ICC ने जाहीर केले T20 विश्वचषकाचे वेळापत्रक : भारत -पाकिस्तान ‘या’ दिवशी आमने सामने

0

येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकाचे वेळापत्रकआयसीसी ने जाहीर केले आहे. या विश्वचषकात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान हे संघ आधीच पात्र ठरले आहेत तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ १६ ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

टीम इंडिया विश्वचषकातील आपल्या अभियानाला २३ ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. टीम इंडिया चा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी २० विश्वचषकात भारत पाकिस्तान २०२१ मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं.

संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेश बरोबर आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.

टी २० विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तर, उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सिडनी आणि अॅडलेड ओव्हल येथे होणार आहेत.

त्याचबरोबर विश्वचषक सामन्यांसाठी तिकिटांची विक्री येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात प्रेक्षकांना करोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचा हा आठवा हंगामअसेल. आयसीसी टी २० विश्वचषक २००७ मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ही ट्रॉफी जिंकलेली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.