ब्युटी सलून आणि जिम वरील निर्बंध मागे : ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी 

0

मुंबई – शनिवार दि. ८ जानेवारी २०२२ रोजी राज्य शासनातर्फे सोमवारपासून लागू होणाऱ्या निर्बंधांसंबंधी काढण्यात आलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या असून सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.नवीन नियमावली नुसार ५० टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

परंतु ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असं आधीच्या आदेशात म्हटलं होतं. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती.  राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती पण जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. पण अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.

तर हेअर कटींग सलून ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असं कालच्या आदेशात म्हटलं होतं. ते आदेश कायम आहेत. हेअर कटिंग सलून रोज रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, असं आदेशात म्हटलं आहे.

सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यावसाय देखील सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांनी केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांची आज दुपारी ऑनलाईन बैठकही झाली होती.महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यावसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे बैठक आयोजीत केल्याची माहिती महाराष्ट्र सलून & ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली होती.

दरम्यान, जिम बंद ठेवण्यासही नाशिक जिम ट्रेनर अँड ओनर्स असोसिएशनने नकार दिला होता. तसेच रस्त्यावर उतरण्यासोबतच आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जारी करत कठोर निर्बंध लागू केले होते. यामध्ये जिम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या लॉकडाऊनमधून अजून न सावरलेले आणि आर्थिक संकटात सापडलेले जिम चालक आणि ट्रेनर हे नाराज झाले होते. त्यांच्या मनात सरकार विरोधात रोष निर्माण झाला होता. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण ३५० जिम आहेत तर साडेतीन हजाराहून अधिक जिम ट्रेनर आहेत. या निर्णयामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येणार होती. त्यामुळे त्यांनी ५० टक्के उपस्थिती आणि दोन डोस झालेल्या व्यक्तींसाठी परवानगी द्या आणि जिम सुरू ठेवा अशी मागणी केली होती. अखेर त्यांची ही मागणीला यश आले असून सदरची मागणी करण्यात आली आहे.

या सुधारणा खालील प्रमाणे असतील :

१- तक्त्यामध्ये उल्लेखित ‘प्रस्तावित निर्बंध’ याचा अर्थ “लागू निर्बंध” असा गृहीत धरण्यात येईल.

२- ब्युटी सलूनचा समावेश “केश कर्तनालय” (किंवा हेअर कटिंग सलून) या गटात करण्यात येईल. त्यांनाही क्षमतेच्या टक्के उपस्थितीत सलून उघडे ठेवण्याची परवानगी असेल व सोबतच केश कर्तनालय/ हेअर कटिंग सलून करिता उल्लेखित निर्बंध लागू असतील. या आस्थापनांमध्ये फक्त अशीच सेवा देण्यास मुभा असेल की, ज्यामध्ये मास्क काढण्याची गरज नसते. या सेवेचा लाभ केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे ब्युटी सलून मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

३- जिम अर्थात व्यायामशाळा हे क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत चालू ठेवता येतील, तथापि तिथे मास्क लावणे बंधनकारक असेल. या सेवेचा लाभ देखील केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे व्यायामशाळेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

सदर आदेश राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी दिले आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.