दशक १३ समास पाच कहाणी निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. कोणीतरी दोघेजण पृथ्वीवर उदासीनपणे फिरत होते. काही काळ गेल्यानंतर एक कथा सुरू झाली. श्रोता वक्त्याला विचारू लागला, एखादी चांगली कहाणी सांगा. वक्ता श्रोत्याला म्हणाला, सावधपणे ऐका. प्रकृती आणि पुरुष असे स्त्री पुरुष होते. दोघांमध्ये अत्यंत प्रेम होते. दोघे जणू एकरूपच होते. भिन्नत्व नाहीच. असाच काही काळ लोटला त्यांना एक जाणीवरुपी विष्णू हा पुत्र झाला. तो चांगलं काम करणारा आणि सर्वांविषयी आदर बाळगणारा होता. पुढे त्याला एक मुलगा झाला. तो म्हणजे जाणीव नेणीव रूप ब्रह्मा. जाणीव-नेणीव रूपी हा पुत्र अर्धचतुर होता. त्याने उदंड व्याप केला. अनेक कन्या-पुत्र म्हणजे प्राण्यांना जन्म दिला. नाना प्रकारे खूप लोक तयार झाले. त्याचाच ज्येष्ठ पुत्र म्हणजे नेणीववृत्ती महेश. तो अज्ञानी आणि रागीट. काही चूक झाली तर तो संहार करणारा. मूळ पुरुष पिता शांत बसलेला होता. विष्णूने मात्र खूप व्याप केला. तो खूप जाणता होता. त्याचा नातू ब्रह्मा हा अर्धे जाणणारा होता आणि पणतु मात्र काहीही न जाणणारा. होता तो महाक्रोधी होता. काही चुकल्यास संहार करीत होता. विष्णू सर्वांचे पालन करीत होता, नातू वरच्यावर संसार वाढवत होता आणि पणतु चुकीच्या गोष्टीचा संसार करीत होता.
अशाप्रकारे वंश वाढला. उदंड विस्तार झाला. बराच काळ आनंदामध्ये गेला. इतका विस्तार वाढला की त्याची गणना करता येईना. वडिलांना कोणी मानेना. परस्परांच्या मनामध्ये उदंड संशय निर्माण झाला. घरामध्ये भांडण लागली; त्यामुळे मग संहार व्हायला लागला. वितुष्ट निर्माण झाले. थोराथोरांमध्ये बेवंदणा आला. अज्ञानी लोक भरीस पेटले. मग त्यांनी संहार सुरू केला. उन्मत्तपणे यादव जसे भांडत तसे एकमेकांशी भांडू लागले. बाप, लेक, नातू पणतू सगळ्यांचा नि:पात झाला. कन्या, पुत्र, हेतू, मातु अणुमात्र देखील राहिले नाहीत. अशी कहाणी जो अभ्यासतो त्याची जन्मापासून सुटका होते. प्रचितीमुळे श्रोता आणि वक्ता धन्य झाला. अशी ही जी अपूर्व कहाणी आहे ती उदंड वेळा होते आणि जाते. इतकं सांगून गोसावी निवांत झाले. म्हणजे आमची कहाणी संपावी, तुमचे अंतर परिपूर्ण होवो.
याचा कोणीतरी विचार करावा.चुकत माकत आठवले तितके थोडक्यात सांगितले.कमी-जास्त असेल ते श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. अशी कहाणी निरंतरपणे विवेकपर्वक जे नर ऐकतात तेच जगदोद्धार करतात.असं दास म्हणतात. त्या जगदोद्धाराचे लक्षण विवरण केलं पाहिजे. सार निवडावं त्यालाच निरूपण असे म्हणतात. निरुपण अनुभवाच्या आधारे विवरण करावं. तत्त्वाची नाना कोडी उलगडून सांगावी. समजता समजता निस्संदेह व्हावं.
अष्टदेह विवरून पाहिला असता माणूस सहजपणे निसंदेह होतो. अखंड निरूपण करीत राहिल्यास त्याला समाधान मिळते. तत्त्वांचा जिथे गलबला असेल तिथे निवांतपणा कसा असेल? त्यामुळे या घोटाळ्यापासून अलिप्त असावे. असा सूक्ष्म संवाद विषय केला. पुढच्या समासामध्ये थोडक्यामध्ये बोध देतो तो सावधपणे ऐका. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७