मुंबई -स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत लवकरच परमेश्वर स्वरुप स्वामीजी यांची एण्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक स्वामीजी यांची भूमिका साकारणार असून पहिल्यांदाच ते अश्या पद्धतीची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
या भूमिकेविषयी सांगताना गिरीश ओक म्हणाले, मी याआधी अश्या पद्धतीचं पात्र रंगवलेलं नाही त्यामुळेच करताना मजा येतेय. मला वरकरणी जे दिसत नाहीत पण प्रत्यक्षात वेगळे असतात अशी पात्र साकारायला आवडतात. याआधी मी बरीच सात्वीक पात्र साकारली आहेत. त्यामुळे फुलाला सुगंध मातीचा मालिकेत स्वामीजी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याची लकब ही प्रेक्षकांच्या मनात कायम रहाते आणि त्याला लोकप्रियता मिळते. मी हे पात्र साकारताना नवी लकब शोधून काढली आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल अशी आशा आहे. मी दिग्गज अभिनेते प्राण यांचा चाहता आहे. भूमिका रंगवताना ते त्या पात्राची प्रेक्षकांवर छाप सोडायचे. त्यामुळे नवी व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो.
स्वामीजींच्या येण्याने कीर्तीसमोर मात्र नवं संकट उभं ठाकणार आहे. आता या संकटाचा सामना ती कशी करते हे पहाण्यासाठी फुलाला सुगंध मातीचा सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर.