सावानाचं  “पावित्र्य” जपायला हवं

शिवाजी मानकर  संचालक (निवृत्त) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय, मुंबई

0

(शिवाजी मानकर ) नाशिकचं सांस्कृतिक ज्ञानपीठ, वाचनसंस्कृतीचं माहेरघर, सरस्वतीचं पवित्र मंदिर, नाशिकच्या हजारो व्यक्तिमत्वांची जडणघडण करणाऱ्या आणि १८१ वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या रविवार दि. १३ मार्च २०२२ च्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

सावानाचं आणि माझं एक भावनिक नातं आहे.आजपासून ३८ वर्षांपूर्वी म्हणजे सन १९८४ साली सावानाने त्यावेळी आयोजित केलेला ग्रंथालय प्रमाणपत्र कोर्स मला करता आला. पुढे बी. लिब सायन्स पदवी करून ग्रंथालय क्षेत्रात काम करता आलं. पुढे विविध पदव्या घेऊन, सरकारी स्पर्धा परीक्षा देऊन शासनात अधिकारी म्हणून काम करता आलं. जीवनात उमेदीच्या काळात सावाना नावाच्या  वास्तूने केलेले संस्कार, दिलेली प्रेरणा आणि आयुष्याला मिळालेलं चांगलं वळण आजही विसरता येत नाही.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसारखे अनेक ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष राहिलेल्या सावानाने नाशिकचे सांस्कृतिक संवर्धन करण्याबरोबरच गेली अनेक वर्षे वाचन संस्कृती जपली आहे. संदर्भ ग्रंथ आणि प्राचीन हस्तलिखिते यामुळे या ग्रंथालयाचे महत्व देशाबरोबरच परदेशातही पसरले आहे. मात्र एखाद्या चांगल्या व्यक्तीस दृष्ट लागते तशी या चांगल्या वास्तूलाही गेली काही वर्षे दृष्ट लागली कि काय असे चित्र अलीकडे दिसू लागले आहे.

परवाच्या सर्वसाधारण सभेत माझ्यासारखे अनेक वाचक, रसिक वाचन संस्कृतीबद्दल, सांस्कृतिक चळवळीबद्दल काही चांगलं कानावर पडेल म्हणून परशुराम सायखेडकर नाट्यगृहात उपस्थित होते. मात्र या नाट्यगृहात गेले अनेक वर्षे जितकी ‘नाटकं’ तिथे झाली नसतील तेवढी अवघी ३ तासात आम्हाला ‘मोफत’ पाहायला मिळाली. तेथे ‘सावळा गोंधळ’, ‘बेबंदशाही’, ‘संशयाचे भूत’, ‘अविश्वास’, ‘तो मी नव्हेच’, ‘भाऊबंदकी’, ‘ध चा मा’, ‘कुरघोडी’ ‘वाऱ्यावरची वरात’ अशी कितीतरी नाटके एकाचवेळी मोफत पाहायला मिळाली. हे कमी होते म्हणून कि काय अजून ‘तेथे पाहिजे आपली नाती -गोती’ अशाही नाटकाची रंगीत तालीम सुरू असल्याचे  ऐकायलाआले. या बैठकीत नाशिक शहरातील अनेक ज्येष्ठ, सुसंस्कृत आणि सांस्कृतिक चळवळ अनेक वर्ष पाहिलेले जाणकार होते. आयुष्याच्या उत्तरार्धात, सरस्वतीच्या मंदिरात चाललेले हे ‘महानाट्य’ बघून त्यांना होणाऱ्या मानसिक वेदना व्यक्त करण्याच्या पलीकडच्या आहेत.

व्यासपीठावरून चाललेल्या चर्चेत कुठेही नावाला ‘पुस्तक’, ‘वाचन’, ‘ग्रंथालय’ चळवळ’, ‘ग्रंथप्रेमी’ असे शब्द कानी पडत नव्हते. याउलट ‘टेंडर’, ‘निविदा’, ‘डागडुजी’ अशा शब्दांबरोबर कोर्ट केसेस, न्यायालयीन प्रकरणे, माहितीचा अधिकार हे शब्द मात्र संपूर्ण सभागृह व्यापून राहिले होते. काही सुज्ञ सभासद म्हणत होते ‘ही काही साखर कारखान्याची जनरल मिटिंग नाही असा गोंधळ घालायला’. मात्र अनेकांना माहित नसेल, आता अनेक साखर कारखान्यांच्या सभा देखील सभासदांमधला ‘गोडवा’ जपत सुरळीत होऊ लागल्या आहेत.

वाचन व सांस्कृतिक चळवळीची १८१ वर्षांची परंपरा असलेलं सावाना पुढील २० वर्षात २०० व्या वर्षात जाणार आहे. तेथे जात असताना या मातृसंस्थेला वाचक, बालवाचक आणि पुढील पिढी डोळ्यासमोर ठेऊन पुढील २० ते २५ वर्षांचा ‘कृती आराखडा’ तयार करून  वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१२ पासून संस्थेत कोर्ट, कचेरीला सुरुवात झाली. आता हे २०२२ वर्ष आहे. म्हणजे गेले एक संपूर्ण दशक सावानाच्या नावाबरोबर ‘कोर्ट-कचेरी’ हा शब्द जोडला गेला आहे. पुढच्या दशकात पदार्पण करताना आजपर्यंत जे झालं ते सारं विसरून सर्व संबंधितांनी एकत्रित येऊन ही प्रकरणे मिटवलीच पाहिजेत. मना-मनातील समज-गैरसमज दूर केले पाहिजेत.
सावानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कविश्रेष्ठ केशवसुत यांनी ‘तुतारी’ या कवितेत म्हटल्या प्रमाणे

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका !

नाशिकचे वैभव असलेल्या एका सांस्कृतिक ज्ञानपीठाचे जतन, संवर्धन आणि विकास करणे हे आपल्या सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. हे करत असताना सावानाचं  ‘पावित्र्य’ हे जपावचं लागेल नाहीतर येणारा काळ आणि समाज (सर्व सुसंस्कृत लोक)आपल्याला माफ करणार नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहोत.सुज्ञास अधिक ते काय सांगणे ………

Shivaji Mankar
Shivaji Mankar

शिवाजी मानकर 
संचालक (निवृत्त)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय, मुंबई
मो.नं. 9823158321

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.