दसककर सिस्टर्सचे नवीन गाणे शुक्रवारी होणार प्रदर्शित
नाशिक (प्रतिनिधी) – गायन, वादन व नृत्य या तिन्ही कलांचा समावेश असणाऱ्या विषयाला ‘संगीत’ असे म्हणतात” ही संगीताची परिभाषा आहे, याच संगीत जगतात काही नवनिर्मिती करण्याच्या उद्देशाने, या दिवाळीत नाशिकच्या दसककर सिस्टर्स यांनी “ताल सुरन का मेल” ही एक अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना त्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे.उद्या शुक्रवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी,रात्री ९ वाजता ‘दसककर सिस्टर्स’ या युट्युब चॅनल, इन्स्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवरून हे गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे.
विविध अंगांनी, वैशिष्ट्यांनी नटलेल्या आणि सजलेल्या या कलाकृतीत शास्रीय संगीतातील आणि फ्युजन मधील जवळपास १० प्रकारांचे वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यात आले आहे. या रचनेत राग गावती, जोग, चारुकेशी, गौड मल्हार, श्याम कल्याण, मालकंस या रागांचा मिलाप असून ही रचना ताल रूपक वर आधारित आहे.
ज्या संगीत जगताने भारतीय रसिकमन समृद्ध केलं आहे अशा संगीत जगतात एक उत्तम आणि दर्जेदार कलाकृती अर्पण करण्याचा छोटासा प्रयत्न या गाण्याच्या माध्यमातून आम्ही केला आहे, अशी भावना दसककर सिस्टर्स यांनी व्यक्त केली आहे.
अश्विनी दसककर भार्गवे, ईश्वरी दसककर, गौरी दसककर आणि सुरश्री दसककर या ‘दसककर सिस्टर्स’ च्या संकल्पनेतील “ताल सुरन का मेल” हे दृक्श्राव्य पद्धतीतील गाणे असून, त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलेल्या या सुमधुर गाण्याला त्यांनी आपल्या गोड आवाजाने चार चांद लावले आहेत. हे गाणं दसककर सिस्टर्स यांनीच शब्दबद्ध केले असून गाण्याला संगीत देखील त्यांनीच दिले आहे, या गाण्यासाठी तबला साथ सुजित काळे यांनी दिली असून गाण्याचे संगीत संयोजन ईश्वरी दसककर हिने केले आहे. गाण्याचे ध्वनीमुद्रण प्रशांत पंचभाई, श्रीरंग स्टुडीओ यांनी केले असून गाण्याचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अभिषेक कुलकर्णी यांनी केले आहे. तर गाण्याच्या चित्रीकरणासाठी श्रीरंग सारडा, सिटी सेंटर मॉल, नाशिक यांचे सहकार्य लाभले आहे.
तरी जास्तीत जास्त रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा व ते आपल्या इतर रसिक मित्रांपर्यंत शेअर करावे असे आवाहन दसककर सिस्टर्स तर्फे करण्यात आले आहे.