मोठी राजकीय घडामोड: सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
उद्या सायंकाळी ५ वाजता शपथविधी


मुंबई दि.३० जानेवारी २०२६- Sunetra Pawar DCM महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक आणि निर्णायक घडामोड घडत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवारी सायंकाळी ठीक ५ वाजता मुंबईत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्षाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोण स्वीकारणार, यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
बारामतीहून मुंबईकडे हालचाली (Sunetra Pawar DCM)
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. स्वर्गीय अजित पवार यांची प्रशासकीय टीम बारामतीहून मुंबईकडे रवाना झाली आहे. सुनेत्रा पवार शनिवारी सकाळी ८ वाजता बारामतीहून विशेष हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आहे. शपथविधीपूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वाची चर्चा होणार आहे.
विधीमंडळ गटनेतेपदाची निवड
शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी पाच वाजता त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे.
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पश्चात ही जबाबदारी पवार कुटुंबातीलच व्यक्तीकडे असावी, अशी भूमिका राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप नेतृत्वाची असल्याचं समजतं. त्यामुळेच सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
बंद दाराआड महत्त्वाच्या चर्चा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल ४५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत पुढील राजकीय रणनीती, खातेवाटप आणि पक्षसंघटन याबाबत सविस्तर विचारमंथन झाल्याचं सांगितलं जात आहे.
तसेच, अजित पवारांच्या अस्थी विसर्जनानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या पाच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. याच बैठकीत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अर्थखात्यावर राष्ट्रवादीची नजर
अजित पवार यांच्याकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती होती. त्यांच्या निधनानंतर ही खाती कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावं, यासाठी पक्षाकडून जोरदार हालचाली केल्या जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडेच अर्थखात्याची जबाबदारी सोपवली जावी, अशी मागणी पक्षातील अनेक नेत्यांकडून होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती देणार
राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाची औपचारिक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार असून, हा क्षण राज्याच्या राजकीय इतिहासात नोंदवला जाणार आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर खचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम सुनेत्रा पवार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कोणती दिशा घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
Sunetra Pawar DCM,

