सत्ता ही देव्हारा आणि निष्ठा ही फुटकळ वस्तू ?राजकारणातील दलालीचे भयाण वास्तव

अभय ओझरकर

0

अभय ओझरकर

महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या की शहरात एक वेगळ्याच प्रकारची “राजकीय जत्रा” भरते. झेंडे बदलतात, घोषणा बदलतात, चेहरे तेच राहतात; फक्त रंग वेगळा असतो. कालपर्यंत जे नेते एखाद्या पक्षाच्या विचारधारेचे स्वयंघोषित रक्षक होते, ते आज त्याच विचारधारेवर थुंकून दुसऱ्या पक्षाच्या दारात उभे असतात. आणि आश्चर्य म्हणजेहे सगळं अत्यंत निर्लज्जपणे, निर्भयपणे आणि जनतेला गृहीत धरून केलं जातं.

आजच्या राजकारणात सत्ता ही देव्हाऱ्यात ठेवलेली देवता झाली आहे आणि निष्ठा ही बाजारात सहज विकली जाणारी फुटकळ वस्तू. ज्याला जिथे फायदा दिसतो, तिथे तो उभा राहतो. विचार, संस्कार, पक्ष, कार्यकर्ते, मतदारहे सगळे फक्त वापरायचे साधन बनले आहेत.

निष्ठा बदल नव्हे, ही उघड दलाली आहे

आज जे घडतंय ते “पक्षांतर” नाही, तो उघड दलालीचा व्यवहार आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी अचानक काही नेत्यांना “आत्मसाक्षात्कार” होतो. त्यांना वाटू लागतं की आतापर्यंत ज्या पक्षासाठी आयुष्य घालवलं, तो पक्ष अचानक चुकीचा झाला आहे. आणि जिथे सत्ता आहे, तो पक्ष अचानक योग्य, पुरोगामी, विकासाभिमुख वाटू लागतो.

सामान्य मतदार मूर्ख नाही. त्याला हे स्पष्ट कळतं

ही विचारांची लढाई नाही, ही सत्तेची सौदेबाजी आहे.

आज निष्ठा खुंटीला बांधून ठेवणं ही राजकीय रणनीती झाली आहे. निवडणूक जिंकल्यावर पुन्हा तीच निष्ठा काढून वापरायचीअसं हे सोयीचं राजकारण आहे.

ज्याने पक्षाशी गद्दारी केली, तो जनतेशी काय प्रामाणिक राहणार?

हा प्रश्न आता प्रत्येक चहाच्या टपरीवर, प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक चौकात विचारला जातोय.

जो नेता आपल्या पक्षाशी बेईमान झाला, तो उद्या तुमच्या प्रश्नांशी प्रामाणिक कसा राहील?

जो माणूस आपल्या विचारधारेला लाथ मारतो, तो संविधानाला काय मान देणार?

पक्ष म्हणजे केवळ निवडणूक चिन्ह नसतं. तो विचारांचा, संघर्षांचा, बलिदानांचा प्रवास असतो. त्या प्रवासात ज्यांनी रक्त, घाम आणि वेळ दिला, त्या कार्यकर्त्यांच्या तोंडावर थुंकून जे नेते पक्ष बदलतात, त्यांना समाजाने ओळखलं आहे.

“चेहरा” मिळाल्यावरच चेहरा फिरवणारे नेते

राजकारणात “चेहरा मिळाला” हा शब्द वापरला जातो. पण आज अनेक नेते चेहरा मिळताच मुखवटा बदलतात. ज्या पक्षाने त्यांना ओळख दिली, नगरसेवक, आमदार, महापौर, अध्यक्ष बनवलंतोच पक्ष अचानक त्यांना असह्य होतो.

आणि ज्या पक्षात ते जातात, तिथेही ते विचारांसाठी जात नाहीत, तर तिकीट, पद, सत्ता आणि आर्थिक सोयीसाठी जातात. अशा लोकांसाठी पक्ष म्हणजे हॉटेल असतंजिथे जास्त सुविधा मिळतील, तिथे मुक्काम.

जनतेचा रोष आता उफाळून येतोय

पूर्वी मतदार शांत होता. “सगळे सारखेच” म्हणत तो गप्प बसायचा. पण आता परिस्थिती बदलते आहे. जनस्थान ऑनलाइनच्या माध्यमातून पुढे आलेला सर्व्हे स्पष्ट सांगतो

सत्तापिपासू, दल बदल करणाऱ्या नेत्यांना घरी बसवण्याची मानसिकता मतदारांमध्ये तयार झाली आहे.

ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची खूण आहे. कारण लोकशाही तेव्हाच जिवंत राहते, जेव्हा मतदार जागा होतो.

लोक आता थेट प्रश्न विचारत आहेत

पक्षाने तुम्हाला सगळं दिलं, मग पुन्हा सत्ता, पुन्हा पद, पुन्हा कुटुंबाचाच हट्ट का?

सेवा कधी संपते? की राजकारण ही तुमची खाजगी मालमत्ता आहे?

कुटुंबराजकारण आणि सत्तेची वंशपरंपरा

आज अनेक नगरसेवकांना शहर नाही, प्रभाग नाही, प्रश्न नाहीफक्त एकच चिंता आहे:

“माझ्यानंतर माझाच कोण?”

हे लोकशाहीचं अपयश आहे. लोकशाही म्हणजे वारसा हक्क नव्हे. पण सत्तेची चव लागली की अनेकांना ती सोडवत नाही. मग पक्ष बदल, विचार बदल, युती बदलसगळं चालतं. फक्त सत्ता हातात हवी.

कोरोना : सत्तेच्या मग्रुरीला दिलेला चपराक

कोरोना काळात अनेक नेत्यांची मग्रुरी उघडी पडली. पैसा होता, पण बेड नव्हता. ओळखी होत्या, पण ऑक्सिजन नव्हता. आणि मृत्यू आला की सत्तेचा, पैशाचा, बंगल्याचा काही उपयोग झाला नाही.

त्या काळात एक कटू सत्य समोर आलं

पैसा, सत्ता, पद हे मृत्यूसमोर शून्य असतात.

आज जे नेते सत्तेसाठी आत्मा विकत आहेत, त्यांनी त्या काळाची आठवण ठेवावी. अंत्ययात्रेला गर्दी जमते ती पदामुळे नाही, तर माणुसकीमुळे.

मतदारांनो, आता निर्णय तुमच्या हातात आहे

आजचा मतदार जर गप्प बसला, तर उद्या त्याला नैतिकतेची भाषा करण्याचा अधिकार राहणार नाही. कारण दल बदल करणारे नेते मतदारांच्या गप्प बसण्यावरच जगतात.

प्रश्न विचारणे, जाब मागणे, आणि गरज पडल्यास नकार देणेहीच खरी लोकशाही आहे.

शेवटचा इशारा : सत्ता चिरंतन नाही

आज सत्तेच्या मागे धावणाऱ्यांना एकच इशारा

सत्ता कायमची नसते. पैसा इथेच राहतो. बंगले, गाड्या, बँक बॅलन्ससगळं मातीखाली जात नाही, पण माणूस जातो.

आणि माणूस गेल्यावर उरते ती आठवण.

ती आठवण गद्दाराची असावी की प्रामाणिकाचीहा निर्णय आज घ्या.

नीतिमत्ता विकू नका. विचार गहाण ठेवू नका. जनतेचा विश्वास हा सर्वात मोठा कौल आहे.

तो एकदा गमावला की, कोणताही पक्ष, कोणतीही सत्ता तुम्हाला वाचवू शकत नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!