नाशिकमध्ये ‘Curtain Call -Theatre Workshop Chapter 1’कार्यशाळेचे आयोजन
नवोदित आणि अनुभवी कलाकारांसाठी अभिनयाचे बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी

नाशिक, दि. ८ मे २०२६ — Theatre Workshop Nashik अभिनयाची आवड असलेल्या तरुणांसाठी आणि रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी नाशिकमध्ये एक विशेष पर्वणी घेऊन येत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा यांच्या वतीने “Curtain Call – Theatre Workshop Chapter 1” या विशेष रंगभूमी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेली ही कार्यशाळा रंगकर्मींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
रंगभूमी, अभिनय आणि सादरीकरण या कलेबद्दल आवड असलेल्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. अभिनय क्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवणारे नवोदित कलाकार असोत किंवा अनेक वर्षांचा अनुभव असलेले रंगकर्मी असोत, प्रत्येकासाठी येथे शिकण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे बरेच काही असणार आहे.
या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक प्रविण काळोखे यांचे मार्गदर्शन. अभिनयातील भाव, संवादफेक, शरीरभाषा, मंचावरील वावर, पात्र समजून घेण्याची पद्धत आणि रंगभूमीवरील आत्मविश्वास अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर ते सहभागी कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत. अभिनयाची आवड असणाऱ्या युवकांसाठी हा अनुभव त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
ही दोन दिवसीय कार्यशाळा ( Theatre Workshop Nashik ) ३० आणि ३१ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे ठिकाण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हॉल, कालिदास कलामंदिर, नाशिक असे आहे. कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह रंगभूमीवरील अनुभवांची देवाणघेवाणही होणार असल्याने सहभागी कलाकारांना अभिनयाचे व्यावसायिक धडे मिळणार आहेत.
कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी विजय शिंगणे (९६८९८८८२५१) आणि महेश डोकफोडे-पाटील (९७६३३४५६७८) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. तसेच कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रविण काळोखे यांच्याशीही संपर्क साधता येईल.
रंगभूमी ही केवळ कला नसून ती व्यक्तिमत्त्व घडवणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी एक सशक्त माध्यम आहे. “Curtain Call” ही कार्यशाळा कलाकारांना त्यांच्या सुप्त कलागुणांना नवे पैलू पाडण्याची संधी देणार असून भविष्यातील रंगकर्मी घडवण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.


