नाशिक | दि. २१ मे २०२५ – Kavya Gaurav Puraskar नाशिकच्या साहित्य विश्वासाठी आनंदाची बाब! शहरातील दोन साहित्यिकांना त्यांच्या दर्जेदार कवितासंग्रहांसाठी राज्यस्तरीय ‘काव्य गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सुप्रसिद्ध कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या पुढाकाराने दरवर्षी दिला जातो.
८ जून २०२५,रविवार या दिवशी पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक येथे होणाऱ्या ‘वैशाखी वादळवारा काव्य महोत्सवा’ मध्ये या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्कार प्राप्त करणाऱ्या साहित्यिकांमध्ये:(Kavya Gaurav Puraskar)
श्री. नंदकिशोर ठोंबरे – ‘मी मला शोधताना’ या कवितासंग्रहासाठी
कवी सोमनाथ पगार – ‘वेदनेचे काटे’ या काव्यसंग्रहासाठी
या दोघांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘वेदनेचे काटे’ या संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत अनघा प्रकाशन (ठाणे) यांच्याकडून प्रकाशनासाठी अनुदानही प्राप्त झाले होते.
या पुरस्काराचे आयोजन विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, विष्णुपंत ताम्हणे विद्यालय, चिखली, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. परीक्षक मंडळाने सादर केलेल्या कवितासंग्रहांचे सखोल परीक्षण करून, त्यांच्या साहित्यिक मूल्यांचा विचार करत ही निवड जाहीर केली आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना दोन्ही साहित्यिकांनी सांगितले की,
“हा पुरस्कार म्हणजे आमच्या साहित्यिक प्रवासातील एक प्रेरणादायी क्षण आहे. ही पाठीवरील कौतुकाची थाप आम्हाला आणखी लिहिण्याची उमेद देईल.”
नाशिकच्या साहित्य क्षेत्रातून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नवोदित कवींसाठीही हे एक उत्तम उदाहरण ठरत आहे.