ज्येष्ठ रंगकर्मी  सुषमा अभ्यंकर यांचे निधन 

1

नाशिक– नाशिकमधील बालनाट्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ करणाऱ्या लेखिका आणि एक नामवंत
शिक्षिका सुषमा अभ्यंकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या.
वयाच्या ८२ वर्षापर्यंत नाशिकमधील फ्रावशी अकादमी येथे मराठीची तज्ञ शिक्षिका म्हणून कार्यरत
असलेल्या सुषमाताई या अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.

स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रभक्ती जागृतीसाठी होणाऱ्या मेळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या सुषमाताई यांनी
आपल्या उमेदीच्या काळात लोकहितवादी मंडळाच्या अनेक नाटकांमधून कामे केली. या निमित्ताने
त्यांना बालगंधर्वांचा काही काळ सहवास लाभला होता. पुढे एस टी महामंडळातर्फे सादर झालेली
संगीत नाटके तसेच नॉव्हेल्टी ड्रामास्टिक्स आणि नाट्यनम्रता या संस्थातर्फे त्यांनी राज्य नाट्य
स्पर्धेच्या नाटकांमधून अनेक भूमिका केल्या. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या विनायक दामोदर
सावरकर ही मालिका तसेच ‘कथास्तु’ मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ
आणि वैविध्यपूर्ण नाट्यसेवेबद्ल नाशिकमध्ये झालेल्या झालेल्या नाट्य संमेलनात संमेलनाध्यक्ष
श्री नाना पाटेकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. 

 

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मुंबई तर्फे अभिनयाचा राज्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. बालनाट्य हा त्यांचा विशेषआस्थेचा विषय असल्याने कुमुदताई अभ्यंकर यांच्यासह त्यांनी सदाफुली या बालनाट्य संस्थेचीस्थापना करून मुलांची अनेक नाटके रंगभूमीवर आणली. या संस्थेसाठीच त्यांनी लिहिलेल्याबालनाट्याच्या दोन संहितांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाःग्मय निर्मितीचे दोन पुरस्कार मिळाले होते .

याखेरीज मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक कथांची पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा-सून आणि तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे यांचा मोठा परिवार
आहे. पत्रकार वंदना अत्रे आणि शहरातील नामवंत वकील अॅड. श्रीकांत अभ्यंकर यांच्या त्या
मातोश्री होत्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. आदिती मोराणकर says

    मला गुरुस्थानी असणाऱ्या सुषमाताईंना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप …..

कॉपी करू नका.