मोठी बातमी! डिलिमिटेशनवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पहिला राजीनामा

'पदापेक्षा विचार मोठे, सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा'; डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत सोशल मीडिया सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसांचा राजीनामा.

0

मुंबई, दि. २८ नोव्हेंबर २०२६ :(Sharad Pawar NCP Resignation)डिलिमिटेशन विधेयकावरून राज्याच्या राजकारणात वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पक्षात समोर आलेला हा पहिला राजीनामा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना हा सध्या देशाच्या राजकारणातील चर्चेचा महत्त्वाचा विषय ठरत आहे. या विधेयकाच्या समर्थनाच्या मुद्द्यावरून विविध राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याने उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

नेमकं काय आहे रामेश्वर खामकर यांचं म्हणणं?

रामेश्वर खामकर यांनी आपल्या राजीनामा पत्रातून पक्षाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपच्या राजकीय अजेंड्याशी संबंधित असलेल्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी बांधिलकी जपणाऱ्या पक्षाने अशा प्रकारची भूमिका का घ्यावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे आपल्यासमोर गंभीर वैचारिक प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

‘पदापेक्षा विचार मोठे, सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा'(Sharad Pawar NCP Resignation)

आपल्या राजीनामा पत्रात खामकर यांनी म्हटले आहे की, मी राजकारणात पदासाठी आलो नाही, तर विचारांसाठी आलो आहे. संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी असलेली बांधिलकी ही केवळ भाषणापुरती मर्यादित नसून ती माझ्या सार्वजनिक जीवनाचा मूलाधार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला गेलो, तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा अधिक ताकदीने पुढे नेली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षाने घेतलेली भूमिका माझ्या वैचारिक भूमिकेशी विसंगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या भूमिकेला पाठिंबा कसा देणार?

डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनावर प्रश्न उपस्थित करताना खामकर यांनी म्हटले की, ज्या राजकीय शक्तींच्या धोरणांशी आणि विचारसरणीशी आपण सातत्याने संघर्षाची भूमिका मांडत आलो, त्याच राजकीय भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय समर्थनीय कसा ठरू शकतो?

राजकारणात तडजोडी होऊ शकतात; मात्र प्रत्येक तडजोडीला वैचारिक समर्थन देता येत नाही. सत्तेची गणिते आणि राजकीय सोयी यापेक्षा विचारांची निष्ठा माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा

आपला निर्णय हा कोणत्याही व्यक्तीविषयीचा द्वेष किंवा वैयक्तिक नाराजी नसून सद्सद्विवेकबुद्धी आणि वैचारिक प्रामाणिकपणातून घेतलेला निर्णय असल्याचे खामकर यांनी नमूद केले आहे.

त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सोशल मीडिया सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

‘माझ्यासाठी पद सोडणे अवघड नाही; पण स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून पदावर राहणे अशक्य आहे,’ अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

शरद पवारांच्या पक्षातील नाराजी वाढणार?

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील एका पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा दिल्याने आता पक्षांतर्गत नाराजी आणखी वाढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खामकर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता पक्षांतर्गत राजकीय संघर्षाचे रूप धारण करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!