मुंबई – स्टार प्रवाहवर ४ ऑक्टोबरपासून सुरु होतेय नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी. ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ. या कानिटकर कुटुंबाला जोडून ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजेच विनायक कानिटकर. अभिनेते शरद पोंक्षे विनायक कानिटकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
या भूमिकेविषयी सांगताना शरद पोंक्षे म्हणाले, ‘ठिपक्यांची रांगोळी ही मालिका म्हणजे एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. अनेक ठिपके जोडून ज्याप्रमाणे रांगोळी तयार होते अगदी त्याचप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामुळे घराला घरपण मिळतं. त्यामुळे मालिकेचं शीर्षक अतिशय समर्पक आहे. मी साकरत असलेली विनायक कानिटकर ही व्यक्तिरेखा म्हणजे कानिटकरांचा कुटुंबप्रमुख. संपूर्ण कुटुंबाला सावरणारा मुख्य खांब म्हणता येईल. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेची तो काळजी घेत असतो. विनायक काटकसरी आहे. संकट सांगून येत नाही अश्या वेळेला पैसेच उपयोगी येतात म्हणून तो पैश्यांची बचत करतो. कुटुंबावर त्याचं खूप प्रेम आहे. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत. त्यामुळे खूप छान गट्टी जमून आली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
अग्निहोत्र २ नंतर पुन्हा एकदा मी या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत जोडला जातोय याचा आनंद आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’