मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
मुंबई – मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजचा मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. सकाळी ८.४५ वाजता डाँक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती दिली. तसेच यानंतर आता आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढील आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार अशी माहितीही डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी दि. १० नोव्हेंबरला कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी रुग्णालयात दाखल झाले. पुढील दोन ते तीन दिवस मानेच्या दुखण्यावर उपचार घेणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.असे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.