किरण घायदार
नाशिक दि,२६ नोव्हेंबर २०२४ -एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस येत्या २ ते ३ दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून त्याबाबत आता तातडीने कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकआचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांना मंजूर झालेली दिवाळी भेटीची रक्कम मिळाली नाही. परंतु, निवडणूक झाल्याने आतातरी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीची रक्कम दिली जावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती . एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे पत्र एसटी प्रशासनाने १५ ऑक्टोबर रोजी सरकारला पाठवले होते. त्याला सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीसाठीचा आचारसंहिता लागू झाल्याने ही रक्कम देण्यात अडचण निर्माण झाली. परिणामी, कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला.त्यामुळे, एसटी प्रशासनाने ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करून ही रक्कम वितरित करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.
२९ नोव्हेंबर रोजी दिवाळी भेट…
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॅा माधव कुसेकर तसेच महामंडळाचे वित्तीय सल्लागार गिरीषजी देशमुख, महामंडळाचे महाव्यवस्थापक (क व औ स)मा. मोहनदास भरसट, तसेच यंत्र विभागाचे महाव्यवस्थापक मा. कोलारकर साहेब, महामंडळाचे मुख्य कामगार अधिकारी मा.राजेश कोनावडेकर,उपमहाव्यवस्थापक वाहतूक मा. चेतनजी हसबनीस तसेच मुख्यालय कामगार अधिकारी मा. घाडगे साहेब यांच्या समवेत मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची बैठक झाली. या बैठकीत कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश बावा, कोषाध्यक्ष अनिल श्रावणे,राज्य महिला संघटक सचिव सौ शीलाताई नाईकवाडे, मुख्यालय सचिव श्री जनार्दन अंकोलेकर हे उपस्थित होते.
यावेळी बैठकीमध्ये दिवाळी भेट देण्यासंदर्भात संघटनेने आचारसंहितेपूर्वीच पाठपुरावा केला असून यापूर्वीच्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी च्या बैठकीत माननीय कुसेकर साहेबांनी मंजुरी दिलेली आहे.आता निवडणूक आयोगाची आचारसंहिता शिथील झाल्यामुळे दिवाळी भेट तातडीने देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी महामंडळाच्या वतीने दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट वाटप करण्याचे मान्य करण्यात आले.तसेच महागाई भत्ता ५० % करण्याबाबत महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेली असून तो तातडीने देण्याबाबतही यावेळी मागणी करण्यात आली. तसेच प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक माननीय औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात यावा याबाबत आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावर महामंडळाने सरकारकडे लवकरात लवकर पाठपुरावा करण्याचे मान्य करण्यात आले.
वाहतूक नियंत्रक पदाच्या बदल्याबाबत पंधरा दिवसांची स्थगिती दिली होती. ती उठवून वाहतूक नियंत्रकांना जागा असेल तर त्याच डेपोमध्ये अथवा जवळच्या डेपोमध्ये नेमणूक देण्याचे मान्य करण्यात आले.भविष्य निर्वाह निधी मधून उचल देण्याबाबत सुद्धा सप्टेंबर महिन्याचे उचल देण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.तसेच फॉर्म फोरच्या संदर्भामध्ये संघटनेला प्रति देऊन त्यांच्या हरकती मागवण्याचे ही यावेळी मान्य करण्यात आले.चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली जाते व चुकीच्या पद्धतीने निलंबन केले जाते. याबाबत जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने निलंबन करतील त्यांच्यावरती विनाखुलासा कारवाई करण्याचे आदेश माननीय कुसेकर सरांनी दिलेले आहेत.
चालक,वाहक, सहाय्यक, शिपाई तत्सम संवर्गातील जे कर्मचारी लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदोन्नतीसाठी 240 दिवसाची उपस्थितीची अट यामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या विशेष रजेबाबत उपस्थिती ग्राह्य धरण्यात यावी व प्रसूती रजा, बालसंगोपन रजा व गर्भपाताची रजा या रजा सुद्धा या २४० दिवसाच्या उपस्थितीमध्ये धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
राप कर्मचारी व उमेदवारांनी भरती परीक्षा दिल्यानंतर उर्वरित वेळेत परीक्षेच्या ठिकाणी कामकाज केल्यास त्या दिवशीची हजेरी देण्याचे ही मान्य करण्यात आले.शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास संघटनेमार्फत सूचना द्याव्यात असे प्रशासनाने सुचवल्याने नवीन शिस्त आवेदन कार्यपद्धती कशी असावी याबाबत संघटनेने सविस्तर प्रस्ताव सादर केलेला असून याबाबत लवकरच प्रशासनाकडून संघटनेची चर्चा करून नवीन शिस्त व आवेदन कार्यपद्धतीची अंमलबजावणी केली जाईल,असे सांगण्यात आले.
कोरोना कालावधीत ज्या कामगारांकडून रजेचे अर्ज घेतलेले आहेत अशा कामगारांना रजा क्रेडिट करण्याबाबतची ही मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे.दहा दहा बारा बारा वर्षे कर्मचारी पर्मनंट होत नसल्याने त्यांचे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याऐवजी बारा महिन्यात चालवण्यात येणाऱ्या नियतीची सरासरी विचारात घेऊन त्या सरासरीच्या ९५%चालक वाहक यांना समय वेतनश्रेणीवर घेण्याचे सुद्धा मान्य करून तातडीने प्रोसेस करण्याचे मान्य करण्यात आले.
शासन निर्णयानुसार राप अधिकाऱ्यांप्रमाणे राप कर्मचाऱ्यांना सुधारित अपंग भत्ता देण्याचे ही मान्य करण्यात आले.मल्टी ट्रेड बाबत माननीय महाव्यवस्थापक यंत्र यांनी एक वेगळी बैठक घेण्याचे मान्य करण्यात आले. तसेच त्यांच्याकडेच मनुष्यबळाचे मध्यवर्ती कार्यशाळेच्या मनुष्यबळाचा प्रश्न घेण्याचे ठरवण्यात आले.धाराशिव विभागात उपस्थित केलेल्या तीनही मुद्द्यांवरती निर्णय घेण्यात येऊन त्या ठिकाणी सेवा जेष्ठतेच्या संदर्भामध्ये डीपीओ धाराशिवला गेलेले असून बाकीच्या दोन्ही मुद्दे निकाली काढण्याचे ठरले.
अकोला विभागातील उपस्थित केलेल्या दहा मुद्द्यांवर निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय महाव्यवस्थापक यांना अकोला विभागात तातडीने जाण्याच्या सूचना देऊन येत्या 30 तारखेपर्यंत अकोला विभागाचे प्रश्न निकाली काढण्याचेही या बैठकीत ठरलेले आहे.महिलांच्या प्रश्नावरती प्रत्येक तीन महिन्यांमध्ये त्यांच्या अडीअडचणी वरती तीन महिला महाव्यवस्थापक व माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक तीन महिन्यांनी प्रादेशिक पातळीवर बैठक घेऊन महिलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले.या बैठकीत कामगारांच्या अनेक महत्वपूर्ण विषयावर ठोस निर्णय घेतल्याबाबत प्रशासनाचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.