कलाकारांच्या आयुष्यातील नात्यांचे कांगोरे उलगडणारे अप्रतिम नाटक “पूर्णविराम”
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र..
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १९ डिसेंबर रोजी अथर्व ड्रामॅटीक्स, नाशिक संघातर्फे पूर्णविराम हे नाटक सादर करण्यात आले. कलावंताची नेहमी कला बघावी, त्याच्या आयुष्यामध्ये डोकावू नये असे म्हणतात. कलावंत हा नेहमी मनस्वी असतो. त्याच कलंदर जगणं सर्वसामान्य व्यक्तीस सहन होणार नाही. सहन करू शकत नाही. कलावंत नेहमी पूर्णत्वाच्या शोधात असतो. या शोधामध्ये त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींची वाटचाल कधी सुखावह आरते तर कधी त्यांचीही फरफट होते. पुरुष कलावंतांची पत्नी होणे हे तर एक दिव्यच असते. कलावंत कधी विक्षिप्तपणे वागतो, तर कधी अट्टहासाने आपलेच म्हणणे खरे करतो. बहुतांश वेळा कलाकाराचं आयुष्य फक्त कलेला न्याय देऊ शकत. त्याच्या आयुष्यातील व्यक्तींना नाही. हे विधारक सत्य स्वीकारताना कलावंताला आणि त्याच्या आयुष्यातील व्यक्तींना चिरंतन वेदनेला सामोरे जावे लागते.
मनोहर हा एक चित्रकार, आपल्याच कलेला समर्पित असणारा कलावंत. चित्रांच्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून नाविन्याचा शोध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य. अनिता ही त्याची सहचरणी. सर्वसामान्य स्त्री लग्न झाल्यावर नवऱ्याकडून बायको ज्या अपेक्षा ठेवतात अशी स्त्री. दुसऱ्या बाजूला मनोहरच्या आयुष्यातली दुसरी स्त्री माधवी त्याची मैत्रीण. माधवी प्रतिथयश लेखिका आणि मनोहरच्या कला प्रवासातील सोबती. अनिता मधील अपूर्णत्व तो माधवी मध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. नाटकाच्या सुरुवातीलाच मनोहरला स्टेज कॅन्सरमुळे हॉस्पिटलला ऍडमिट आहे. त्याला मृत्यु शैय्येवर असं खिजत मरायचे नाही ही त्याची शेवटची इच्छा आहे. ही त्याची शेवटची इच्छा प्रियसी माधवी पूर्ण करेल की पत्नी अनिता त्याला आजारपणातून पूर्णपणे बरा करून घरी आणेल हाच निर्णय घेताना अनिता आणि माधवी यांच्यातील वैचारिक आणि तात्विक मंथन म्हणजे पूर्णविराम हे नाटक.
नाटकाचे लेखन इरफान मुजावर यांचे तर दिग्दर्शन प्रतीक नाईक यांचे होते. नेपथ्य सुयोग देशपांडे तर प्रकाशयोजना सौरभ रसाळ यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा अंकिता मुसळे यांची होती. नाटकामध्ये स्वप्निल जोशी, दर्शना कऱ्हू, स्वाती शेळके आणि विक्रम गवांदे यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक -पगला घोडा
संस्था -अश्वमेध थिएटर्स
लेखक – अमोल पालेकर
दिग्दर्शक :- स्वप्निल गायकवाड