आता माझी सटकली, मला राग येतोय…

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)  

माझ्या अनुभवातून एक गोष्ट मला नक्कीच समजली आहे . “मोअर प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड नीडस् मोर लव!”  म्हणूनच तुम्हाला जर तुमचं मूल जास्त उपद्रवी वाटत असेल तर त्याचा इलाज फक्त आणि फक्त प्रेम हाच आहे हे कायम लक्षात ठेवा.

अस्वस्थ…..भयंकर अस्वस्थ आहे मी! ज्या आईची सावली बनून रहायचं तिच्या सावलीचीही भिती वाटावी?  जिच्या कुशीत शिरायचं तिनेच तोंडावर उशी दाबावी? नाळेपासुन जोडलं गेलेलं नातं गळा आवळून संपवून टाकावं?

मुलांच्या बदलणाऱ्या मानसिकतेचा आढावा घेणारी लेखमाला लिहिता लिहिता काही बातम्या इतक्या अस्वस्थ करत आहेत की मुलांची मानसिकता लक्षात घ्यावी की पालकांच्या मानसिकतेबद्दल बोलावं असा खूप मोठा प्रश्न मला पडलाय. माझा विचार होता की 15 ऑगस्टच्या आजच्या सुवर्ण क्षणाला काहीतरी सकारात्मक, काहीतरी विधायक असं तुमच्यासमोर मांडावं पण या आठवड्यातील काही बातम्यांनी मला अंतर्मुख केलं आणि या विषयावर लिहायला नाईलाजाने मला स्वतःलाच तयार करावे लागलं. 

 साडेतीन वर्षाच्या मुलाची हत्या करून त्यानंतर आईने आत्महत्या केली ही पहिली बातमी ! मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नव्हता, याचा राग येऊन आईनेच मुलाची हत्या केली आणि मग समाजाच्या भितीने स्वतःलाही संपवलं. पाठोपाठ नवी मुंबईत नुकतीच दहावी पास झालेली मुलगी अभ्यास करत नव्हती, अकरावीच्या सीईटी ची तयारी करण्यासाठी तिच्या आईने तिच्यामागे अभ्यासाचा तगादा लावला आणि शेवटी त्या मुलीने कराटेच्या बेल्टने आईचा गळा आवळून आईची कटकट कायमची मिटवली ही दुसरी बातमी!

आता याला मुलांची बदलत चाललेली मानसिकता म्हणायची की पालकांचा अभ्यासासाठी चाललेला अवास्तव आग्रह?

आपलं मूल दुसऱ्या मुलांपेक्षा मागे पडलं तर? ही भीती मुलांच्या जीवावर उठते आहे, इतकी साधी गोष्ट पालकांच्या का लक्षात येत नाहीये? आज देवाने तुम्हाला हातीपायी धड, दिसायला गोंडस, कुठलंही अपंगत्व नसलेलं मूल दिलं आहे याचा आनंद न मानता, ते मुल किती टक्के मार्क मिळवत आहे ,अभ्यासात पहिला नंबर काढत आहे की नाही, आपलं नाव मोठं करेल की नाही? या सगळ्या विचारांनी मुलाचं बालपण हिरावून टाकण्या इतपत पालक बेभान कसे झालेत? आपलं मूल शाळेत पहिलं यावं असा आग्रह धरणारे किती पालक स्वतः शाळेत असताना वर्गात पहिले येत होते हे तपासून बघितले तर 80 टक्के पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा असल्याचे लक्षात येईल. शिक्षण ही मुलांसाठी शिक्षा झाली आहे. एकीकडे शिक्षक टाकत असलेला भार , दुसरीकडे अभ्यास पुरेसा करत नाही म्हणून आई-वडिलांचा मार या सगळ्यात होणारी घुसमट व्यक्त करायला जागा नाही हे केवळ दुर्दैव!

आपले पालक वयाने मोठे आहेत म्हणून मुलं पालकांचं सांगणे ऐकतात. त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही करतात. मुलांना काही गोष्टी पटत नाहीत तरी केवळ आपले आई-बाबा सांगतात म्हणून ती गोष्ट मुलं निमुटपणे करतात. तरीही पालकांच समाधान होत नाही आणि पालक मुलाला घालून पाडून बोलतात. सहाजिकच ‘आई-बाबांनी सांगितलेली गोष्ट आपण केली आहे त्याचं ते कौतुक करतील’ या अपेक्षेने तुमच्याकडे बघत असणाऱ्या मुलांना तुमच्या रागवण्याचा, घालून पाडून बोलण्याचा, जास्त जास्त राग यायला लागतो. कधीकधी पालक शब्दांवर न थांबता मुलांना मारायला हातही उचलतात. मुलांना मारण हा कुठल्याच समस्येवरचा तोडगा नाही. ऑनलाइन मीटिंगमध्ये मी प्रश्न विचारला की ,”कोणाची मुलं हट्टी आहेत त्यांनी अंगठा दाखवा” तर सगळेच पालक अंगठा दाखवतात जेव्हा मी विचारते की “ज्यांची मुलं मोबाईल बघता बघता जेवतात, मोबाईल दाखवला नाही तर वस्तू फेकतात ,चिडचिड करतात,  नीट जेवत नाहीत त्यांनी अंगठा दाखवा” या प्रश्नावरही जवळपास सगळेच पालक अंगठा दाखवतात, आता मला सांगा तुम्ही तरी असे पालक आहात का की ज्यांनी आपल्या मुलांना कधीच मारलं नाही? या प्रश्नावर एकही पालक अंगठा दाखवत नाहीत. याचा अर्थ आपण प्रत्येकाने, कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या मुलाला मारलेलं आहे. मुलांना मारून आपल्याला समाधान मिळतं का? आनंद होतो का? नाही, उलट त्यांना मारल्यावर आपल्यालाच वाईट वाटतं. रडत रडत झोपी गेलेल्या मुलाच्या जवळ बसून आपण त्याला मारलेल्या ठिकाणी तेल लावतो, हात फिरवतो आणि तो उठल्यावर त्याच्याशी प्रेमाने वागतो. मग हेच प्रेम आपण आधीच का नाही दाखवत? आपलं मूल चुका करणार आहे त्या स्वीकारण्याचं आपण त्याला शिकवायला हवं आणि हे शिकवण्याचा योग्य मार्ग “प्रेमाने समजावणे“ हाच असतो. पालक मात्र “मार दिल्याशिवाय मुलं सुधारत नाहीत” असंच म्हणतात.

 आपण मुलांना का मारतो? याचा विचार केला तर आपल्याला येणारा राग आवरता येत नाही आणि तो राग मुलांवर निघतो. राग जसा आपल्याला येतो तसाच तो मुलांनाही येतो पण आपण मोठे असल्याने मारण्याची मुभा आपल्याला असते. मुलं मात्र धुसफूस करत राहतात. कित्येकदा डे-केअर मध्ये आलेली मुलं अगदी जवळ येऊन मिठी मारतात, बराच वेळ मांडीत बसतात, मोकळ खेळत नाहीत मग मला समजतं, यांचं आज काही तरी बिनसले आहे. गप्पा मारता मारता विचारलं तर एक एक धक्कादायक वाक्य कानावर पडतात. कुणी म्हणतं “आज आईने मला उगाच मारलं, माझी काही चूक नव्हती, मला घरातून पळून जावसं वाटतं!” तर कोणी म्हणतं “आज आई बाबा दोघही मला खूप रागवले. या जगात माझं कोणीच नाही”  हे ऐकल्यावर मला जेवढ वाईट मुलांसाठी वाटतं तेवढच किंबहुना त्यापेक्षा जास्त वाईट मला पालकांसाठी वाटतं. आपण आपल्या आयुष्याचा एकूण एक क्षण मुलांची प्रगती, मुलांच्या अभ्यासासाठी लागणारा पैसा, मुलांच्या गरजांसाठी लागणारी तजवीज यासाठी वापरतो आणि मुलं मात्र आपण त्यांना रागावतो म्हणून आपलाच दुस्वास करतात! मग या रागाने तुम्हाला काय दिलं? रागापेक्षा संयमाने वागलं तर हे चित्र बदलू शकतं. प्रश्न संयमाचा आहे! मुलांना रागावणं, मारणं हा शॉर्टकट झाला. संयम ठेवणे गरजेचं आहे.

 कधीकधी पालक खरच समजूतदार असतात. आपल्या मुलांना मारायचं नाही, रागवायचं नाही, जे असेल ते प्रेमाने समजावून सांगायचं, ही पालकांची भूमिका असते. अशा वेळेला आजूबाजूने पालकांवर येणारे दडपण, मूल अभ्यास करत नाही म्हणून शाळेतून येणाऱ्या तक्रारी, शाळेची भरमसाठ फी भरलेली असताना आपल्या मुलांनी ऑनलाइन लेक्चरला न बसणं, मुलाच्या वर्गातील इतर मुलांची प्रगती होत आहे आणि आपलं मूल मागे पडतय या गोष्टीची भीती पालकांना हात उचलायला भाग पाडते. चार लोक काय म्हणतील? या विचाराने अस्वस्थ झालेल्या पालकांचा संयम सुटतो आणि यातूनच वर सांगितल्या सारख्या दुर्दैवी घटना घडतात. आपल्या बाळाला मारतांना त्या आईला काहीच वाटलं नसेल अस आपण म्हणू शकत नाही. नऊ महिने त्या बाळाला आपला अंश देऊन वाढवलं, त्याच्या रडण्याने रात्र जागवली, त्याचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा केला, त्याचं पहिलं पाऊल, त्याचा पहिला शब्द सगळं मनाच्या कोपऱ्यात साठवलं, त्या आईने आपल्याच बाळाला संपवावं हे किती दुर्दैवी आहे. मी एक शिक्षिका म्हणून त्या लेकरालाही दोष देणार नाही आणि एक आई म्हणून त्या आईलाही दृष्ट, निष्ठुर म्हणणार नाही. खेळण्याच्या वयामध्ये अभ्यासाची गोडी लागावी हे जरी खर असल तरी ऑनलाइन हे माध्यम मुलांना तितकसं प्रभावी ठरत नाही. जी प्रगती शाळेत जाऊन होते, ती ऑनलाइन होऊ शकत नाही. मग ऑनलाइन लेक्चर करत नाही हा त्या लेकराचा दोष नाहीच! तो त्याच्या वयाचा दोष आहे, आणि दुसरीकडे आपलं मूल कुणाच्याही मागे पडू नये, सगळ्यांमध्ये कौतुकाचा विषय असावा असं प्रत्येक आईला वाटत असतं, त्यात तुझ मूल मागे पडेल, त्याला काहीच येत नाहीये, तू लक्ष देत नाहीये, या सामाजिक दबावामुळे निर्माण झालेल्या मनस्थितीत त्या आईने हे चुकीचं पाऊल उचललं, ही त्या परिस्थितीची चूक आहे!

 दहावीतल्या मुलीने कटकट करणाऱ्या, अभ्यासासाठी मागे लागणाऱ्या आईला तर मारलं पण ती आई आपल्याच भविष्यासाठी चिंता करत होती, आपल्या मागे लागत होती हे तिला कळलं नाही. ही खरंच तिची चूक नाही. हा तिला त्या मिनिटाला आलेल्या रागाचा परिणाम आहे. आजकाल अनेक किशोरवयीन मुलं हिंसेच्या मार्गाने जाताना दिसतात. युनिसेफच्या एका सर्वेनुसार किशोर वयीन मुलींपेक्षा मुलांमध्ये रागाच प्रमाण जास्त असतं. सहाजिकच हा प्रश्न पडतो की मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती का येते ? आणि कुठून येते? दुर्दैवाने याचे उत्तर तुमच्याच आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये आहे. आज पर्यंत ज्या मोबाईलपासून अट्टाहासाने आपण आपल्या मुलांना लांब ठेवायचा प्रयत्न करत होतो आता तोच मोबाईल ऑनलाइन लेक्चरच्या निमित्ताने आपण त्यांच्या हातात कोंबतो, ऑनलाइन लेक्चर संपल्यानंतर किंवा ऑनलाइन लेक्चरच्या नावाखाली बराच वेळ मुलं मोबाईल हाताळतात, त्यावर असे काही गेम्स खेळतात जे हिंसक प्रवृत्तीला चालना देतात. गेल्या महिन्यात माझ्याकडे नर्सरीच्या ऍडमिशनला आलेला मुलगा विचित्र बडबड करत होता. “त्या चायना वाल्यांना जाऊन त्यांच्या वर बॉम्ब टाकून यायला हवं. पब जी मधली लेटेस्ट बंदूक घेऊन मी चायना सोल्जर्स ला मारून टाकणार आहे” अशी बडबड तो सतत करत होता. त्या विषयापासून वळवण्याचा माझा प्रयत्न चालू होता पण तो मुलगा प्रत्येक विषय कुठून तरी शेवटी पब्जी गेम वर नेऊन संपवत होता. यावरून लक्षात घ्या की मोबाईल तुमच्या मुलांच्या मेंदूशी भयानक खेळ खेळत आहेत. “माझ्या मुलाला मोबाईलवर सगळं करता येतं, युट्युब वर व्हिडीओ लावता येतात, प्ले स्टोर मधून गेम डाऊनलोड करता येतात” हे जर तुम्ही अभिमानाने सांगत असाल तर वेळीच सावध व्हा!

ही पिढी स्मार्ट आहे, यात वाद नाही पण ही पिढी स्मार्टफोनच्या हातात जाऊ न देणे ही आपली पालकांची जबाबदारी आहे. सुरुवाती सुरुवातीला गंमत म्हणून मोबाईल घेणारी मुलं नंतर मोबाईल मिळाला नाही म्हणून चिडचिड करतात, वस्तूंची नासधूस करतात, त्यांच्यातल्या रागाच प्रमाण वाढतं, तेव्हा हेच पालक हतबल होतात. मोबाईल मधल्या गेममध्ये जास्तीत जास्त गेम हे एकमेकांना जीवे मारण्याचे आहेत आणि म्हणूनच आपण कोणालातरी संपवून टाकलं तरच आपण जिंकतो ही भावना अतिशय लहान वयापासून मुलांमध्ये रुजते आहे.
इंटरनेट सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक पॉर्न साईट मुलांसमोर अचानक ब्लींक होतात. अनावधानाने या साइटवर क्लिक केलं तर नको त्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतात आणि त्याचाही मुलांच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो.

राग येणे ही स्वाभाविक भावनिक स्थिती आहे, पण राग अनावर होणे, राग आवरता न येणे हे मानसिक रोगाचं लक्षण आहे. याला वेळीच आवर घाला. माझ्या शाळेतील एक पालक अगदी लहानसहान चुकीसाठी त्यांच्या मुलाला सतत मारायचे. त्याचा परिणाम म्हणून तो मुलगा शाळेत आल्यानंतर त्याच्या वर्गातल्या मुलांना मारहाण तर करायचाच पण तावातावाने त्यांच्याशी भांडणसुद्धा करायचा.

मुलांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून आम्हाला त्यांच्या घरचं वातावरण, त्यांचे आई-वडिलांमधील संबंध हे अगदी सहज कळतात. तुम्हीही जरा सजग राहून तुमच्या मुलाच्या वागण्यातले, बोलण्यातले बदल समजून घेतले तर न रागावता, समंजसपणे तुम्ही उदाहरणासकट त्यांना समजून सांगू शकाल. मूल रागात असतांना त्याला सांगून काही फायदा होत नाही मात्र रात्री झोपताना त्याच्याजवळ बसून “आज जे झालं त्यात तुझी अशी अशी चूक होती” हे प्रेमाने मुलाला समजून सांगा. मुलांशी संवाद वाढवा. मुलाचा हट्ट जर अवाजवी असेल तर तुम्ही नाही म्हणण्यामागची तुमची भूमिका मुलाला नीट पटवून द्या. तुमचं प्रामाणिक बोलण मुलांपर्यंत नक्कीच पोहोचतं. आई-बाबा उगीच ‘नाही’ म्हणत नाही हे एकदा मुलाला पटलं की मूलही पुढच्या वेळेला वागताना विचार करतात. आता हळूहळू अनलॉक चालू झाले आहे. मुलाला थोडफार बाहेर घेऊन जा. मोबाईल व्यतिरिक्त वेगवेगळे गेम्स खेळा. मन मोकळ बोला. त्यापेक्षाही त्याचं ऐकून घ्या. प्रत्येक वेळी त्यांच्या चुका काढू नका. एवढं केलं तरीही मुलांचं व्यक्तिमत्व घडायला तुमचा खूप हातभार लागेल.

माझ्या अनुभवातून एक गोष्ट मला नक्कीच समजली आहे . “मोअर प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड नीडस् मोर लव!”  म्हणूनच तुम्हाला जर तुमचं मूल जास्त उपद्रवी वाटत असेल तर त्याचा इलाज फक्त आणि फक्त प्रेम हाच आहे हे कायम लक्षात ठेवा!

भारताला तर स्वातंत्र्य मिळाला आहे आपणही आपल्या मुलांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य देतो निर्णयाचं बोलण्याचं वागण्याचं स्वातंत्र्य आपल्या मुलांना असतंच पण पालक म्हणून आपण मात्र एका अनामिक सवयीचे गुलाम असतो आणि ती म्हणजे राग येऊन संयम सुटणं ! आज 15 ऑगस्टला आपण आपल्या रागाला “चले जाव” म्हणूया आणि रागापासून मुक्ती मिळवून आनंदाचं स्वातंत्र्य उपभोगण्याची शपथ घेऊया!

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.