दशक १३ समास २ सारासार निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ज्याचे निरसन व्हायचे होते ते निरसन झाले. चंचल होते तितके निघून गेले. निश्चल असं परब्रम्ह उरलं, तेच सार. आठवा देह मूळ माया. अष्टकाया निघून गेल्या. साधू कृपाळूपणे उपाय सांगतात. ‘सोहम हंस: तत्त्वमसी! ते ब्रह्म तू आहेस! विचार केला असता अशी स्थिती सहजपणे लाभते. साधक वेगळा राहून ब्रह्म पाहू गेलात वृत्तीच्या व्यक्ती त्याला शून्यत्वाची प्राप्ती होईल असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत लक्षणे केला पाहिजे.
ब्रह्म हे तापत नाही किंवा थंड होत नाही, उजळत नाही किंवा काळवंडच नाही. निवळत नाही किंवा ढवळत नाही. ते दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नष्ट होत नाही. ते येत नाही, जात नाही. ते भिजत नाही, वाळत नाही. ते विझत नाही, जळत नाही. ज्याला कुठेच नेता येत नाही, ते परब्रम्ह असतं. ते सगळीकडे जिथे दृश्यभास नाहीसा होतो तिथे ते दिसते. अशाप्रकारे साधू ऐक्यता पावतो. निर्वीकल्पात्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पात मुरून जाईल तोच संत ओळखावा.
इतर सगळे भ्रमरुपी असंत. खोटे सोडून खरं घ्यावं तरच त्याला परीक्षावंत म्हणावं. असार सोडून सार घ्यावे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, अशी आत्मनिवेदन भक्ती आहे. वाच्यांशाद्वारे भक्तीमुक्ती बोलावी, लक्ष्यांशाद्वारे तदृपता विवरण करावी. विवरण करताना मी पानाचाही लय होत जावा, त्याला तद्रूपता म्हणतात. तद्रूप, चिद्रूप, आणि तद्रूप सदृप- सस्वरूप म्हणजे आपले रूप. आपले रूप म्हणजे तत्व निरसन झाल्यावर उरलेले अरूप. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १३ समास ३ उभारणी निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाल, निर्मळ, निश्चळ, निर्विकार आहे. कित्येक काळ, जेव्हापासून भूगोल सुरू झाला त्या भूगोलाचे मूळ सावंधपणे ऐका. परब्रह्म निश्चल असताना तिथे ‘एकोहम बहुस्याम’ हा चंचल संकल्प उठला. त्याला आदि नारायण म्हणतात. मूळ माया जगदेश्वर त्यालाच शडगूणेश्वर म्हणजे ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि विज्ञान यांचा ईश्वर असं म्हणतात. तिथे अष्टधा प्रकृतीचा विचार पहा.
अलीकडे गुणक्षोभिणी.. तिथे त्रिगुणांनी जन्म घेतला. तिथून ओंकाराची मांडणी जाणावी. अकार-उकार-मकार तिन्ही मिळून ओंकार झाला. त्याच्यापुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला आहे. अंतरात्म्याला आकाश म्हणावे. त्याच्यापासून वायूचा जन्म झालेला आहे. वायूपासून तेजाचा जन्म झाला. वायूच्या योगाने वन्ही उष्ण होऊन पेटतो, त्यातून सूर्यबिंब प्रगटते. जो वारा शितल वाहतो त्याच्यातून जळ निर्माण होते. ते जल गोठून भूगोल निर्माण होतो. त्या भूगोलाच्या पोटामध्ये अनंत कोटी बीज निर्माण होतात. पृथ्वी आणि पाण्याची भेट झाल्यानंतर अंकुर निघतात. पृथ्वीवर नाना वेली, नाना रंग, पत्र पुष्पांचे तरंग, नाना स्वाद आणि मग नंतर फळ झाली.
पान, फुलं, फळं नानावर्ण नाना रसाळ धान्य, अन्न तिथून निर्माण झाले. अन्नापासून रेत निर्माण झाले. त्या पासून प्राणी निपजले. अशी ही उत्पत्तीची रोकडी प्रचिती आहे. अंडज, जारज, श्वेतज, उद्भिज या सगळ्याचं बीज पृथ्वी-पाणी हे आहे. अशा प्रकारचे सृष्टीरचनेचे नवल आहे. चारी खाणी,चारी वाणी ८४ लक्ष जीवयोनी. तिन्ही लोक पिंड ब्रम्हांड निर्माण झाले. मुळचीची अष्टधा प्रकृती हेच सगळ्यांचे जीवन आहे. सगळे पाण्यापासून जन्माला आले पाणी नसले तर सगळे प्राणी मरण पावतील. हे अनुमानाचं बोलणं नाही याचा प्रत्यय घ्यावा. वेदशास्त्र पुराणांचा प्रत्यय घ्यावा असं समर्थ सांगत आहे. ही उभारणी कशी झाली याची अधिक माहिती पुढील भागामध्ये ऐकू या.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७