्डसचा झेल कपिलने घेतल्याची बातमी समजली.
हुश्श हुश्श हुश्श करत एकमेकांना टाळ्या देतांनाच आता आपण जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मोहिंदर अमरनाथने शेवटचा बळी मिळवला आणि भारताने विश्वकप जिंकल्याची अविश्वसनीय बाबीवर एकदाचा विश्वास बसला. हे सगळं अनुभवलेली तमाम मंडळी हा चित्रपट बघतांना पुन:श्च जगतांना आढळतात. त्यावेळी सगळी क्रिकेटप्रेमी मित्रमंडळीच सोबत होती. आता प्रेक्षागृहात अनोळखी मंडळींच्या सानिध्यात हा आनंद सोहळा तसूभरही कमी वाटत नाही. वाढलेल्या वयाच्या निर्बंधानुसार प्रत्यक्ष ओरडून हा आनंद व्यक्त करता येत नाही, एवढंच…. बाकी भावना जशाच्या तश्याच …… अर्थात कबीर खानने या प्रसंगांचा निश्चितपणे खूपच अभ्यास केल्याचे प्रकर्षाने जाणवते.
अजिंक्य राहिलेल्या संघातील प्रत्येक खेळाडू आजही त्या आठवणींना जतन करून आहे आणि तीच त्या प्रत्येकाची ओळखही. गेल्या ३५-३६ वर्षात यांच्यापैकी प्रत्येकाने आपल्या मुलाखतीत या संपूर्ण प्रवासाची कहाणी कोणताही आडपडदा न ठेवता अनेकदा कथन केलीय. ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्या देशासह संपूर्ण जगाच्या गृहितकांना सुरुंग लावला आहे. कदाचित याच नकारात्मक विचारधारेने कप्तान कपिलदेवच्या मनात एक जिद्द निर्माण केली असावी. कारण एक संघ व्यवस्थापक मानसिंग वगळता प्रत्येकाने या संघाची कुचेष्टाच केलेली आढळते.या चित्रपटाला स्वत:चं असं एक ताकदवर कथानक आहे. ज्याची खडानखडा माहिती प्रत्येक भारतीयाच्या मनात साठवलेली असल्याने कोणत्याही चित्रपट निर्माता दिग्दर्शकाला या विषयावर चित्रपट बनवतांना मूळ कथानकाशी छेडछाड करून सिनेमॅटीक लिबर्टीच्या आधारे मालमसाला भरण्याची मुभा अजिबात नव्हती. किंबहुना भारतीयांच्या मनात पुजलेल्या या व्यक्तीचित्रांना जसंच्यातसं प्रदर्शित करण्याची जबाबदारी मात्र निश्चित होती.
बलस्थाने
• विश्वकप – ७५ आणि ७९ सलगपणे विश्वकप जिंकून क्रिकेट विश्वात दहशत निर्माण करणाऱ्या वेस्ट इंडीज संघाला धूळ चारून १९८३ मध्ये विश्वकप जिंकलेल्या भारतीय संघाच्या कामगिरीची सुखद आठवण आणि प्रत्येक प्रसंगाची हृदयात साठवण.
• लेफ्टनंट कर्नल कपिलदेव १९७९-८० अर्जुन पुरस्कार, १९८२ – पद्मश्री, १९८३ – विस्डेन – क्रिकेटर ऑफ द इयर, १९९१ – पद्मभूषण, २००२ – विस्डेन – इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी आणि २००८ मध्ये इंडियन आर्मीत मानद लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्त झालेल्या या ऑल राउंडर क्रिकेट खेळाडूने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली.
• कबीर खानद जर्नलिस्ट अन्ड जिहादी, आऊट ऑफ द अशेस, पटेल एस.आय.आर., हिचकी, द फॉरगॉटन आर्मी, सुलतान, काबुल एक्स्प्रेस, न्यूयॉर्क, एक था टायगर, फटम, ट्यूबलाईट आणि बजरंगी भाईजान या यशस्वी चित्रपटांचा दिग्दर्शक.
कास्टिंग डिरेक्शन
हा चित्रपट बनवायचा विचार मनात आल्यावर सर्वप्रथम जबाबदारी येते ती या संघाच्या प्रत्येक सदस्याला अनुरूप अश्या कलाकाराची निवड, जी कबीर खान ने उत्तमपणे निभावली आहे. कपिलदेव – रणवीर सिंग, सुनील गावस्कर – ताहीर राज भसीन, श्रीकांत – जीवा, बलाविंदर संधू –अॅमी विर्क, संदीप पाटील – चिराग पाटील, रॉजर बिन्नी – निशांत दहिवा, मोहिंदर अमरनाथ – साकिब सलीम, रवी शास्त्री – धारिया करवा, सय्यद किरमाणी – साहिल खट्टर, दिलीप वेंगसरकर – आदिनाथ कोठारे, मदनलाल – हार्डी संधू आणि यशपाल शर्मा – जतीन सरना.लाला अमरनाथ – मोहिंदर अमरनाथ, फारुख इंजिनियर – बोमन इराणी.
प्रसंगानुभव
२५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने एक इतिहास रचला आणि त्या रात्री कोणीही झोपू शकलेले नाही. संपूर्ण देश या आनंदोत्सवाने सुखावला होता आणि दिग्दर्शक कबीर खानने हाच दिवस रिक्रिएट करण्यात यश मिळवले आहे. त्यासाठी अर्थातच कपिलदेवची विश्वकप जिंकण्याची जिद्द, पदोपदी सर्वांकडून झालेली मानहानी, परदेशात पोहोचल्यानंतर मिळालेली वागणूक, विंडीज टीमची दहशत, त्यांचं सगळ्यांकडून होणारं कौतुक, मिडीयाने भारतीय टीमकडे केलेलं दुर्लक्ष, भारतीय वरिष्ठांनीच उडवलेली संघाची खिल्ली आणि दोन्ही हातात उंचावलेला विश्वकप, हे सर्व प्रसंग जसेच्यातसे अनुभवतांना डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय रहात नाही. एकीकडे सामने जिंकत फायनल पर्यंत पोहोचलेली भारतीय टीम आणि दुसरीकडे सीमेवर पाकीस्तानकडून जाणीवपूर्वक होणारा गोळीबार, सरकार दरबारी क्रिकेट विषयीची अनास्था, हिंदू-मुसलमान मधील दंगे अशा नकारात्मक परिस्थितीत पंतप्रधानांचा या सामन्याला एक सण बनवण्याचा फतवा, प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी पाकीस्तानकडून गोळीबार न होण्याचे आश्वासन ……
अशा प्रत्येक प्रसंगाचं प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो आणि संपूर्ण प्रेक्षागृह प्रत्यक्ष सामन्याचा आनंद घेण्यासाठी सरसावून बसतं, असं घडणारच हा दिग्दर्शकाचा होरा अचूक असल्याने, त्यानुसार त्याने या सगळ्या प्रसंगांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय आहे. प्रत्येक प्रेक्षक प्रत्यक्ष सामन्यात इतका गुंतलेला असतो की त्याच्या समोर हे प्रसंग साक्षात उभ्या करणाऱ्या कबीर खानला दाद द्यायचीच विसरून जातो. हे असंच घडणार याचीही कदाचित कबीर खानला कल्पना असेल.
अभिनयानुभव
कपिलदेवच्या भूमिकेसाठी रणवीरसिंगची केलेली निवड सुयोग्य, अचूक आणि कौतुकास्पद. त्याने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते. कपिलची देहबोली, उभं राहण्याची, बोलण्याची, चालण्याची आणि गोलंदाजी करण्याची स्टाईल अगदी हुबेहूब करण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय निश्चितपणे. शिवाय कपिलचा आवाज, जन्मजात लाजाळूपणा आणि सहकार्यांशी असलेले संबंध, त्यांच्याशी संवाद साधण्याची पद्धत आणि समजून-समजावून घेण्याची एकुणात पद्धत इतक्या सहजतेने साकारली आहे की त्याला तोड नाही. तद्वतच मोहिंदर अमरनाथ, श्रीकांत, रॉजर बिन्नी आणि सुनील गावस्कर सुद्धा ओळखीचे वाटतात. कपिलदेवच्या पत्नीची म्हणजेच रोमीची भूमिका दीपिका पदुकोन या अभिनेत्रीने साकारली आहे. समालोचकाच्या भूमिकेत असलेले फारुख इंजिनियर, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, भारतीय संघ जिंकावा अशी मनोमन इच्छा असल्याने आवाजातील चढउतार, भावभावना, काबील कलाकार बोमन इराणी उत्तमच.
शेवटी सामना जिंकल्यानंतरच्या भावना न स्वत: फारुख इंजिनियर रोखू शकले ना बोमन इराणी इतकं साम्य राखण्यात कलाकाराला यश मिळालेलंय. कृष्माचारी श्रीकांतच्या भावना स्पष्टपणे दाखवतांना जीवा या कलाकाराला खूप मेहनत घ्यावी लागली असेल, हे जाणवते. एका पार्टी दरम्यानच्या त्याच्या स्फोटक वक्तव्याने पत्रकाराला आपले शब्द शब्दश: गिळावे लागलेत, हे सत्य शेवटी सगळ्यांना कळतं आणि टाळ्या कडकडतात. परंतु हा प्रसंग चित्रपट संपल्यानंतर दाखवला गेल्याने बरेचसे प्रेक्षक जागेवरून उठलेले असतात. त्यामुळे या प्रसंगाचं गांभीर्य जाणवत नाही, सगळ्यांना! मोहिंदर अमरनाथ साकारणारा कलाकार साकिब सलीम मस्तच! या टीममध्ये उपकप्तान असलेल्या मोहिंदर अमरनाथची भूमिका आणि योगदान किती मोठे होते, याची जाणीव होते.
तोची एक समर्थक
पी.आर. मानसिंग साकारण्यात पंकज त्रिपाठीने कोणतीही कसर सोडलेली नाही. अभिनयाच्या बाबतीत डोळ्याची भाषा वापरण्यात माहीर असलेल्या या कलाकाराच्या अदाकारीने टीममध्ये समन्वय राखण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. या संघाचा खरा पाठीराखा तोच आहे. जेव्हा जेव्हा टीमचं मनोबल खचलेलं असेल तेव्हा तेव्हा हा समर्थपणे पदोपदी, जागोजागी टीमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली आहे. वरिष्ठांनी केलेल्या कुचेष्टांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत टीमच्या केवळ भल्याचा आणि सामना जिंकण्याच्या दृष्टीने गरजेच्या मदतीसाठी मानसिंग धावून गेले आहेत. आजवर भारतीयांना कल्पना नसलेल्या या सद्गृहस्थांबद्दल माहिती पोहोचवण्यात पंकज त्रिपाठी महत्वाची भूमिका बजावतो, हे निश्चित.
प्रसिद्धी गिमिक्स
या चित्रपटाला अत्यावश्यक अशी प्रसिद्धी मिळावी ही माफक अपेक्षा दिग्दर्शक कबीर खानची असल्यास त्यात चुकीचे काहीही नाही. किंबहुना त्यासाठी त्याने वापरलेले गिमिक्स कौतुकास्पदच आहेत. जसे की रोमीच्या भूमिकेसाठी ‘दीपिका पदुकोन’ शिवाय सहनिर्माती, लाला अमरनाथच्या भूमिकेसाठी मोहिंदर अमरनाथ, व्हाइसओव्हर कलाकारच्या भूमिकेत कमल हसन आणि नागार्जुन सारखे साउथचे सितारे, स्वत: कपिलदेव. एकदा तर कपिलने मारलेला षटकार स्वत: कपिलदेव पकडतांना आणि तारीफ करतांना दाखवलेत. शिवाय चित्रपटाच्या शेवटी कपिलचं आणि मानसिंग यांचं कथाकथन, सचिन तेंडुलकरचं दिसणं वगैरे वगैरे…….
उल्लेखनीय
चित्रपट बघतांना, एस्पेशियली यातील सामने बघतांना पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. कारण हे सामने रिक्रिएट करतांना दिग्दर्शकाने प्रत्त्यक्षातील सामने वारंवार बघितले असावेत हे स्पष्टपणे जाणवतं. यातील सिन्स जिवंत वाटावेत म्हणून काही ठिकाणी ओरिजिनल सिन्स आणि काही ठिकाणी नवीन कलाकारांना जोडून मिक्स केलंय. तद्वतच काही जुन्या फोटोंना रिक्रीएट केलंय. एका फोटोमध्ये रवी शास्त्रीच्या पाठीमागे वाकून बघतांना संघ व्यवस्थापक पंकज त्रिपाठीला दाखवलंय. म्हणजेच प्रत्येक प्रसंग, प्रत्येक फोटो आणि प्रत्येक सामन्याविषयी तत्कालीन खेळाडूंसोबत चर्चा केलेली जाणवते. त्यामुळे वादविवाद टाळले आहेत. प्रत्येक खेळाडूला महत्व दिलं गेलंय, हे देखील जाणवतं.
या चित्रपटात केवळ क्रिकेट नव्हे तर बॉलीवूड, जातीय राजकारण, देशभक्ती, आंतरराष्ट्रीय संबंध, भारत सरकार, भारतीय क्रिकेट मंडळ या सारख्या विविध विषयांना सामोरे आणलंय. त्यामुळे प्रसंगी हा चित्रपट रडवतो आणि हसवतोही. अशा भारावलेल्या प्रसंगांनी प्रेक्षकांवरील पकड दिग्दर्शकाने मजबूत केलीय. त्याचा परिणाम असा होतो की भारताने विश्वकप जिंकल्याचा क्षण, प्रत्येक प्रेक्षकाने मनसोक्त अनुभवलाय. २५ जून १९८३ रोजी लंडनमध्ये लॉर्डस मैदानावर भारतीय संघाने विश्वकप जिंकल्याचा तो क्षण, तो दिवस कसा होता, याचा अनुभव याची देही याची डोळा प्रेक्षकांना मिळतो.
१९८३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या प्रेक्षकांनाही आजवरच्या ऐकीव माहितीनुसार हा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला प्रसंग प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळते, इतपत उत्तम कामगिरी दिग्दर्शक कबीर खान आणि त्याच्या टीमने केली आहे. भारतीयांच्या हृदयात जपलेल्या या ऐतिहासिक प्रसंगांवर चित्रपट बनवतांना वादविवाद अटळ असतात. परंतु दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आणि नंतरही कोणतेही वादविवाद होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे आणि हेच त्याचं यशही!
एनसी देशपांडे
९४०३४९९६५४
जबरदस्त अभ्यास पूर्ण विश्लेषण..
सुंदर लिहिलाय लेख 83 ….विश्वकप उजाळा nc देशपांडे तुमचं समीक्षण हे नेहमीच सहज सुंदर असते जय हो जनस्थान online की