नाशिक ,दि,५ सप्टेंबर २०२४ –गणेशोत्सवाला अवघा एक दिवस बाकी असून गणेश भक्तामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.घरगुती गणपतीचे आगमन गणेश चतुर्थीला होणार असले तरी मंडळाचे गणपती ढोल ताशा गजरात मिरवणूक काढत विराजमान होत आहेत. नाशिक शहरातील सरदार चौक मित्र मंडळ ट्रस्टच्या गणरायाला यंदा शंभर वर्ष पुर्ण होत असल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील गणेश भक्तामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १९२५ साली पंचवटी गणेश भक्तांनी सरदार चौक मित्र मंडळाची स्थापना केली होती. त्यानंतर अखंडितपणे मंडळाच्या वतीने दरवर्षी बाप्पाची स्थापना करण्यात येते.
गुरूवार दि.५ रोजी सरदार चौक मित्र मंडळाच्या बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रिमझिम पावसाच्या सरी , गुलालाची उधळण ,ढोलताशा गजरात तल्लीन होत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला होता. सिद्धिविनायक फ्रेन्ड सर्कल हिरावाडी येथून मिरवणुकीला सायंकाळी सहावाजेच्या सुमारास सुरूवात झाली.त्यानंतर गणरायाची मिरवणूक आडगाव नाका ,गुरुद्वारा ,पंचवटी कारंजा मार्गे सरदार चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक मार्गावर गणेश भक्तांची रांगोळ्याची रेखाटत बाप्पावर फुलांची उधळण व गुलालाची उधळण करण्यात आली. गणेशोत्सव ते अंन॔तचतुर्थी या दहा दिवसांच्या कालावधीत मंडळाच्यावतीने गणेश भक्तांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणूनही मंडळाच्यावतीने चोख नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांनी आवश्य मंडळाचा देखावा पाहण्यासाठी व बाप्पाच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन सरदार चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश महंकाळे, कार्याध्यक्ष मनोज अदयप्रभु ,उत्सव प्रमुख गणेश मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले आहे.