हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत यांचे निधन 

0

नवी दिल्ली – भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर आली आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबाबत  माहिती दिली आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.या हेलिकॉप्टर मध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. दरम्यान या दुर्घटनेत कॅप्टन वरूण सिंग हे बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचे पार्थिव उद्या सकाळी दिल्लीत आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळताच आग लागली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले होते.तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं.संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.

डिसेंबर २०१९ मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. १६ मार्च १९५८ मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दलमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक व्यक्त   

दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना 

मुंबई – भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणे नियतीलाही मान्य असणार नाही. जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे खूप व्यथित झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकीर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेले अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते,  त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसते.

दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली 

“देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक, तितकीच वेदनादायक आहे. जनरल बिपीन रावत यांनी त्यांच्या लष्करीसेवेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गाजवलेले शौर्य, पराक्रम, त्यांची देशभक्ती देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. युवकांना सैन्यदलात दाखल होण्यासाठी प्रेरणा देईल. जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून देशाची संरक्षणसिद्धता, गौरव वाढवण्यात योगदान दिले. लष्करप्रमुखपदानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदलप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पहिले संरक्षणदलप्रमुख म्हणून तिन्ही सैन्यदलांमध्ये सहकार्य, समन्वय वाढवण्याचे काम केले. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया, मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचे नेतृत्वं केले. सहकारी अधिकारी, जवानांचे मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असे त्यांचे नेतृत्वं होते. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचे झालेले अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत, दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकारी यांना मी वंदन करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब व अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

श्रद्धांजली !

भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे आज लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत दु:खद निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेसह एकूण १३ लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या निधन झाले. ही देशासाठी अतिशय दु:खद घटना आहे. सीडीएस बिपिन रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली. ते देशातील पहिले सीडीएस अधिकारी होते. देशातील संरक्षणाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी ते एक होते. बिपीन रावत यांनी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेवा दिली आहे.  त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला होता.  त्यांच्या निधनाने देशाची अपरिमित अशी हानी झाली असून देशाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय रावत तसेच अपघातात निधन झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

भावपूर्ण श्रद्धांजली !

छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.