‘विवाहसंस्था आणि स्त्री-पुरुष समानता’यावरील प्रबोधनात्मक नाट्य : चारचौघी

एनसी देशपांडे

0

लेखक – प्रशांत दळवी, दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्य – संदेश बेंद्रे, प्रकाश – रवी रसिक, संगीत – अशोक पत्की आणि निर्माते – श्रीपाद पद्माकर.कलाकार – रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे.

Educative play on 'Marriage Institution and Equality of Men and Women' : Charchaughi

प्रस्तावना १
‘नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका’ या तीनही प्रकारात मुंबईकरांचा कायम वरचष्मा राहिला आहे.आजही तो तसाच असला तरीही मराठवाड्यातील कलाकारांनी मुंबईत स्थिरावत आपला दबदबा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. व्यावसायिकता म्हणजेच प्रोफेशनलीझम या विषयाचं मर्म जाणून ‘व्यावसायिक रंगभूमी’साठी मुंबईकरांवर अवलंबून न राहता आपल्याच मातीतील सर्व खात्याचे तज्ञ निर्माण करून स्वत:ची एक नोंदनीय अशी ‘इंडस्ट्री’ तयार केली आहे, हे विशेष. खरंतर मराठवाडा मुंबईपासून पुणे-नाशिकपेक्षाही जास्त अंतरावर असूनही त्यांनी प्राप्त केलेलं हे यश निश्चितच मासलेवाईक आणि अनुकरणीय आहे. ‘नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी’ यांच्या प्रोफेशनल अप्रोच मुळेच मराठवाड्यातील कलाकारांना मुंबईत एक हक्काचं ‘प्रॉडक्शन हाऊस, व्यावसायिक रंगभूमीची ओळख आणि संधीही’लाभली.

प्रस्तावना २ 
प्रशांत दळवी एक उत्कृष्ट आणि यशस्वी नाटककार आहेत.साधारणत: ३० एक वर्षांपूर्वी त्यांचं ‘चारचौघी’ हे नाटक चंद्रकांत कुलकर्णीच्या दिग्दर्शनात रंगभूमीवर सादर झालं. प्रशांत दळवींचं हे पाहिलंच व्यावसायिक नाटक होतं. ‘कंटेंट, कास्टिंग, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरण’ या पाचही आघाड्यांवर या नाटकाला एक्सलंटचा शेरा लाभला. तत्कालीन नाटकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा विषय, ‘दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर आणि असावरी जोशी’ अशी अभिनयसंपन्न आणि तगडी ‘स्टारकास्ट’ आणि वैशिष्ठ्यपूर्ण सादरीकरण यामुळे या नाटकाला प्रेक्षकांची पसंती लाभली. परिणामस्वरूप नाटककार प्रशांत दळवीची दखल सर्वांनीच घेतली आणि आपसूकच एक दबदबा निर्माण झाला, ]याचं बरंचसं श्रेय्य हे जादुगार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी याचंच,यात काही वादच नाही. मग हे नाटक पुन्हा-पुन्हा सादर होत गेलं आणि प्रत्येक वेळेला या रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत गेला.

प्रस्तावना ३
‘स्त्री मुक्ती आणि स्त्री स्वातंत्र्य’ या विषयावर अनेकदा विस्तृत चर्चा घडते परंतु त्याची परिणती स्त्रियांना समान हक्क आणि सामजिक देण्यात होते का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. एके काळी तर स्त्रीला स्वत:च असं नाव गाव काहीही नव्हतं. ज्या घरात जन्म घेतला ते नाव आणि ज्या गावात जन्म झाला ते गाव आणि लग्नानंतर नवऱ्याचच नाव आणि त्याचंच गाव, हीच परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. स्त्रीला स्वत:च असं स्वतंत्र अस्तित्वच नव्हतं, हेच सत्य! स्त्रीने स्वकमाईसाठी घराबाहेर पाउल टाकले आणि परिस्थितीत थोडाफार फरक जाणवायला लागला. ती जरी त्या घरासाठीच अर्थार्जन करत होती तरीही त्या पैशाचा विनियोग करण्याचा अधिकार मात्र लग्नापूर्वी तिच्या वडिलांकडे आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्याकडेच परंपरेने,कळत-नकळत प्रामुख्याने जात होता. म्हणजेच पैसा कमवूनही तिला स्वातंत्र्य वा स्वतंत्र अस्तित्त्व असं लाभू शकलं नाही,ही एक शोकांतिकाच होय.

तरी परंतु यातून एक गोष्ट निश्चितच चांगली घडली आणि ती म्हणजे तिला आपली ‘ताकद,कर्तुत्व आणि सामर्थ्य’ याची चांगलीच जान-पहचान झाली.अर्थातच तिला ‘पर्सनल आणि प्रोफेशनल’ लाइफचं तंत्र उमगलं आणि एका नव्या उमेदीने या दोन्ही जबाबदाऱ्या ती सहजसुलभपणे सांभाळू लागली. नोकरीमुळे आलेलं स्वावलंबन आणि आत्मभान तिला प्रगल्भ बनवत होतं. पण आपलं ‘घर आणि संसार’ ही प्राधान्ये ‘विसरू, टाळू अथवा दुसऱ्यावर सोपवू’ शकली नाही. शिक्षण, नोकरी, नवीन ओळखी आणि आत्मविश्वास हा प्रवास सुलभ होतांनाच पुरुषी वृत्ती फणा काढून उभी होतीच. मग त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास कितपतसा वेळ लागणार? तरीसुद्धा त्यांनी हा लढा अशा विविध आघाड्यांवर लढत यशस्वीपणे लढला. विभक्त कुटुंबपद्धतीत तिला जरासा मोकळा श्वास घेता आला आणि तिच्या म्हणण्याला दुजोरा मिळू लागला, सन्मान मिळू लागला आणि पर्यायाने एक अधिकारही प्राप्त झाला. स्त्रीच्या या सामाजीक बदलाचा कोणताही सकारात्मक परिणाम पुरुष प्रवृत्तीवर झाला नाही. अशा परिस्थितीत जर स्त्रियांनी ‘विवाह बंधन आणि पुरुषसत्ताक प्रवृत्ती’ झुगारून स्वतंत्र जीवन जगण्याचा मार्ग चोखाळला तर?

कथासंहिता
स्त्रियांवर झालेले ‘अत्याचार आणि पर्याप्त भावनिक गुंता’ या विषयावर १९८३ मध्ये ‘स्त्री’ या पथनाट्यातून प्रकाश पाडण्यात आला होता. या पथनाट्याचे त्याकाळी दोनशेच्यावर प्रयोग झाले. यातील स्त्रीया केवळ नशिबाला दोष देण्याऐवजी  संघर्ष करून यशस्वी लढा देतात. या मूळ संकल्पनेतून प्रशांत दळवी यांनी ‘चारचौघी’ या तीन अंकी नाटकाची निर्मिती रचली. वरील विषयाला अनुसरून नाटककार प्रशांत दळवी यांनी ‘एक आई आणि तिच्या तीन मुली – ‘विद्या, विनी आणि विजू’ यांच्या माध्यमातून एकुणात स्त्रियांच्या ‘भावनिक, वैचारिक सामाजिक आणि संसारिक’ विषयांवरचं कथानक या  नाटकात बेतलंय. एका संसारी पुरुषाच्या प्रेमात तीन मुलींना जन्म देणाऱ्या आईने सामाजिक चौकट मोडली आहे. एक नवा, स्वतंत्र आणि आव्हानात्मक, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेचा विचार, एकपालकत्व आणि उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता असलेली ही स्त्री आहे. या नाटकातील तिनही मुलींचे विचार स्वतंत्र असल्याने आपापल्या जीवनाला आकार देण्याचा निर्णयही त्यांचाच. त्यामुळे अर्थातच भविष्यातील चांगल्या-वाईट परिणामांना स्वीकारण्याची तयारीही त्यांचीच. त्या प्रतिकूल परिस्थितीतही मागे न सरता आपल्या निर्णयाशी प्रामाणिक राहण्याची ताकद आणि जिंकण्याची उर्मी त्यांनी बाळगली आहे. पारंपारिक ‘देवधर्म, नियती किंवा अंधश्रद्धा’ असे विचारही त्यांच्या मनाला शिवत नाहीत.

पुनर्निर्मिती
३० वर्षांपूर्वीच्या नाटकाला संपूर्ण नवीन संचात सादर करतांना जुना विषय,प्रेक्षकांना भावलेले कलाकार,त्यांच्या अभिनयाचा पगडा अनेक आव्हाने समोर होती. भारती आचरेकर, स्मिता सरवदे, मैथिली जावकर, शिवाय शर्वाणी धोंड,सरिता पाटणकर,किणी प्रभाकर आणि स्वाती बोवलेकर अशा कलाकारांनीही या नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची पोत दाखवून दिली होती.परंतु वंदना गुप्ते यांचं प्रदीर्घ असं जवळपास २० मिनीटांचं टेलिफोनवरील संभाषण प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. यशस्वी नाटकाची पुनर्निर्मिती झाल्यावर नवीन कलाकारांची जुन्या कलाकारांशी होणारी तुलना अटळ असते. ३० वर्षांपूर्वीची रसिक मंडळी आणि आजचा नाटकाचा चाहतावर्ग यामध्ये ‘सामाजिक आणि मानसिक’ बदल घडल्याची संपूर्ण जाणीव दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीला होती.परंतु सादरीकरण जर नव्या ढंगात आणि प्रभावी असेल तर प्रेक्षक बदल निश्चितपणे स्वीकारतात,असा आत्मविश्वास दिग्दर्शकाचा होता, ही सकारात्मक बाजू!

अभिनयानुभव
कंटेंट आणि दिग्दर्शन उत्तम असेल तर कलाकार कोणीही असला तरीही प्रेक्षकांची पसंती लाभतेच याचा अनुभव सर्वांनीच ‘वेब सिरीज’ च्या माध्यमाने घेतला आहे. तद्वतच या नाटकाच्या बाबतीत घडत गेलं आहे. जेव्हा-जेव्हा हे नाटक रंगभूमीवर सादर झालं, त्या प्रत्येकवेळी प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहात स्वीकारलं, हा पूर्वानुभव आहे. परंतु यातील कलाकारांचा संच तुलनेचा मारेकरी ठरणार नाही, याची पूर्ण काळजी नेहमीप्रमाणे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी याने घेतली आहे.तरीही कादंबरी कदम,पर्ण पेठे,श्रेयस राजे,निनाद लिमये,पार्थ केतकर यांनी दिग्दर्शकबरहुकूम भूमिका चोखपणे निभावल्या आहेत. कणखर आईच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या अभिनायाचा पोत पुन्हा एकदा सिद्ध केल्याने ही भूमिका वेगळी जाणवते.किंबहुना आजवरच्या कलाकारांच्या तुलनेत ही आई जास्त ‘कणखर, स्पष्ट, आश्वासक आणि मजबूत पाठींबा देणारी स्पष्टपणे जाणवते. वंदना गुप्तेचं ऐतिहासिक टेलिफोनवरील २० मिनीटांचं संभाषण, याकडे प्रेक्षकाचं विशेष लक्ष असल्यानेच ही भूमिका ‘मुक्ता बर्वे’ या सक्षम अभिनेत्रीकडे आली,अगदी ‘नोबडी एल्स विल डू’.मुक्ताने बावनकशी अविष्काराने या भूमिकेचं चीज केलंय, यात काही वादच नाही. किंबहुना वंदना गुप्ते यांनी सुद्धा तारीफ केली असेल, असं मनापासून वाटतं!

सारांश
या नाटकाच्या माध्यमातून समाजाला एक ‘नवी दिशा, नवे विचार आणि नवे मार्ग’ यांची जाणीव होते. भारतात आजही पुरुषसत्ताक कुटुंबपद्धती आचरणात आहे. त्यामुळे अनेकांना ही विचारधारा मानवणार नाही. परंतु हेच वास्तव आहे, याची जाणीव लहानसहान प्रसंगामधून मात्र वारंवार होते. अच्च्यूत्तम ‘संवाद लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय’ यातून विचारांची प्रखरता प्रेक्षकांना विचारमग्न निश्चितच करते. भारतीय पुरुषसत्ताक संस्कृती आणि परंपरा यामध्ये जखडलेल्या एकुणात स्त्रियांच्या परिस्थितीत निश्चयपूर्वक सामना करण्याची प्रेरणा या संहिता सादरीकरणातून हमखास मिळते. आजची स्त्री, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ या रडक्या चालीच्या विरोधात बंड उभारून ‘विवाहसंस्था’ या प्रकाराचा मनसोक्त धिक्कार करते आहे. आईवडिलांच्या आग्रहाला न जुमानता ‘योग्य वयात लग्न’ करण्यापेक्षा ‘प्रोफेशनली सेटल्ड’ आणि ‘थोड्याश्या उशिराने’, किंवा ‘लग्नच करायचे नाही’ किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या ‘पाश्चात्य संकल्पनेने’ प्रेरित असून त्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. आज जरी कदाचित अश्या विचारांच्या मुलींचे प्रमाण या समाजामध्ये नगण्य असले तरीही ‘या जमातीकडे’ दुर्लक्ष्य केल्यास फार मोठी किंमत या समाजाला द्यावी लागेल,यात कोणतीही शंका नाही.

अर्थात आपणही या ‘पुढारलेल्या स्त्रियांच्या विचारांना’ वेडेपणा, आगाऊपणा, विकृती वगैरे समजून, संबोधून वा अवहेलना करून दुषणे देण्याऐवजी केवळ ‘सामाजिक आणि वैचारिक बदल’ एवढेच समजले तर या विचारांना समजून घेणे आणि समजावून सांगणे सहज, सोपे  आणि सुलभ होवू शकेल! घराघरातून फिरणारा हा विचार आजच्या समाजात रुजतो असून उद्याचा तो एक गहन प्रश्न होणार आहे. याची जाणीव जर समाजाला झाली तरच काहीतरी …. बदल घडून विवाहसंस्था आणि समाज मजबूत होऊ शकेल! आता तर संपूर्ण जगच बदलत होतं त्यामुळे जगभरात स्त्री – पुरुष हा भेदाभेद नष्ट होत होता.त्यामुळे ज्याच्यापाशी टॅलेंट, कार्यक्षमता आणि बदल स्वीकारायची मानसिकता होती तेच पुढे जातील आणि या प्रवाहात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने, प्रसंगी त्यांच्याही पुढे जाऊन स्वत:ला सिद्ध केलयास स्त्रियांचा प्रगतीचा वारू रोखणं आता कुणालाही शक्य होणार नाही.
एनसी देशपांडे
९४०३४ ९९६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.