Nashik : परंपरा जोपासणारी गांधीनगरची ऐतिहासिक रामलीला

0

गांधीनगर वसाहतीची स्थापना झाल्यानंतर कामानिमित्त देशभरातून आलेले विविध जाती धर्मीयांचे लोक या ठिकाणी स्थायिक झाले. यातीलच काही उत्तर भारतीय, गढवाली समाज व महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी रामलीलेची मुहूर्तमेढ रोवली. प्रारंभी सन १९५३-५४ या दोन्ही वर्षी गांधीनगर वसाहतीमधून श्रीराम, लक्ष्मणाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येत असे. यामध्ये नारायण मल्होत्रा व सुकदेव मल्होत्रा हे बंधू श्रीराम व लक्ष्मण बनले होते. या दोन्ही वर्षी परिसरातून मिळालेल्या प्रतिसाद व प्रोत्साहनामुळे सन १९५५ मध्ये नाट्यस्वरूपात रामलीलेचे सादरीकरण सुरू झाले.

प्रारंभी काही वर्षे जसवंतसिंग यांच्या ऊर्दू रामायणाचा आधार घेत रामलीला सादर करण्यात आली. तथापि विविध समाजातील जनतेला ऊर्दू संवाद समजण्यात अडचण येत होती. त्यामुळे सुरेंद्रसिंह बिष्ट व देविलाल शर्मा यांनी वाल्मिकी रामायण व तुलसी रामायण यांचा एकत्रित मेळ साधत रामलीलेचा हिंदी अनुवाद केला. यामध्ये कै. ब्रह्मदेव कुलथे व कै. कृष्णा गवांदे यांनी सुमधूर गीतरचना करून त्याला शास्त्रीय गायकीचा साज चढविला. नवरात्राच्या दुसर्‍या माळेपासून ते दसर्‍यापर्यंत रामलीलेचे सादरीकरण होते. या दहा दिवसात रावणाचा पूर्वेतिहास, रावण कुंभकर्ण, बिभीषण वरदान, डाकू रत्नाकर (वाल्मिकी), राम जन्म, सीता जन्म, सीता स्वयंवर, अंगद-रावण संवाद, हनुमान-रावण संवाद, बिभीषध निष्कायन, राम-सुग्रीव मित्रता, सीताहरण, अशोक वाटिका, लक्ष्मण-दंद्रजीत युद्ध आदी प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येते.

रामलीला नाट्यदर्शनमध्ये विविध जातीधर्मीयांचे लोक व हौशी कलावंत एकत्रित काम करीत असतात. या रामलीलेच्या माध्यमातून रामायणातील सद्वविचार जनतेपर्यंत पोहोचवितानाच एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतासुद्धा जोपासली जाते. ही पंरपरा गेल्या 62 वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे. कित्येक कुटुंबातील तिसरी-चौथी पिढी आजही या रामलीलेत आपले योगदान देत आहेत. यात काम करणारे सर्व तंत्रज्ञ, कलावंत विनामोबदला काम करतात, हेच या रामलीलेच्या यशस्वीतेचे गमक ठरले आहे. हिंदी संवाद व आवश्यक त्या ठिकाणी शास्त्रीय रागांवर आधारीत गीतांमुळे प्रेक्षक तल्लीन होतात. गांधीनगर प्रेसमधील अधिकारी हरिलाल यांनी सन १९६० मध्ये रामलीला समितीची स्थापना केली. पी.डब्ल्यू.डी.चे तत्कालीन मुख्य अभियंता सरदार महेंद्रसिंग हे प्रथम अध्यक्ष होते. सन १९५९ ते १९६५ या काळात गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब हॉलमध्ये रामलीलेचे सादरीकरण होत असे. याच दरम्यान एकदा फिरत्या रंगमंचावरही काही दृश्यांचे सादरीकरण करण्यात आल्याचे काही जुने कलावंत सांगतात. तत्कालीन परिस्थितीत रामलीला बघण्यासाठी सिन्नर, देवळाली आदी भागातून लोक कुटुंबियांसमवेत बैलगाडीत येत असत. लोकांचा वाढता प्रतिसाद व गर्दी लक्षात घेऊन वेल्फेअर हॉलमध्ये होत असलेली रामलीला हॉलच्या बाहेर मोकळ्या मैदानावर होऊ लागली. तेव्हापासून आजतागायत येथील वेल्फेअर क्लब हॉलच्या मैदानावर रामलीलेचे अखंडीत आयोजन होत आहे.

Gandhinagar's historical Ramlila

तत्कालीन परिस्थितीत सीता स्वयंवराच्या प्रसंगानंतर श्रीराम, लक्ष्मण व सीतेच्या वेशभूषेतील कलावंतांची परिसरात रथातून मिरवणूक काढली जात असे. सुरुवातीच्या काळात रामलीलेतील असलेल्या स्त्री भूमिका पुरूष कलावंतच करीत असे. शब्बीर अली, लियाकत अली पठाण, विष्णू गंगतानी, कृष्णा गवांदे, बालमसिंग, हजरीलाल शुक्ला, बिंदरसिंग, सुरिंदरसिंग या पुरूष कलावंतांनी रामलीलेत सादर केलेल्या स्त्री भूमिका अजरामर ठरल्या आहेत. सन १९६५ मध्ये श्यामा हिंदळेकर यांनी प्रथमच शूर्पणखेची भूमिका केली. त्यानंतर स्त्रियांनी रामलीलेत सहभाग घ्यायला सुरुवात केली. रामलीलेचे प्रमुख आकर्षण म्हणजे दसरा. दसर्‍याच्या दिवशी येथील रामलीला मैदानावर रावणाच्या ६० फुटी पुतळ्याचे दहन करण्यात येते. याप्रसंगी श्रीरामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्या घनघोर युद्धाचे दृश्य सादर करण्यात येते. सोबत मनमोहक आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी हे दृश्य बघण्यासाठी शहर परिसरातून सुमारे ५० ते ६० हजार लोक येत असतात. यातील सर्वच कलावंतांच्या अंगात रामलीला इतकी भिनली आहे की, यातील सर्व संवाद व गीते तोंडपाठ तर आहेच परंतु दरवर्षी नवरात्रीच्या एक महिना अगोदर हे कलावंत अक्षरश: घरदार विसरून तालमी घेण्यात मग्न असतात. यात सहभागी होणारे सर्वधर्मीय कलावंत विनामोबदला काम करीत असल्यामुळे रामलीलेची ही परंपरा गेल्या ६६ वर्षांपासून अविरत सुरू आहे.

दिवसेंदिवस प्रेक्षकांची संख्या वाढत असल्यामुळे कलावंतांनाही त्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. गांधीनगरच्या रामलीलेने पारंपरिक बाज व आत्मीयता जोपासल्याने आपलेपणाची एक वेगळीच भावना कलावंतांसह प्रेक्षकांमध्ये आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या रामलीलेची धुरा तरूण मंडळींकडे आली असून कपिल शर्मा, अशोक लोळगे, हरिष परदेशी, संजय लोळगे, प्रदीप भुजबळ, प्रकाश भालेकर, सुनील मोदीयानी, भरत राव, सागर पुरी, साहिल शर्मा, तस्लीम पठाण आदी पदाधिकारी व कलावंत ती यशस्वीपणे पार पाडत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.