दशक ७ समास ७ साधन प्रतिष्ठा
जय जय रघुवीर समर्थ. मी पण शस्त्राने तुटत नाही मी पण फोडले तरी फुटत नाही. मी पण काही केल्या सुटत नाही. मी पणा ने वस्तू समजत नाही, मी पणा मुळे भक्ती मावळते, मी पणा मुळे वैराग्याची शक्ती गळून पडते. मी पणा मुळे प्रपंच घडत नाही, मी पणा मुळे परमार्थ बुडतो, मी पणा मुळे यशकिर्ती प्रताप सर्व उडून जाते. मी पणा मुळे मैत्री तुटते, मी पणामुळे प्रीती आटते, मी पणा मुळे अभिमान अंगामध्ये येतो. मी पणा मुळे संशय निर्माण होतो, मी पणा मुळे कलह वाढतो, मी पणा मुळे देह तादात्म्यचा भ्रम निर्माण होतो. मी पणा कोणालाच सहन होत नाही तर भगवंताला कसा सहन होईल? म्हणून मी पणा सोडून राहील तो समाधानी.
मी पणाचा त्याग कसा करावा? ब्रह्म कसे अनुभवावे? निःसंगपणे समाधान कसं मिळवावं? मी पण सोडून जाणीवपूर्वक साधन केले तर समाधान मिळून धन्यता प्राप्त होते. मी आता ब्रह्म झालो, आता साधन कशाला करू? असं म्हणायला लागला तर कल्पनाच उभी राहते. ब्रह्माला कल्पना सहन होत नाही त्यामुळे ते मिळत नाही ते ब्रह्म शोधतो तो खरा साधू. निर्विकल्पाची कल्पना करावी पण कल्पिलेले आपण होऊ नये, अशाप्रकारे मी पण त्यागावे. अशी ब्रह्मविद्येची ही गुप्त युक्ती आहे. काहीही नसून असावे. दक्ष आणि समाधानी असावे. त्यालाच हे समजते. ज्याची आपण कल्पना करावी तसे आपण असतो म्हणून आपल्या भूमिकेपासून खाली घसरू नये म्हणून साधन उपाय करावे म्हणजे अलिप्तपणाची सोय सापडते. राजा राजपदावर असताना सत्ता आपोआप चालते, त्याप्रमाणे साध्य होऊनच साधन करावे. साधन हे देह करीत असला तरी देह म्हणजे आपण नव्हे, असं करून सहजपणे अकर्ता झाला. देह आपण अशी कल्पना केली तर साधन त्यागावे लागते, देहातीत स्वभाव असेल तर देह कसा राहील? त्यामुळे साधन नाही आणि देहही नाही आपले आपण निसःदेह. देहात असूनही विदेही स्थिती प्राप्त होईल.
साधन न करता ब्रह्म झाले तर देहाची ममता चिकटते. ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली देहातील आळस प्रबळ होतो. परमार्थाच्या नावाखाली स्वार्थ जागृत होतो, ध्यान म्हणून निद्रा करतो, मुक्तीच्या नावाने स्वच्छंदीपणा करायला लागतो. निरुपणाच्या निमित्ताने निंदा करतो, संवाद करायच्या नावाने वितंडवाद घालतो आणि उपाधी घेऊन अभिमान अंगात बाळगतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या निमित्ताने अंगामध्ये आळस प्रवेश करतो आणि साधनाचे वेड लागतं, आता काय करायचे? वचनाचा आधार घेऊन चुकीचे वर्तन करणे म्हणजे शस्त्र फिरवून स्वतःवरच हाणून घेण्यासारखं आहे. या उपायामुळे अपाय होतो आणि विपरीत वर्तनामुळे स्वहित नष्ट होते.
साधन सोडल्यावर मुक्तच्या नावाखाली बंधनात पडतो.साधन केले तर सिद्धपण निघून जाईल त्यामुळे साधन करणे आवडत नाही. लोक म्हणतील हा साधक याची लाज वाटते. त्याला ब्रह्मादिक सर्व साधन करतात हे ठाऊकच नाही. आता अविद्या बाजूला ठेवा. ही अभ्यासाला अनुसरणारी विद्या आहे. अभ्यासामुळे आद्य पूर्णब्रह्म प्राप्त करावे. हा अभ्यास कोणी करावा? असा प्रश्न श्रोता करतो. याचे उत्तर पुढच्या समासामध्ये देऊन साधनाचे निरुपण करतो. असं समर्थ सांगताहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधनप्रतिष्ठा निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे