अभिजातचा ‘अनियारा’ संगीत-नृत्य-नाट्य महोत्सव १९ व २० फेब्रुवारीला

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व विद्याहरी देशपांडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त विशेष सांस्कृतिक पर्व

0

नाशिक ,दि, १८ फेब्रुवारी २०२६ – Nashik Cultural Event अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी आयोजित दोन दिवसीय संगीत-नृत्य-नाट्य महोत्सव दि. १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नाशिकच्या कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पंडिता रोहिणी भाटे व पंडित बिरजू महाराज यांच्या हस्ते उद्घाटित वास्तूच्या रौप्यमहोत्सवी (२५वे) वर्षानिमित्त तसेच संस्थेच्या संचालिका नृत्यालंकार, नृत्यश्री विद्याहरी देशपांडे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘अनियारा’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.

पहिला दिवस : गुरुवंदना आणि ‘युगांचा प्रवाहो चालिला’(Nashik Cultural Event)
गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सुरुवात अभिजातच्या शिष्यांच्या गुरुवंदना, सरगम, झपताल आणि कवित्त या पारंपरिक सादरीकरणाने होणार आहे. शास्त्रीय नृत्यपरंपरेतील लय, ताल आणि भावप्रधानता यांचा सुरेख संगम या प्रारंभीच्या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

यानंतर गोदावरी नदीच्या उगमापासून ते आजवरच्या प्रवासाचे तसेच नाशिक नगरीच्या सांस्कृतिक आत्मकथनाचे चित्रण करणारी ‘युगांचा प्रवाहो चालिला’ ही नृत्यनाटिका सादर होणार आहे. या नृत्यनाटिकेचे लेखन कवी-लेखक विवेक गरुड यांचे असून संगीत सुनील देशपांडे यांचे आहे. नृत्यरचना विद्याहरी देशपांडे यांची असून त्यांच्या २५ ज्येष्ठ शिष्यांकडून विविध भूमिका सादर केल्या जाणार आहेत.गोदावरीचे गायन मीना निकम यांनी केले असून कथन भक्ती देशपांडे करणार आहेत. इतर प्रसंगांतील व्यक्तिरेखांचे गायन सुनील देशपांडे यांनी केले आहे. संगीत संयोजन प्रशांत महाबळ तर ध्वनिमुद्रण प्रशांत पंचभई यांनी केले आहे.

‘दशावतार’चे चार शास्त्रीय नृत्यशैलींमधून दर्शन
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे कवी जयदेव रचित ‘दशावतार’. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे सादरीकरण चार भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींतून साकारले जाणार आहे.
साजी मेनन – मोहिनीअट्टम
प्राची साथी – भरतनाट्यम
नम्रता मेहेता – ओडिसी
भक्ती देशपांडे – कथक
या चारही शैलींमधून भारतीय संस्कृतीचे वैभव, अंगभूत लयकारी आणि अभिव्यक्तीची विविध रूपे रसिकांना अनुभवता येणार आहेत.

दुसरा दिवस : ‘मिलाफ’ आणि कथक एकल
शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी पं. मकरंद हिंगणे संयोजित ‘मिलाफ’ हा उपशास्त्रीय गायन कार्यक्रम सादर होणार आहे. ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती आणि झुला या विविध रचनांचा सुरेल संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.या सादरीकरणात सुखदा दीक्षित, केतन इनामदार, सागर कुलकर्णी तसेच दुहिता व हर्षद गोळेसर सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना विद्याहरी देशपांडे यांचे एकल कथक नृत्य सादर होणार आहे. पारंपरिक बंदिशी, तत्कार, तिहाया आणि भावकथन यांच्या माध्यमातून कथकची परंपरा रसिकांसमोर उलगडली जाणार आहे.

समर्थ संगतकारांची साथ
या महोत्सवात पखावज – रोहित खवले, तबला – कल्याण पांडे, अथर्व वारे, विराज दांडेकर; सारंगी – फारुक खान; बासरी – इशिता गाडे; हार्मोनियम व गायन – सागर कुलकर्णी व अभिजित भाटजिरे यांची साथ लाभणार आहे.
संस्थेच्या वतीने अधिकाधिक रसिकांनी व कलावंतांनी या दोन दिवसीय महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही राखीव जागा वगळता कार्यक्रमास सर्वांना मुक्त प्रवेश असणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!