पित्ताचे विकार होण्याची कारणे काय ? आणि काय आहे आयुर्वेदिक उपचार 

डॉ.राहुल रमेश चौधरी 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
आजकाल प्रत्येक १० जणांमागे ८ जणांना पित्ताचा त्रास असतो.हे पित्ताचे त्रास वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात.काही जण हा त्रास थंड दूधाने शमवतात तर काही लोक मेडीकल वर ऍसिडीटी ची गोळी घेवून,अश्या प्रकारे वेगवेगळे उपाय देखील आजमावून पाहतात,पण बरेच लोक मात्र येथेच अडकतात व सतत औषधे घेण्यातच वेळ जातो.व आजार पुढे सरकून तीव्र स्वरूपाचा होतो.तीव्र स्वरूपाच्या आजारात पोटात व्रण(ulcer) तयार होणे,अंगावर रोज पित्त उठणे,तीव्र डोकेदुखी होणे ,पचनसंस्था कमकुवत होणे,सतत जुलाब होणे(ulcerative colitis-irritable bowel syndrome),पोट अजिबात साफ न होणे,त्वचाविकार होणे,शरीरातील uric acid चे प्रमाण वाढणे,जिभेची चव सतत आबंट कडू खारट राहणे,जीवनसत्वाची कमतरता जाणवणे,पित्ताशयात पित्ताचे खडे तयार होणे अश्या स्वरूपाचे अनेक आजार निर्माण होतात.मात्र यावर योग्य व्यवस्थित आयुर्वेद शास्त्राचे उपचार घेतल्यास आजार पूर्णपणे बरे होवू शकतात.अश्या या पित्ताच्या विकारांबाबत आपण आज बघूयात.

१.पित्ताचे विकार होण्याची कारणे काय?

-जेवणाच्या वेळा निश्चित नसणे,अवेळी जेवण करणे

-तिखट मसालेदार पदार्थ खाणे

-सतत तळलेले पदार्थ खाणे,बेकरीचे पदार्थ खाणे

-लोणचे,चटण्या,मसाल्याच्या भाज्यांचे सतत सेवन करणे

-मद्य,सिगारेट,तंबाखू आदी व्यसनांचे सतत सेवन करणे

-एकावर एक जेवण करणे

-भूक नसताना जेवण करणे

-अतिप्रमाणात खाणे

-आंबट,तिखट,कडू,खारट पदार्थांचे सेवन करणे

-अत्यधिक उपवास करणे

-जड अन्न सेवन करणे,अतिप्रमाणात पाणी सेवन करणे

-उडीददाळ,तूरडाळ,दही,मेथी,शेपू,चहा ,कॉफी आदी पित्त वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे.

-व्यायामाचा अभाव,रात्री जागणे,दुपारी जेवल्यानंतर लगेच झोपणे,सतत मोबाईल-टी-व्ही पाहणे

अश्या अनेक प्रकारचे कारणे पित्ताचे विकार घडण्यास कारणीभूत ठरतात.

२.पित्ताचे विकारांची लक्षणे कोणती ?

-छातीत,पोटात सतत जळजळ होणे

-आंबट,कोरडे ढेकर येणे

-पित्ताची उलटी होणे

-अंगावर पित्ताच्या गांधी येणे(urticaria)

-पोटात गॅसेस होणे

-डोळ्यांची जळजळ होणे

-अतिप्रमाणात घाम येणे,घामाला वास येणे,घामाचे पिवळे डाग कपड्यांवर पडणे

-संपूर्णांग गरम वाटणे

-सतत डोके दुखणे,अर्धे डोके दुखणे

-मळमळ होणे

-रात्री झोप न येणे,निद्रानाश

-जेवल्यानंतर पोट जड पडणे,आळस येणे

-पोट साफ न होणे

-सर्वांग दुखणे

-चक्कर येणे

-रक्तदाब वाढणे परिणामी ह्रद्रोग होणे

-पचनाच्या तक्रारी उद्भवणे

-पित्ताशयात पित्ताचे खडे तयार होणे

-पोटात पित्तामुळे व्रण तयार होणे

-वारंवार जुलाब होणे

-खाल्ल्यानंतर लगेच शौचास जावे लागणे

-शौचाच्या वेळी शौचाच्या जागी आग होणे

-लघवीस आग होणॆ

अश्या स्वरूपाची लक्षणे दिसून येतात.

३.पित्त निदानाची साधने कोणती?

-साधारणत:पित्ताची लक्षणे हीच पित्ताचे निदान करून देतात,पण आधुनिक शास्त्रानुसार ज्यावेळेला पित्ताचे आजार तीव्र स्वरूप घेतात त्यावेळेला endoscopy,sonography,barium meal  या सारख्या आधुनिक निदान पध्दती अवलंबून पित्ताचे निदान केले जाते.

४.आयुर्वेदानुसार पित्ताचे विकार निदान कसे होते ?

-आयुर्वेदात प्रश्न परिक्षेने च पित्ताचे निदान केले जाते,रुग्णाला व्यवस्थित प्रश्न विचारून सर्व इतिहास विचारूनच पित्ताच्या निदानाचे पक्के केले जाते.

५.पित्ताच्या विकारांचे उपचार कसे करणार?

अ)पथ्यपालन

ब)औषधोपचार

क)पंचकर्म

ड)रसायन चिकित्सा(rejuvenation therapy)

पित्ताच्या सर्व विकारांत पथ्यपालन अतिशय महत्वपूर्ण आहे.यात हलके,सुपाच्य जेवन करणे,ज्याज्या गोष्टी पित्त वाढण्यास त्रासदायक आहेत त्या त्या वर्ज्य करणे.भूक लागेल तेव्हाच खाणे,अनावश्यक पाणी न पिणे,व्यवस्थित झोप घेणे अश्याप्रकारे पथ्य पालन करणे अत्यावश्यक आहे.

औषधापचारांमध्ये पित्तशामक ,पित्ताचा निचरा करणारे ,कमकुवत पचनसंस्था सुधारणारे,भूक वाढवणारे,योग्य घटक शरीरात शोषूण घेणारे,अयोग्य कफ-पित्ताचा नाश करणारे ,रक्त शुध्द करणारे अशी औषधांची योजना करणे अत्यावश्यक असते.आपल्या पचनसंस्थेचे कार्य अन्न घेणे,त्याचे पचन करणे,त्याचे विवेचन म्हणजे ते वेगवेगळे करणे,व सार भाग शोषून घेवून मलभाग बाहेर टाकणे या चतु:सूत्री वर कार्य करते.त्यामुळे हे चार स्तंभ सुधारणा झाल्यास अम्लपित्त वा पित्ताच्या विकारांचा नाश होतो.

यातज्येष्ठमध,शतावरी,सूतशेखर,प्रवळ,शंख,गोदंती,आवळा,माका,भुईकोहळा,लोहभस्म,अभ्रकभस्म,नागरमोथा,वाळा,कामदुधा ,लघुसूतशेखर,हरिद्राखंड,अविपत्तीकर चूर्ण,लवणभास्कर यासारख्या औषधांचा वापर योग्य त्या लक्षणे व अवस्थांनुसार केला जातो.

पंचकर्म या विकारांमध्ये वमन,विरेचन ,बस्ती या कर्मांचा उपयोग केला जातो.याने पित्ताच्या विकारांचा समूळ नाश केला जातो.यात ज्येष्ठमध,मदनफळ,उसाचा रस,निम्बपत्र स्वरस या सारख्या औषधांचा योग्य स्वरूपात वापर करून वमन केले जाते.

रसायन म्हणजे हा आजार पुन्हा होवू नये म्हणून रसायन चिकित्सा केली जाते.यात शतावरी कल्प,दाडीमादी घॄत,कुष्मांडावलेह,च्यवनप्राशावलेह,आवळापाक,प्रवाळयुक्त गुलकंद या सारख्या रसायनांचा(rejuvenation therapy) वापर केला जातो.

सरतेशेवटी…………
अनेक पित्ताच्या आजाराचे रुग्ण हे नेहमीच सर्वात शेवटी आयुर्वेदाकडे येत असतात ते ही भल्या मोठ्या फाईल्स चा ढीग घेवूनच .आणि त्या रिपोर्ट्स मध्ये काही नसते देखील.शेवटी पचन संस्थेशी निगडीत हा आजार फक्त लक्षणांवर उपचार करून चालतच नाही याकरीता योग्य उपचार घ्यावेच लागतात जर आधीच सुरुवातीला आयुर्वेद शास्त्रात योग्य उपचार यासाठी घेतले गेले,योग्य पथ्य पाळली गेली तर हे आजार लांबण्याची वेळ येणार नाही.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

मोबाईल -९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.