नाशिक शहरात होणार ६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल
उड्डाणपुलासाठीच्या निधीचा मार्ग मोकळा ; खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
नाशिक : द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी कायमस्वरुपी सुटावी, अपघातांना अळा बसावा तसेच भविष्यात द्वारका चौकात तसेच उपनगर, गांधीनगर, नेहरुनगर या ठिकाणाच्या महामार्गावर वाहतूक विस्कळीत होवू नये, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असणाऱ्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. द्वारका चौक ते दत्तमंदिर चौक दरम्यानाच्या सहा किलोमीटर रस्त्यावर उड्डाणपुल उभारणीसाठी या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या भारतमाला योजनेत समावेश करावा, अशी शिफारस खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते वाहतूक आणी महामार्ग मंत्रालयाकडे केली होती. खा. गोडसे यांचा सततचा पाठपुरावा पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश केल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे द्वारका–दत्तमंदिर चौक दरम्यान उड्डाणपुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई – आग्रारोड आणि नाशिक – पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरुन नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वात दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल या दरम्यानचा वाहतुकीचे सतत कोंडी होत असते. द्वारका चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असल्याने मुंबई आणि आग्राकडे नाशिक – पुणे महामार्गावरील जाणारी वाहतुकही सतत विस्कळीत होत असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरुनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी खा. गोडसे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत द्वारका चौकातील वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर आहे, याचे महत्त्व वेळोवेळी पटवून दिले होते. यातुनच गडकरी यांनी प्रस्तावित उड्डाण पुलाला तत्वत: मान्यता देवून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात द्वारका – दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवाल देखील तयार करण्यात आला होता. खा. गोडसे यांनी वेळोवेळी सदर रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी शिफारस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यास भाग पाडले होते.