नाशिक,दि.११ जून २०२३ –नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले आणि ज्यांनी ५ वेळा आणि मुलाने एक वेळा असे मिळून एकुण ३० वर्षे देवळाली मतदारसंघात आपला दबदबा कायम राखला असे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्या सह महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने शिर्डी लोकसभेची उमेदवारी वाकचौरे यांना मिळणार असे संकेत मिळत असल्यानेच नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी उपनेतेपद तसेच शिर्डी लोकसभा मतदार संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.बबनराव घोलप हे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या उभारणीत तसेच जिल्ह्यात पक्षाचे व्यापक जाळे विणण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. नुकतीच शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.असे असतानाही त्यांच्यावर उपनेते पदाचा राजीनामा देण्याची वेळ का आली हा खरा सवाल आहे.
बबन घोलप यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्याची बातमी महाराष्ट्रभर पसरताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बबन घोलप यांना फोन करून चर्चा करण्यासाठी आज तातडीने मुंबईला बोलावले आजच्या चर्चेत बबन घोलप यांचा राजीनामा पक्ष श्रेठींनी स्वीकारला नसून दोन दिवसानंतर पुन्हा घोलप यांना चर्चेसाठी बोलावले असल्याचे समजते आहे. आपल्याला विचारात न घेता आ. सुनील शिंदे यांना शिर्डीच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केल्यामुळे नाराज बबन घोलप यांनी आपल्या उपनेते पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.
आज याच विषयावर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर हा राजीनामा स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येऊन येत्या दोन दिवसात पुन्हा चर्चा करू असे ठरले आहे. या प्रसंगी उत्तर नगरचे जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे भारत मोरे संदीप आयनोर उपस्थित होते