प्रविण (बंटी) तिदमे महानगरप्रमुख व नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत
उपमहापौर पदाच्या वादातून शिवसेना शिंदे गटात खळबळ

नाशिक, दि. ६ फेब्रुवारी २०२६ : Maharashtra Political News नाशिक महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पक्षासाठी धक्कादायक ठरणारी घडामोड समोर आली आहे. शिवसेना महानगरप्रमुख तसेच प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी आपल्या पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतून वेगळा गट स्थापन केल्यानंतर नाशिक शहरात शिंदे गटाची भक्कम बांधणी करणाऱ्यांमध्ये प्रविण (बंटी) तिदमे यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. सिडकोसह नाशिकमधील घराघरात शिवसेनेचे संघटन पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यामुळे आगामी उपमहापौर पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमहापौर पदासाठी तिदमे यांना शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. मात्र, ऐन निवडणुकीच्या काही तास आधीच त्यांना उमेदवारीतून माघार घेण्यास भाग पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याच वेळी दीड वर्षांपूर्वी पक्षात दाखल झालेले विलास शिंदे यांना उपमहापौर पद देण्यात आल्याने तिदमे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत विसंवाद उघड झाला असून, स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रविण (बंटी) तिदमे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त करत, पक्षाकडून झालेल्या अन्यायाची जाहीर नाराजी दर्शवली आहे. पक्षासाठी केलेल्या दीर्घकालीन कामाची दखल न घेतल्याने आपण व्यथित झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे नमूद केले आहे. त्यामुळे ते लवकरच शिवसेना महानगरप्रमुख पदासह नगरसेवक पदाचाही राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
या घडामोडीमुळे नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, आगामी काळात आणखी नेते नाराजी व्यक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर निर्माण झालेला हा वाद शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
आपल्या पत्रात बंटी तिदमे म्हणतात (Maharashtra Political News)
मा. एकनाथजी शिंदे साहेबांवर जेंव्हा अन्याय झाला तेंव्हा नाशिक मधून माझ्या राजकीय भविष्याची चिंता न करता नाशिक मधून मी सर्वप्रथम शिंदे साहेबांसोबत गेलो.
नाशिकमध्ये शिवसेनेचा काळ अत्यंत कठीण असताना, कोणतीही अट-शर्त न ठेवता आणि कोणताही राजकीय सौदा न करता मी सर्वप्रथम पुढे येऊन शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाशी थेट संघर्ष करत, अनेक शिवसैनिक सोबत घेत संघटना उभी केली. पक्षकार्यासाठी पूर्णवेळ देता यावा म्हणून नोकरीसुद्धा सोडली.सात वर्षांपासून असलेले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद आणि नाशिक महानगरपालिकेत असलेल्या केबिनचा पण त्याग केला.शाखा प्रमुख म्हणून गल्लीतून सुरुवात करून उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उप-महानगर प्रमुख, नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख आणि पुढे महानगर प्रमुख असा संपूर्ण संघर्षाचा प्रवास मी पदासाठी नव्हे, तर शिवसेना वाढवण्यासाठी केला. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार कोणाचाही असो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन आघाडी घेतली.
माझ्या महानगर प्रमुख पदाच्या कार्यकाळात नाशिक शहरात नगरविकास निधीतून ३०० कोटींपेक्षा अधिक विकासकामे मार्गी लावली. नगरविकास निधी काय असतो हे तेंव्हा नाशिकला माहीत झाले. स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता, इतर नगरसेवकांच्या प्रभागासाठी निधी मिळावा यासाठी मी सातत्याने धावपळ केली.
पण, आज निष्ठावंत व संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
एक वर्षे निगोसिएशन करून पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना एकाच वेळी—जिल्हा प्रमुख,उपनेते, शिवसेना,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद,नाशिक महापालिका गटनेतेअशी चार महत्त्वाची पदे देण्यात आली.त्यानंतरही अजय बोरस्ते यांनी सतत मीडियात बातम्या पेरल्या की, कार्यकारिणी बदलणार, महानगरप्रमुख बदलणार, सोशल मीडियावर पक्षाबद्दल संभ्रम कायम ठेवला. त्यामुळे, अनेक पक्ष प्रवेश ही थांबले. पण, कुणीच लक्ष दिले नाही.
तसेच, दीड-दोन वर्षांनंतर पक्षात प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांना—सह-संपर्कप्रमुख, नाशिक आणि आताउपमहापौर, नाशिकअशी दोन पदे देण्यात आली.
एकीकडे संघर्ष, निष्ठा आणि संघटन उभारणी करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात आहे आणि दुसरीकडे सौदेबाजी करून आलेल्यांना पदांची खैरात होत आहे, यामुळे पक्षातील अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर,सोमवारी मी शिवसेना नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा पक्ष नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब व मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे सादर करणार आहे. तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दुपारी ४.३० वाजता मा. नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करणार आहे.
– प्रविण (बंटी) तिदमे
Maharashtra Political News

