International Yoga Day: योगदिनी आरोग्य विद्यापीठात भव्य योग महोत्सव
सुदृढतेसाठी नियमित योगसाधनेचे आवाहन – ले.ज.माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक, दि. २१ जून २०२५ –International Yoga Day “सुदृढ आणि सशक्त आरोग्यासाठी दररोजची योगसाधना आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्यक्त केले.
(International Yoga Day) आरोग्य विज्ञान विद्यापीठ, श्री चैतन्य टेक्नो स्कूल आणि भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये भव्य योग महोत्सव आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु कानिटकर उपस्थित होत्या. यावेळी योग विद्याधामचे संस्थापक डॉ. विश्वास मंडलिक, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, प्राचार्या प्रतिक्षा सिंह, व्यवस्थापक विनायक राजगुरु, व भारतीय योग संस्थानचे दिलीप जाजू यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, “Yoga for One Earth, One Health” ही यंदाच्या योगदिनाची थीम असून, योगाचा प्रसार घरोघरी करण्याचे कार्य विद्यापीठाकडून हाती घेण्यात आले आहे. या संपूर्ण आठवड्यात ५,००० हून अधिक नागरिकांपर्यंत योग पोहोचविण्यात आला.
डॉ. विश्वास मंडलिक यांनी योगसाधनेचे महत्त्व सांगताना, “योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून मानसिक आरोग्य टिकवण्याचे माध्यम आहे. योगामुळे एकात्मतेची भावना वाढीस लागते,” असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना व विविध योगासने सादर केली. बलवीर सिंग वाजवा यांच्या मार्गदर्शनाखाली दंडस्थिती, बैठकस्थिती, शयनस्थितीतील योगासने व प्राणायाम शिकवण्यात आले. तीन सत्रांमध्ये १५०० पेक्षा अधिक योग साधकांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन श्री. विनायक राजगुरु आणि डॉ. गीतांजली कार्ले यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील अधिकारी डॉ. स्वाती जाधव, डॉ. अनुश्री नेटके, डॉ. स्वप्नील तोरणे तसेच शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.