“महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग” –अशोक खरातचा धक्कादायक दावा

SIT चौकशीत धक्कादायक खुलासे; HIV टेस्टचा रिपोर्ट आला समोर : मोबाईल डेटा, मालमत्ता आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणामुळे तपासाला वेग

0

नाशिक | दि. २७ मार्च २०२६ – Ashok Kharat Case नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याने तपासा  दरम्यान केलेला अजब दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. महिलांसोबत केलेल्या कृत्यांना “विधीचा भाग” असल्याचं सांगत त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.विशेष तपास पथक (SIT) समोर चौकशीदरम्यान खरातने “मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मी लोकांचं भलंच केलं, पण तेच माझ्यावर उलटलं,” असा दावा केला. याशिवाय “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला” असेही तो म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. या विधानांमुळे तपासात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.दरम्यान SIT तपासात अशोक खरात याने अनेक सेलिब्रेटींना गंडा घातल्याचे समोर येत आहे.

SIT तपासात तांत्रिक पुरावे महत्त्वाचे (Ashok Kharat Case)
सध्या SIT कडून अशोक खरातचा मोबाईल जप्त करून त्यातील डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस मेसेजद्वारे तो महिलांशी संपर्क साधत असल्याचंही तपासात समोर आलं आहे. काही डेटा डिलीट केल्याचा संशय असून सायबर एक्स्पर्ट्सकडून तपास सुरू आहे.

शिवानिका संस्थेची खाती सील, मालमत्तेचा तपास (Ashok Kharat Case )
खरातशी संबंधित ‘शिवानिका’ संस्थेची बँक खाती सील करण्यात आली आहेत. त्याच्यासह कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर आणि दुकानांची माहिती गोळा केली जात आहे. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी उभी राहिली, याचा तपास सुरू असून पुढील काही दिवसांत आर्थिक व्यवहारांबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

शस्त्र परवाना आणि काडतुसे जप्त
तपासादरम्यान खरातकडे शस्त्र परवाना असल्याचे उघड झाले आहे. २०१२ मध्ये मंजूर झालेला हा परवाना २०२४ मध्ये नूतनीकरण करण्यात आला होता. त्याच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी काही वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

१५० हून अधिक महिलांचे शोषण?
पोलीस तपासानुसार, अशोक खरातने भविष्य सांगण्याच्या नावाखाली १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या ८ गुन्ह्यांपैकी ७ गुन्हे हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. मात्र अजूनही अनेक महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या नसल्याची माहिती आहे.

HIV टेस्ट निगेटिव्ह
दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अशोक खरातची HIV चाचणी केली असून ती निगेटिव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे तपास यंत्रणा सर्व बाजूंनी काळजीपूर्वक चौकशी करत आहेत.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा
या प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अॅडमिनसह अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. पीडितांची ओळख उघड होईल असे व्हिडीओ शेअर करणं हा गंभीर गुन्हा असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पुढील तपास निर्णायक ठरणार
अशोक खरातला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील काही दिवसांत मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि संपर्कातील व्यक्ती यावरून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणात तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!